‘बोल बजरंग बली की जय’, ‘तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा’ आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. ठिकठिकाणच्या मानाच्या दहीहंड्यांचा वेध घेत मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील गोविंदा पथकांतील गोविंदांनी अनेक मानाच्या दहीहंडी फोडल्या. उंच दहीहंडी फोडून पारितोषिक मिळविण्यासाठी पथकांमध्ये चुरस लागली होती, तर दुसरीकडे चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारी पथके देखील शहरांमध्ये फिरत होती. मुसळधार पावसामुळे गोविंदांचा उत्साह द्विगुणित झाला होता. त्यामुळे यंदाची दहीहंडी उत्साहात आणि जल्लोशात साजरी झाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यातील काही व्हिडीओ अतिशय थरारक आणि गोविंदांच्या धाडसाचं कौतुक करायला लावणारे आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका दहीहंडी पथकाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकजण थक्क झाले आहेत. हो कारण दहीहंडी फोडण्यासाठी लावल्या जाणाऱ्या थरांचा तोल सांभाळणं खूप कठीण काम असतं, त्यामुळे वरच्या थरावर असणाऱ्या गोविंदाना खूप सावकाश आणि काळजीपूर्वक चढाई करावी लागते. पण या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील वरच्या थरातील गोविंदानी असं काही केलं आहे. जे पाहून नेटकरी त्यांच्या धाडसाचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.
हेही पाहा- ”आमच्या पप्पांनी गणपती आणला” फेम चिमुकला आहे तरी कोण? रातोरात झाला स्टार; नवा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका पथकाने जवळपास ६ थरांची दहीहंडी लावल्याचं दिसत आहे. यावेळी चौथ्या थरावरचा एका गोविंदाने खांद्यावर एकावर एक अशा दोन गोविंदाना घेऊन एक दोन नव्हे तर तब्बल २० बैठका मारल्या आहेत. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हा तरुण बैठका मारताना उपस्थितांनी श्वास रोखून धरल्याचंही पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने अप्रतिम असं लिहिलं आहे, तर आणखी एकाने बाप रे बाप अशी कमेंट केली आहे. शेअर केल्यापासून हा व्हीडओ आतापर्यंत १२ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर सहाशेहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.