Women beats drunk man for molesting: महिलांचा विनयभंग ही काही साधीसुधी गोष्ट नाही. अनेकदा टवाळखोर तरूण, पुरूषांना बेदरकारपणे वागताना आपण पाहत असतो, ऐकत असतो किंवा त्यांचे व्हिडीओ दिसतात. अशावेळी केवळ ते उनाड आहेत, दारूडे आहेत असं बोलून सोडून देण्यापेक्षा त्यांना चांगला धडा शिकवणं गरजेचं असल्याचे या धाडसी तरूणीने दाखवून दिलं आहे.

आंध्र प्रदेशातील अनंतरपूरमध्ये एका तरूणीने एका मद्यधुंद तरूणाला चांगलाच चोप दिला. स्कूटरवरून जात असताना तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या एका तरूणाला या तरूणीने चांगलीच अद्दल घडवली. यावेळी स्थानिकही तिच्या मदतीला धावले. मात्र, या ठिकाणी या मद्यधुंद तरूणाचे मित्र पोहचताच हा वाद आणखी वाढला. सुदैवाने स्थानिक पोलिसांनी वेळीच या प्रकरणात हस्तक्षेप केला. प्रत्यक्षदर्शींनी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यांनुसार, दारूच्या नशेत असलेल्या तरूणाने कॉलनीच्या गर्दीच्या ठिकाणी महिलेला अश्लीलपणे स्पर्श केला. महिलेने ताबडतोब तिचे वाहन थांबवले आणि त्याच्यासमोर येऊन त्याला मारहाण करायला सुरूवात केली. त्यावेळी स्थानिक लोकही तिथे जमले आणि आरोपी तरूण पळून जाऊ नये म्हणून तरूणीला पाठिंबा दिला.

काही वेळात तरूणाचे मित्र त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्याच्या वतीने हस्तक्षेप केला तेव्हा परिस्थिती कठीण झाली. असं असताना त्याच्या साथीदारांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तरीही या तरूणीने न डमगमगता या तरूणाला मारहाण सुरूच ठेवली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत ही तरूणी त्या तरूणाला चोप देत राहिली आणि चांगली अद्दल घडवली.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या तरूणीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. या तरूणाचा सामना करण्यासाठी आणि त्याला धडा शिकवण्यासाठी अत्यंत खंबीरपणे लढली असे नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले. अनंतपूरमधील रहिवाशांनीही अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणं महिलांसाठी सुरक्षित असायला हवीत असं आवाहनही पोलिसांना केलं.