Work from home vs work from office: २०२०मध्ये कोविडच्या शिरकावानंतर लोकांचं घराबाहेर पडणं बंदच झाल्यामुळे नोकऱ्यांचं स्वरूपही बदललं. वर्क फ्रॉम ऑफिसऐवजी वर्क फ्रॉम होम कसं करता येईल याकडे कर्मचारी वर्ग आणि कंपन्या दोन्ही अधिकाधिक कल घेऊ लागले. मात्र, आता अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना उत्पादकता सुधारण्यासाठी ऑफिसमध्ये परत यावे अशी इच्छा बाळगत आहेत. वर्क फ्रॉम होम करण्याला सर्वच कर्मचाऱ्यांचा विरोध आहे किंवा नाही अशातली गोष्ट नाही. पण कंपन्या किती काळ ते करण्यास परवानगी देतात आणि किती काळ वर्क फ्रॉम केलं पाहिजे किंवा त्याचा कामावर कसा परिणाम होतो आणि एकंदरच कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यावर त्याचा कसा परिणाम होतो या गोष्टी लक्षात घेणंही गरजेचं आहे. एका रेडिट वापरकर्त्याला याबाबतचा एक अनुभव आला आहे आणि त्याने त्याच्या दैनंदिन दिनचर्येतील काही गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या. हा कर्मचारी नुकताच पूर्णवेळ वर्क फ्रॉम होम यावरून पूर्णवेळ वर्क फ्रॉम ऑफिस याकडे वळला आहे. त्यानंतर त्याने घेतलेल्या निर्णयाबाबत काही प्रश्न त्याला पडले आणि त्या सर्व त्रासासाठी चांगला पगार मिळणं एवढंच योग्य होतं का असा प्रश्नही त्याला पडला.

चांगल्या पगारवाढीमुळे हा व्यक्ती रिमोट वर्किंगसाठी तयार होता. हे सर्व कायमस्वरूपी नव्हते. तसंच नोकरी बदलण्याचा विचार म्हणजे पगारवाढ मिळवून नवीन कंपनीत जाणं असंही त्याने कबूल केलं.
“मी काही दिवसांपूर्वीच एका नवीन कंपनीत सामील झालो. तिथे मला पूर्णवेळ ऑफिसमधून काम करायचे आहे. हा नवीन प्रवास सुरू करण्यास उत्सुक होतो. माझी पूर्वीची नोकरी कायमची रिमोट वर्किंग होती. पण मी नवीन काम स्वीकारलं कारण पगारवाढ फायदेशीर मिळाली. त्यासाठी मला दररोज ऑफिसला जावे लागले तरी मला चालणार होते. काही महिने किंवा वर्षभर या कंपनीत काम करून पगारवाढ घेऊन मग पुढे जाण्याची माझी कल्पना होती”, असे या वापरकर्त्याने रेडिटवर लिहिले.

पुढे त्याने असेही सांगितले की, “ऑफिसच्या वेळा या शाळेसारख्या मर्यादित होत्या. सुट्टीचा कालावधी फक्त १ तासाचा असतो तो दुपारचे जेवण आणि चहा यासाठी. शिफ्टमध्ये साडेआठ तास आणि ब्रेक असतात म्हणजे एकूण साडेनऊ तास असतात. माझी वेळ सकाळी ११ ते रात्री ८.३० पर्यंत असते. मी घरी पोहोचेपर्यंत दिवस संपलेला असतो”. यावरून या कर्मचाऱ्याने वर्क फ्रॉम होमचे समर्थन केल्याचे दिसून येते.

सूर्यप्रकाश नाही, स्वातंत्र्य नाही

ऑफिसमध्ये ज्या ठिकाणी तो बसतो तिथे सूर्यप्रकाशाचा संबंध नाही. त्यामुळे त्याचे मन प्रसन्न राहत नव्हते आणि त्याला गुदमरल्यासारखे वाटत होते असे त्याने म्हटले. त्याने पुढे असे म्हटले की, त्याच्या पूर्वीच्या नोकरीत काम पूर्ण होईपर्यंत त्याच्याकडे त्याच्या सोयीनुसार कोणत्याही शिफ्टमध्ये काम करण्याची सोय होती. त्याला पूर्वी असलेलं वेळेचं स्वातंत्र्य आता नवीन कामात नाही. त्यामुळे केवळ पगारवाढ मिळाली म्हणून पूर्णवेळ ऑफिसमधून काम करण्याची संधी आपण का स्वीकारली असा प्रश्न त्याला पडला आहे.

साधारणपणे बहुतांश आयटी कंपन्यांमध्ये रिमोट वर्किंग असते किंवा आठवड्यातून एक ते दोन वेळा कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावले जाते. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काहीवेळा पूर्ण दिवसही कमी पडतो असे मत काहीजण व्यक्त करतात. तर जे ऑफिसमधून काम करणारे कर्मचारी आहेत आणि जे वेळेप्रमाणे त्यांचं काम पूर्ण करतात, त्यांच्यासाठी कदाचित वर्क फ्रॉम होम कल्पना आकर्षित करणारी असेल.

अभ्यास काय म्हणतो

वर्क फ्रॉम होम वरून वर्क फ्रॉम ऑफिसच्या सेटअपमध्ये येताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात. कंपनीची वेगवेगळी धोरणे, लवचिकतेचा अभाव आणि सहकाऱ्यांसोबतचे सुरूवातीचे दिवस, कुठल्याही प्रकारच्या गोपनीयतेचा अभाव असलेल्या तसंच बसण्यासाठीची जागा या गोष्टींचा विचार वर्क फ्रॉम ऑफिसमध्ये केला जातो. मात्र, ऑफिसमधून काम करताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

स्टीलकेस या जागतिक डिझायनर आणि ऑफिस फर्निचर उत्पादक कंपनीने त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ११ देशांमधील ४,९८६ सहभागी व्यक्तींच्या विविध अनुभवांचा यात समावेश होता. यामध्ये असे आढळून आले की, ६१ टक्के कर्मचाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून काम करण्यासाठी नियुक्त जागांच्या गरजेवर भर दिला. ऑफिसमध्ये मनासारखी जागा मिळाली तर कामही तितकेच चांगले होते. शिवाय ऑफिसचा वेळ संपला की इतर वेळ प्रवासात जातो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यातल्या वेळेशी तडजोड ही होतेच. या अभ्यासात असेही दिसून आले की, ५२ टक्के लोकांनी त्यांच्या आवडी आणि गरजा पूर्ण करणाऱ्या व्यवस्थेची कंपनीने पूर्तता केल्याबद्दल कंपनीचे कौतुकही केले.

दुसरीकडे, या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांपेक्षा वर्क फ्रॉम ऑफिसचे कर्मचारी हे ३३ टक्के जास्त व्यस्त असतात. शिवाय त्यांची उत्पादकता २० टक्के जास्त असते. ८७ टक्के कर्मचारी आफिसमधून काम करण्यात वेळ घालवत असले तरी अधिकाधिक लोकांचे प्राधान्य हे वर्क फ्रॉम होमसाठीच आहे. त्यातही या दोन्ही कल्पना महिला आणि पुरूष कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगाच्या ठरतात. अनेक महिला वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देतात. तर पुरूष दोन्हीला प्राधान्य देतात.

लोकप्रिय कंपन्यांचे सीईओ काय म्हणतात?

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे घरून काम करण्याच्या कल्पनेशी सहमत नाहीत. “घरून काम करणारे लोक कार्यक्षम नसतात आणि ऑफिसमध्ये येणारे लोक जास्त काम करतात”, असे झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.

याउलट एअरबीएनबीचे सीईओ ब्रायन चेस्की यांनी द वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना म्हटले की, “ऑफिसमध्ये येऊन काम करण्याची पद्धत संपुष्टात येत आहे. आपल्याला माहीत असलेले ऑफिस आता संपले आहे. हे डिजिटल युगातील एक स्वरूप आहे”.

टेस्ला आणि एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी रिमोट वर्किंगबाबत प्रतिसाद दिला आहे. “ही केवळ उत्पादकतेची गोष्ट नाही, तर नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे”, असं मस्क यांनी म्हटलं आहे.