Shimga In Malvan Viral Video: शिमगोत्सव म्हणजे कोकणकरांच्या हक्काचा सण. तळ कोकणापासून ते मालवण, कणकवलीपर्यंत अनेक ठिकाणी शिमगोत्सवाचा कमाल उत्साह पाहायला मिळतो. आता कुठे कुणाला वेळ आहे अशी कारणं न देताय अजूनही अस्सल हाडाचे कलाकार या शिमग्याला गावी सोंग करून, आनंद साजरा करतात. कोकणाचे हेच आनंदी रंग दाखवणारं युट्युब चॅनेल म्हणजेच कलर्स ऑफ कोकणच्या कुटुंबाने सुद्धा यंदाच्या शिमग्याचे सुंदर व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एका रीलमध्ये साडी नेसून मिठबावच्या बाजारात पोहोचलेली गवळण पाहायला मिळतेय, आणि नेटकऱ्यांना सुद्धा तिचा कलाकारी अंदाज व पेहराव खूप आवडतोय.

लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सीरीजमध्ये कलर्स ऑफ कोकणच्या टीमने गप्पा मारताना सुद्धा या शिमग्याच्या तयारीचा खास उल्लेख केला होता. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसणारी गवळण हे पात्र मुकेश घाडी म्हणजेच कलर्स ऑफ कोकण चॅनेलवरील बाबल्याने साकारलं आहे. मुकेशने लोकसत्ताशी गप्पा मारताना या शिमग्याच्या तयारीच्या काही आठवणी सुद्धा शेअर केल्या होत्या.

मुकेश सांगतो की, “मला शिमग्यात गवळण करायला खूप आवडते, मी आठवीपासून अशी पात्र करतोय आणि यासाठी मी स्वतः सगळी तयारी करतो. साडी, ब्लाउज निवडण्यापासून ते त्याला शोभेल अशी ज्वेलरी, हेअर स्टाईल करायला माझी बायको, बहिणी, आई, काकी पण मदत करतात. एकदा बायको माहेरी गेली असताना शिमग्याच्या तयारीचा असाच किस्सा झाला होता. मला तिच्याकडची एक साडी हवी होती पण ती आपल्या बॅगेत ठेवून टाळं लावून गेली होती. तेव्हा आम्ही ते टाळं फोडून साडी काढून घेतली होती. शिमग्याची पात्रं ही परंपरा आहे आणि आम्हाला ते सगळं आवडीने करायला आवडतंच”.

Video: मिठबावच्या बाजारात पोहोचली गवळण

तर मंडळी, तुम्हाला ही गवळण कशी वाटली हे सांगाच पण तुम्हाला या गोड कुटुंबाच्या गप्पा ऐकायच्या असतील तर हा खालील व्हिडीओ सुद्धा पाहायला विसरू नका.

तुमचेही असेच शिमगोत्सवातील आठवणींचे किस्से कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्हाला आणि वाचकांना ते सुद्धा जाणून घ्यायला नक्की आवडेल.