आज जागतिक कुटुंब दिवस आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम’ म्हणजे हे जगच एक कुटुंब आहे असं म्हणतात. पण आज अशा कुटुंबाला आपण भेटणार आहोत, ज्या कुटुंबात जग सामावलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. थोडक्यात काय तर हे जगातील असं एकमेव कुटुंब आहे, जिथे एका कुटुंबात १६० हून अधिक सदस्य राहतात. आश्चर्य वाटलं ना? हे कुटुंब मिझोरामध्ये राहतं आणि जगातील सगळ्यात मोठं कुटुंब म्हणून ते ओळखलं जातं.
अनेकांनी या कुटुंबाला एका साबणाच्या जाहिरातीत आधीही पाहिलं असेल. मिझोराममध्ये राहणाऱ्या या कुटुंबातील मुख्य सदस्याचे नाव आहे झियोना चाना. त्यांना एकूण ३९ पत्नी आहेत, तर ९४ मुलं आणि ३३ नातवंडं. काय धक्का बसला ना? पण हे खरं आहे. झियोना आपल्या ३९ पत्नींसोबत चार मजल्यांच्या एका मोठ्या घरात राहतात. या घराला १०० हून अधिक खोल्या आहेत. आता एवढं मोठं कुटुंब म्हटल्यावर खाण्यापिण्याचा खर्च होणारच. या कुटुंबाचं एकवेळचं पोट भरायचं झालं तरी दिवसाला १०० किलोहून अधिक तांदूळ त्याचबरोबर धान्य, भाज्या लागतात. झियोन यांच्या पत्नी मिळून आपल्या कुटुंबासाठी जेवण शिजवतात.
आता तुम्ही म्हणाल इथे कुटुंबात इनमिन पाच माणसं जरी असली तरी आपल्याला गुण्यागोविंदाने राहता येत नाही, तिथे ३९ पत्नींसोबत झिओन कसे काय नांदत असतील? तिथे तर दर दिवसाला भांडणं होत असतील, असं तुम्हाला वाटतं असेल पण हे साफ चुकीचे आहे. कारण हे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदतं. झिओन यांच्या पत्नींपैकी वयाने मोठी असलेली एक कुटुंबातील इतर महिलांमध्ये भांडणं तर होणार नाही ना, याची पुरेपूर काळजी घेते. तिच या प्रत्येकीला घरची कामं आणि जबाबदाऱ्या वाटून देते. झिओन यांनी कुटुंबासाठी काही नियम ठरवून दिलेत. घरातील प्रत्येक सदस्य या नियमांचे पालन करतात. म्हणून इतकी वर्षे हे कुटुंब एकत्र नांदते आहे.
झिओन आता ७१ वर्षांचे झालेत. ते अशा पंथातले आहेत जिथे पुरूषाला बहुपत्नीत्वाचा अधिकार आहे. त्यानुसारच त्यांनी ३९ लग्न केली. त्यामुळे १६० हून अधिक सदस्य असलेले झिओनचे कुटुंब हे केवळ भारतातीलच नाही तर जगातील सगळ्यात मोठं कुटुंब ठरले आहे.