कष्टाला पर्याय नसतो असं म्हणतात, पण कष्ट आणि जिद्दीने काम केले तर स्वप्न पूर्ण होण्यासही वेळ लागत नाही. असंच काहीसं घडलंय एका घरकाम करणाऱ्या महिलेबाबत. या महिलेने तब्बल ६० लाख रूपयांचा ३ बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे.

एक मालक आणि त्यांच्या घरकाम करणाऱ्या महिलेमधील संभाषणाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका एक्स युजरने त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेने ६० लाख रूपयांचा ३ बीएचके फ्लॅट खरेदी केल्याबद्दलची पोस्ट लिहिली आहे. ही महिला आधीच काही मालमत्तेची मालकीण आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत तिच्या मेहनतीबाबत तिचं कौतुकही केलं आहे.

पोस्टमध्ये लिहिले की,

“माझ्या घरी घरकाम करणारी महिला आज आली आणि खूप आनंदी दिसत होती. तिने मला सांगितले की, सुरतमध्ये नुकताच ६० लाख रूपयांचा ३ बीएचके फ्लॅट तिने खरेदी केला आहे. या घरात तिने फर्निचरवर ४ लाख रूपयांचा खर्च केला आहे आणि फक्त १० लाख रूपयांचे कर्ज घेतले आहे. मला खरोखरच आश्चर्याचा धक्का बसला. मी तिला याबाबत विचारले असता तिने सांगितले की, तिचे आधीच जवळच्याच वेलांजा गावात दोन मजली घर आणि एक दुकान आहे, दोन्ही भाड्याने घेतले आहेत. मी तिथेच नि:शब्द झाले.”

काही तासांतच ही पोस्ट व्हायरल झाली. एका घरकाम करणाऱ्या महिलेने इतकी मालमत्ता जमवली यावरून अनेक कमेंट आल्या. काहींनी तिच्या आर्थिक शिस्तीचे आणि दूरदृष्टीचे कौतुक केले, तर काहींनी तिच्या यशाचे श्रेय भारताच्या मोठ्या प्रमाणात करमुक्त अनौपचारिक अर्थव्यवस्थेला दिले.

एका युजरने उपहासाने म्हटले की, “ही करमुक्त उत्पन्नाची जादू आहे, जीएसटी नाही, टीडीएस नाही आणि फक्त निव्वळ बचत.” तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “पगारदार लोक ईएमआय आणि कराच्या कचाट्यात अडकले असताना, रोख अर्थव्यवस्था शांतपणे संपत्ती निर्माण करते.”

दुसरीकडे, अनेकांनी या महिलेच्या यशाचे समर्थन केले. “ती वर्षानुवर्षे घरकाम करून मिळालेले हे फळ आहे. तिने मालमत्तेत गुंतवणूक केली. यालाच नियोजन म्हणतात, विशेषाधिकार नाही”, असंही एका युजरने म्हटलं आहे.

या पोस्टमुळे मोठ्या प्रमाणात अनौपचारिक कमवल्या जाणाऱ्या पैशाच्या क्षेत्राभोवती पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अशा कमाईचा हेवा वाटू शकतो, मात्र अशी कामं कोणत्याही सामाजिक सुरक्षा, पेन्शन किंवा वैद्यकीय लाभांशिवाय असतात.