Air India Flight Marathi Women Viral Video: मराठी भाषेचा मुद्दा मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरांत चिघळत असताना आता विमानातही मराठी बोलण्यावरून प्रवाशांमध्ये वादावादी झाल्याचे समोर आले आहे. माही खान नामक युट्यूबरने त्याच्या इन्स्टाग्रामवर २३ ऑक्टोबर रोजी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात त्याने महिला सहप्रवाशावर आरोप केले आहेत. मी मराठी बोलावे, यासाठी मला धमकी देण्यात आली, असा दावा या युट्यूबरने केला आहे.

इन्स्टाग्रामवरील @mahinergy या इन्स्टाग्राम हँडलवर सदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एअर इंडियाच्या कोलकात्याहून मुंबईला जाणाऱ्या AI676 मध्ये महिला सहप्रवाशी आणि माही खान यांच्यात बाचाबाची झाल्याचा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये माही खान महिलेला विचारतो की, तू मला मला मराठीत बोलण्यास का सांगत आहेस?

“तुम्ही जर मुंबईला जात असाल तर तुम्हाला मराठी बोलता आले पाहिजे”, असे सदर महिला बोलत असल्याचे या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. यावर माही खान म्हणतो की, माझ्याबरोबर गैरवर्तन करू नका. तेव्हा सदर महिला म्हणते की, तू मुंबईत उतरल्यावर गैरवर्तन काय असते ते तुला दिसेल.

या वादानंतर सदर महिला म्हणते की, तुला मराठी येत नसेल तर तू खाली बस. यानंतर माही खान केबिन क्रूच्या सदस्यांना याची माहिती देतो आणि महिला गैरवर्तन करत असल्याचे सांगतो. माही खानने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून त्याला एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.

“विविधतेत एकता असलेल्या आपल्या देशात वर्ष २०२५ मध्ये हे घडत आहे. मी मुंबईत जात आहे, म्हणून मी मराठीत बोलावे, असे या महिलेचे म्हणणे आहे. मी तिला म्हणालो की, गैरवर्तन करू नकोस. तर ती मला म्हणते, मुंबईत उतरल्यानंतर गैरवर्तन काय असते ते तुला कळेल. मला उघड उघड धमकी दिली गेली”, अशी पोस्ट माही खानने लिहिली असून त्याने एअर इंडियाला टॅग करत सदर महिलेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या?

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेने ह्युंदाईचा लोगो असलेला शर्ट परिधान केलेला दिसत आहे. यामुळे माही खानच्या व्हिडीओखाली अनेकांनी ह्युंदाईला टॅग करत ही महिला तुमची कर्मचारी आहे का? असा प्रश्न विचारला आहे. काही जणांनी ह्युंदाईला टॅग करत या महिलेने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. मात्र सदर महिला आणि ह्युंदाई यांचा संबंध काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.