तुकोबांची लोकप्रियता आता टिपेला पोचली होती. देहूत, शेजारी लोहगावला, चिंचवडला त्यांची कीर्तने होत असत. तुकोबांच्या चरित्रात या लोहगावशी निगडित अनेक चमत्कार कथा येतात. त्यातील एक शिवाजी कासार यांच्याशी संबंधित. हा ऐंशी वर्षांचा वृद्ध सतत तुकोबांच्या कीर्तनाला जातो. रात्रीचा आपल्याजवळ नसतो म्हणून त्याच्या वृद्ध पत्नीने तुकोबांचा सूड घेण्याचे ठरविले. तिने तुकोबांना घरी स्नानास बोलवले आणि त्यांच्या अंगावर कढत पाणी ओतले. तुकाराम भाजले. गाथ्यात एक अभंग आहे-     ‘जळे माझी काया लागला वोणवा। धांव रे केशवा मायबापा।।’ तर हा अभंग चक्क ‘लोहगांवी स्वामींच्या अंगावर ऊन पाणी घातलें तो अभंग’ या मथळ्याखाली जमा करण्यात आला आहे. यावर कडी म्हणजे ‘लोहगांवी कीर्तनांत मेलेंलें मूल जीत झालें, ते समयीं स्वामींनी अभंग केले ते’ असे म्हणून एक अभंग दिला आहे. ज्या तुकोबांनी सातत्याने चमत्कारांचा उपहास केला, त्या तुकोबांवर त्यांच्या भक्त-कथेकऱ्यांनी घेतलेला हा सूडच आहे. तुकोबांच्या नावावर चक्क गाथ्याच्या हवाल्याने असे अनेक चमत्कार खपविले जात आहेत.

कीर्तनास शिवाजी महाराज आले असताना अचानक मंदिरास शत्रूसैन्याने वेढा दिला आणि पाहतात तो काय, तेथे शिवाजीच शिवाजी.. हा असाच एक लोकप्रिय चमत्कार. हमखास टाळ्या घेणारा. सांगणाऱ्या कथेकऱ्यास वाटते, आपण यातून तुकोबांची केवढी थोरवी सांगत आहोत. हीच कथा तुकाराम चरित्रकार महिपतीबुवा आणि बखरकार मल्हारराव चिटणीस या पेशवाई कालखंडातील बखरकारांनीही आणखी वेगळ्या पद्धतीने सांगितली आहे. वस्तुत: ‘नका दंतकथा येथें सांगों कोणी। कोरडे तें मानी बोल कोण।।’ असे बजावणाऱ्या तुकोबांच्या चरित्रात अशा कथा कोंबणे हा त्यांचा अपमानच.

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
Numerology Number 6 Personality Prediction in Marathi
Numerology Prediction: या जन्मतारखेचे लोक लहान वयातच होतात श्रीमंत, शुक्राच्या कृपेने त्यांना मिळते अपार धन अन् प्रसिद्धी
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी

या अशा कहाण्यांतूनच शिवराय आणि तुकोबा यांच्या भेटीचा इतिहास उभा राहिला. तो खरा की खोटा? ‘शिवाजी राजे यांनीं स्वामींस अबदागिरी, घोडा, कारकून असे न्यावयास पाठविलें, तें अभंग’ खरोखरच त्या प्रसंगाबाबतचे की त्यांचा शिवरायांशी काहीही संबंध नाही?

पंडिती प्रतीतील या विषयीच्या अभंगांत तुकोबा स्वत:चा उल्लेख- ‘रोडके हात पाय दिसे अवकळा। काय तो सोहळा दर्शनाचा।।’ असा करतात. ‘तुका म्हणे माझी विनंती सलगीची। वार्ता हे भेटीची करूं नका।।’ असे कळवतात. आणि वर पुन्हा ‘सद्गुरुश्रीरामदासाचें भूषण। तेथें घालीं मन चळों नको।।’ म्हणजे समर्थ रामदासांकडे जा असे शिवरायांना सांगतात. हे अभंग ना जोगमहाराजांच्या गाथ्यात आहेत, ना देहू संस्थानच्या. ते प्रक्षिप्त मानण्यात आले आहेत. कारण ते ‘वीर विठ्ठलाचे गाढे’ असलेल्या तुकोबांच्या प्रकृतीशी विसंगत आहेत. असे अनेक अभंग गाथ्यात आहेत. मग याचा अर्थ काय घ्यायचा? शिवराय आणि तुकोबा यांची भेट झालीच नव्हती का?

खरेतर हा अजूनही वादाचा विषय आहे. भेट झालीही असेल, कदाचित नसेलही. पण त्या भेटीला ना शिवरायांची महत्ता मोहताज आहे, ना तुकोबांची थोरवी. दोघेही स्वयंप्रकाशी, स्वयंभू.

शिवराय पुण्यास आले तेव्हा त्यांचे वय होते १२ वर्षे. त्यांची आणि तुकोबांची भेट त्यानंतरच्या काळात आणि शिवराय विशीचे होईपर्यंतच होणे शक्य आहे. हा शिवरायांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा कालखंड. पुण्यात आल्यानंतर तीनच वर्षांत त्यांच्या मनात स्वतंत्र राज्याची कल्पना आकार घेऊ  लागली होती. त्याचा प्रारंभ त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी तोरणा घेऊन केला. तत्पूर्वी त्यांनी शहाजीराजांच्या जहागिरीतील इंदापूर, पुणे, सुपे आणि चाकण हे चार परगणे, तसेच दादोजी कोंडदेव यांच्या सुभेदारीतले अंदर, नाणे, पवन, कोरबारसे, गुंजण आणि हिरडस मावळ आणि पौड खोरे, मुठे खोरे, मुसे खोरे, कानद खोरे, वेळवंड खोरे, रोहिड खोरे हे बारा मावळ पायाखाली घातले होते. दादोजी कोंडदेवांसमवेत या प्रदेशाची व्यवस्था ते लावत होते. या काळात त्यांची आणि तुकोबांची भेट होणे अशक्य नाही. परिसरातील संत-महंतांची, फकीर, अवलियांची श्रद्धेने भेट घेणारे शिवराय तुकोबांना भेटलेही असतील. तुकोबांचे अनुयायी झालेही असतील. किंबहुना कथेकऱ्यांनी तशी एक कथा रचलीही आहे.

कृष्णराव केळुसकरांच्या तुकाराम चरित्रात मोठी रंजक कहाणी आहे. शिवरायांकडील पुराणिकाच्या कोंडभट नावाच्या शागिर्दास तुकारामांनी प्रसाद म्हणून नारळ दिला. तर त्यात जवाहीर सापडले. हे शिवरायांना समजल्यावर त्यांना तुकोबांचे दर्शन घेण्याची आस लागली. त्यांनी तुकोबांना पत्र आणि घोडा, छत्री असा सरंजाम पाठविला. त्यास -‘दिवटय़ा छत्री घोडे। हें तो बऱ्यांत न पडे।।.. मान दंभ चेष्टा। हें तो शूकराची विष्ठा।।’ असे उत्तर तुकोबांनी दिले. ती नि:स्पृहता पाहून शिवराय त्यांचे भक्तच बनले. रोज कीर्तनास येऊ लागले. त्यांनी वैराग्य घेतले आणि रानात जाऊन बसले. ते पाहून जिजाऊ  काळजीत पडल्या. त्या तुकोबांकडे गेल्या. म्हणाल्या, शिवरायांना समजवा. मग तुकोबांनी त्यांना पुरुषार्थाचा उपदेश केला. या चित्तरकथेवर अधिक भाष्य न केलेलेच बरे. जणू पुढे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना  ‘ज्ञानदेवांपासून तुकोबांपर्यंतच्या संताळ्यांनी देश बुडवला’ असे म्हणणे सोपे जावे यासाठीची ही सोयच या कथेकऱ्यांनी करून ठेवली होती. वस्तुत: तुकोबांनी शिवरायांना उपदेश केला की नाही, याहून महत्त्वाचे होते तुकोबांनी तेव्हाच्या मराठीमनाला शिवकार्यास लावले की नाही हे. वादचर्चा करावी तर त्याची.

तत्कालीन पुरोहितशाहीच्या विरोधात बंड करून तुकोबा स्व-तंत्र धार्मिक मराठीमन तयार करीत होतेच. परंतु त्यांचे कार्य केवळ आध्यात्मिक नव्हते. भोवतीची आर्थिक हलाखीची परिस्थिती, त्यातून निर्माण झालेली अनैतिकता, धर्मभ्रष्टता, हतवीर्य समाज हे सारे त्यांच्या नजरेसमोर होते.

लोहगावास परचक्राचा वेढा पडल्यानंतरच्या त्यांच्या अभंगांतून त्यांच्या मनातील वेगळीच सल आपणांस दिसते. ते म्हणतात –

‘न देखवे डोळां ऐसा हा आकांत।

परपीडे चित्त दु:खी होतें।।

काय तुम्ही येथें नसालसें झालें।

आम्ही न देखिले पाहिजें हें।।

परचक्र कोठे हरिदासांच्या वासे।

न देखिजे तद्देशे राहातिया।।’

हा आकांत डोळ्यांनी पाहावत नाही. दुसऱ्यांना झालेल्या त्रासाने माझ्या मनास दु:ख होत आहे. हे देवा, तुम्ही येथे नाही असेच वाटते. आम्हाला हे संकट दिसतासुद्धा कामा नये. ज्या देशात हरीचे दास राहतात तेथे परचक्र येणे हे तेथील लोकांना दिसता कामा नये.

या संकटाचे परिणाम तुकोबांना माहीत होते. ‘उच्छेद तो असे हा गे आरंभला। रोकडें विठ्ठला परचक्र।।’ या परकी आक्रमणातून समाजाचा, परमार्थाचा उच्छेद होणार हे ते जाणून होते. ‘भजनीं विक्षेप तेंचि पैं मरण’ म्हणजे भजनात, धर्मकार्यात येणारा अडथळा हा त्यांच्यासाठी मरणासारखा होता. पण हे वैयक्तिक गाऱ्हाणे नाही. त्यातून आपले काही बरेवाईट होईल याचे भय त्यांना मुळीच नाही. ते म्हणतात – ‘भीत नाही आतां आपुल्या मरणा। दु:ख होतें जनां न देखवें।।’ समाजाला त्रास होतो तो पाहावत नाही.

हे संकट निवारण्याचा उपाय शिवराय योजतच होते. त्यासाठी समाजाचे पाठबळ हवे होते. तसा बळ देणारा समाज तुकोबांच्या उपदेशातून घडत होता की नाही, ही बाब शिवाजी-तुकाराम भेटीहून अधिक महत्त्वाची आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर नक्कीच होकारार्थी आहे.

तुकोबा एकेश्वरवादी भक्तीचळवळीतून आध्यात्मिक क्षेत्रातील सामाजिक समतेची गुढी उभारत होते, यात शंका नाही. मात्र त्याचबरोबर ते तत्कालीन समाजाला क्षात्रवृत्तीची प्रेरणाही देत होते. ही बाब आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे. ‘भले तरी देऊ  कासेची लंगोटी’ म्हणतानाच ‘नाठाळाचे माथे हाणू काठी ’ असा त्यांचा संदेश होता. तुकोबांची पागनिसी रंजलेली-गांजलेली प्रतिमा तयार करणाऱ्यांनी ही बाब आवर्जून ध्यानी घेतली पाहिजे, की जेथून शिवरायांचे शिलेदार आले त्या मावळ मुलखाची मशागत तुकोबांच्या अभंगांनी केली होती. ते ‘वीर विठ्ठलाचे गाढे’ तयार करीत होते आणि त्यांना पाईकपणाचे धडेही देत होते. हे पाईकपण परमार्थातले नाही. ते रोकडय़ा व्यवहारातले आहे. येथे पाईक म्हणजे राजाचा सेवक, सैनिक. एकूण ११ अभंगांतून तुकोबा – ‘पाईकपणे जोतिला सिद्धांत’ – पाईकपणाचा सिद्धांत सांगत आहेत. तुकोबांचे कार्य शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्यास कशाप्रकारे पूरक ठरले हे सांगणारे हे अभंग. ते मुळातूनच पाहावयास हवेत..

तुलसी आंबिले – tulsi.ambile@gmail.com