Worli bdd chawl house price: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळी बीडीडी चाळीतील दोन पुनर्वसित इमारतीतील ५५६ रहिवाशांपैकी प्रातिनिधिक १६ रहिवाशांना १४ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले. चावी वाटप सोहळा झाला, त्यानंतर काही दिवसांनी ५५६ घरांचा ताबा देण्यात आला. वर्षानुवर्षे १६० चौरस फुटांच्या घरात राहणारे बीडीडीवासीय ४० मजली उत्तंगु इमारतीमधील ५०० चौरस फुटांच्या घरात वास्तव्यास आले. दरम्यान आता याच बीबीडी इमारतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय. वरळी बीडीडीमधील घर मिळाल्यानंतर लगेच विकायला काढल्याने नेटकऱ्यांनी नाराजी जाहीर केली आहे. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये वरळी बीडीडीमधील घर विकायला काढलं आहे असा दावा केला आहे. यावेळी या घरांची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चावी प्रदान कार्यक्रमामध्ये बोलताना सोन्यासारखी घरं विकू नका असं आवाहन केलं होतं.जुनी पिढी भावी पिढीला वारसा देण्यासाठी सोने जतन करून ठेवायचे. तसेच मुंबईच्या हृदयस्थानी मिळालेली ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची टू बीएचके आकारमानाची मालकी तत्त्वावर मिळालेली विनामूल्य सदनिका सोन्याहून अधिक मौल्यवान असून हे मौल्यवान घर पुढील पिढीला वारसा म्हणून जतन करा, त्याची विक्री करू नका, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळीतील रहिवाशांना दिला होता. मात्र या आवाहनाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे.
घरांची किंमत ऐकून थक्क व्हाल
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बीडीडी पुनर्वसित इमारतीचा हा व्हिडीओ एका रिअल इस्टेट एजंटने पोस्ट शेअर केला आहे. त्यानुसार, वरळीत नव्याने उभारण्यात आलेल्या बीडीडीमधील सर्वात वरच्या मजल्यावरील घर विक्रीस काढलं आहे. या घराची किंमत २ कोटी ८० लाख ठेवण्यात आली असून, ती कमी जास्त होऊ शकते असंही सांगण्यात आलं आहे. पोस्टमध्ये ५०० स्क्वेअर फूट एरिया असून, लिफ्ट आणि एक कार पार्किंग असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतापले आहेत. अनेकांनी यावर टीका करत संताप व्यक्त केला आहे. एकानं म्हंटलंय ‘आमचा मराठी माणूस ही रूम विकून मुंबईच्या बाहेर जाणार’, “असं नका करु रे मुंबईला यांच्या ताब्यात नका देऊ” अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.