अरुणाचलम् मुरुगानंदनम् या कमी किमतीत सॅनिटरी पॅडचे उत्पादन करणाऱ्या ‘पॅडमॅन’वर या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित होत आहे. मुरूगानंदम् सारख्या ग्रामीण भागात अशा अनेक महिला आहेत ज्या गेल्या काही वर्षांपासून घराच्यांचा, गावकऱ्यांचा, गावातील पुरूषांचा विरोध पत्करून महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स तयार करत आहेत. मासिकपाळीदरम्यान स्वच्छता आणि स्त्रियांचे आरोग्य नीट राहावं यासाठी धडपडणाऱ्या या रिअल लाईफमधल्या ‘पॅडवुमेन’ची नावं आहेत मलता, गुड्डी पारगी आणि भूरी भाबोर.

या तिघीही मुळच्या मध्यप्रदेशमधल्या आंबा खोदरा या छोट्याश्या गावातल्या. या गावातील महिलांसाठी त्या २५ रुपयांत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देतात. अर्थात एका वाक्यात सांगण्याइतकं हे काम नक्कीच सोप्प नाही. आजही स्त्रियांच्या मासिकपाळीविषयी समजात अनेक गैरसमज आहेत. पाळीच्या चार दिवसात त्यांना स्पर्श करणंही अनेक घरांत निषिद्ध मानलं जातं. अशा वातावरणात या महिलांनी विरोध पत्करून पुढाकार घेतला आणि महिलांसाठी पॅड्स तयार केले. या महिलांना गावातूनच काय पण त्यांच्या घरातूनही तीव्र विरोध होऊ लागला. पॅड्स तयार करणं हे खूप हीन दर्जाचं काम आहे. तुम्ही पॅड्स तयार करतात हे पाहून आम्हाला किळस वाटतो अशा टीका अनेकांनी केल्या. इतकंच नाही तर गावातल्या काही वृद्ध महिलांनी त्यांच्या घराशेजारी जाणं, त्यांच्याशी बोलणं टाळलं. पण कितीही विरोध झाला तरी आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करत राहू असा निर्धार या महिला व्यक्त केला.

सुरूवातीला गावातील पुरुषांचा त्रास वाढला, तेव्हा पोलिसात तक्रार करण्यांची धमकी त्यांना या महिलांनी दिली तेव्हा कुठे त्रास कमी झाला असं या तिघी सांगतात. आज पंचवीस रुपयांत त्या गावातील महिलांसाठी पॅड्स उपलब्ध करून देतात, पण त्याचसोबत या गोष्टीकडे बघण्याचा गावकऱ्यांचा नकारात्मक दृष्टीकोन कमी झाला याबाबत आपण समाधानी आहोत हे आपलं मोठं यश असल्याचं सांगायला त्या विसरत नाहीत.