22 July 2018

News Flash

कचऱ्याचा धडा

कंपन्यांमध्ये लागणाऱ्या ४०० जोडी पांढऱ्या कापडी हातमोज्यांचा एक खोका स्नेहल लोंढे यांनी जपानला रवाना केला.

जपानमध्ये पाठवलेले ४०० हातमोज्यांचे जोड कचऱ्यात फेकून देण्यात आले. या पहिल्याच धडय़ाला, अपयशाला जिद्दीने यशात बदलणाऱ्या स्नेहल लोंढे आता महिन्याला १२ हजार डझन हातमोज्यांचे जोड जपानमध्ये पाठवतातच शिवाय चार ते पाच लाख हातमोजे विविध भारतीय कंपन्यांना पाठवतात. स्वत:बरोबरच कवठेमहांकाळ गावातल्या स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्नेहल यांच्या ‘पयोद इंडस्ट्रीज’विषयी..

कंपन्यांमध्ये लागणाऱ्या ४०० जोडी पांढऱ्या कापडी हातमोज्यांचा एक खोका स्नेहल लोंढे यांनी जपानला रवाना केला. खरं तर ही ऑर्डर नव्हतीच. केवळ नमुना म्हणून हे हातमोजे पाठवायचे होते. ओळखीतले एक व्यावसायिक अनुप जेटीया यांच्या माध्यमातून जपानमध्ये अशा हातमोज्यांना मागणी आहे हे कळलं होतं. तेवढय़ा माहितीवर बरीच मेहनत घेऊन हा खोका रवाना केला खरा पण तिथे तो गुणवत्तेच्या आधारावर टिकला नाही, चक्क  कचऱ्यात फेकला गेला. इतर कोणी असती तर या नकारातून सावरलीच नसती आणि कदाचित व्यवसायाची स्वप्नंही विसरून गेली असती. पण स्नेहल लोंढे यांनी मात्र हार मानली नाही उलट त्याचे संधीत रूपांतर केले आणि म्हणूनच आज त्यांचे १२००० डझन हातमोज्यांचे जोड जपानला निर्यात होत आहेत.

मूळच्या जव्हारच्या असलेल्या स्नेहल यांनी सुरुवातीच्या काळात व्यवसाय करण्याचं स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं. देवानंद लोंढे यांच्याशी लग्न झाल्यावर ते दोघे चांदवडला आले. तिथे योगायोगाने महिला विकास कार्यक्रमाची जबाबदारी स्नेहल यांच्याकडे आली. नंतर ‘युनिसेफ’बरोबर काम करताना गावागावात फिरून स्त्रियांना त्या मदत करत. एकदा ‘आम्ही उद्योगिनी’च्या मीनल मोहाडीकर यांनी स्नेहल यांना सुचवलं की या स्त्रियांना नुसती मदत करण्यापेक्षा उद्योगनिर्मिती करून दे. त्या वेळी स्नेहल यांच्या मनात उद्योगनिर्मितीचं बीज पेरलं गेलं. त्यासाठी एमबीए पूर्ण केलं. त्या बऱ्याच ठिकाणी फिरल्या, अनेक जणींशी बोलल्यावर या स्त्रियांना रोजगार मिळाला तर त्यांचं आयुष्य सुखी होईल, त्याचबरोबर घरादाराचं जीवनमान सुधारेल असं त्यांना वाटलं. शहराकडे होणारं स्थलांतर टाळण्यासाठी गावात रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा या विचाराने मूळ धरलं. विविध कंपन्या/इंडस्ट्री यांना हजारेक प्रकारचे हातमोजे लागतात. त्यातला एक प्रकार फक्त चीनमध्ये हाताने बनवला जातो आणि तो जपानमध्ये आयात केला जातो असं त्यांना कळलं. हा प्रकार भारतातल्या स्त्रिया हातानं बनवू शकतील असं त्यांना वाटलं आणि त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली. ते हातमोजे शिवायला लागणारं मशीन बघायला म्हणून दोघे नवराबायको चीनला गेले. त्यांनी एक महिना चक्क तिथल्या हातमोजे बनवणाऱ्या कारखान्यात काम स्वीकारलं. भाषा येत नसताना नेटानं तिथे राहून हातमोजे शिवायचं कसब शिकून घेतलं. एक महिन्याने हातमोज्याच्या कारखान्याचं मोठ्ठं स्वप्न आणि दोन शिलाई मशीन बॅगेत घालून लोंढे दाम्पत्य परत आलं.

जगात फक्त चीनमध्ये बनवले जातात असे हातमोजे भारतात तयार करून विकायचे आणि शिवणार कोण तर गावातल्या स्त्रिया, हे स्वप्न म्हणजे अशक्यप्रायच होतं. पण स्नेहल लोंढे यांनी जिद्दीनं आपलं काम सुरू केलं.  सांगली जिल्ह्य़ातलं कवठेमहांकाळ गाव दुष्काळी भाग असल्याने नोकरीधंद्यासाठी अनेक जण इथून स्थलांतर करतात. ते थांबवून गावाचा विकास करायचा म्हणून तिथेच हे काम सुरू केलं. गावातल्या स्त्रियांना त्या दोन मशीनवर प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. पण प्रशिक्षणाला आलं तर रोजंदारी बुडणार त्यामुळे फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग पैसे देऊन प्रशिक्षण सुरू केलं. त्यातून काही स्त्रिया तयार झाल्या आणि त्यांनी ४०० हातमोज्यांच्या जोडय़ा बनवल्या. त्या जपानला पोचल्या पण तिथल्या कचऱ्यात फेकल्या गेल्या. इतक्या मेहनतीने बनवलेल्या वस्तू फेकल्या गेल्यावर वाईट वाटलंच, पण त्यावर मात कशी करता येईल हा विचार स्नेहल यांनी सुरू केला.

हातमोज्यांच्या तांत्रिक बाजू, गुणवत्ता, कापडाची प्रत इत्यादी समजून घेण्यासाठी तंत्रज्ञ बोलावले. जपानी लोकांच्या अत्यंत कठीण अशा गुणवत्ता चाचणीबद्दल माहिती मिळवली. स्वत:चं घर, दागिने सगळं विकून भांडवल उभं केलं आणि बारा मशीन घेऊन प्रशिक्षण सुरू केलं. यातही एक चांगली गोष्ट अशी झाली की, जपानी लोकांना भारतात असे हातमोज्यांचं उत्पादन होऊ  शकते हे कळलं. त्यांची एक तीन सदस्यांची टीम भारतात येऊन हे प्रशिक्षण आणि कारखाना बघून  एक लाख हातमोज्यांची ऑर्डर देऊन गेली.

आता मात्र कुठलीही चूक होऊन चालणार नव्हतं, त्यामुळे लोंढे यांच्याबरोबरच तिथल्या स्त्रियाही डोळ्यात तेल घालून काम करत होत्या. कापड कॉटनचं, पांढरशुभ्रच हवं, त्यात रसायनांचं प्रमाण अतिशय कमी हवं, हातमोजा हाताला घट्ट बसेल असा शिवलेला हवा, हाताळल्याचे डाग नकोत, पॅकेजिंग चांगलं हवं, त्यात कुठलाही धातूचा अंश राहायला नको  अशा अनेक गोष्टी काटेकोरपणे पाळत तब्बल सहा महिन्यांनी पहिली ऑर्डर तयार झाली. त्या दरम्यान, जपानी लोकांनी वेळ लागला तरी चालेल पण ही ऑर्डर तुमच्याकडून घेऊ, अशी ग्वाही दिली. मालाच्या त्या कंटेनरची अक्षरश: गावात मिरवणूक काढून तो जपानला रवाना झाला आणि तिथून ‘पयोद इंडस्ट्रीज’ने मागे वळून पाहिलंच नाही.

त्यानंतर जॅपनीज चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज (जेसीसीआय)कडून काही जण आले आणि मोठय़ा ऑर्डर मिळू लागल्या. कारखान्यात येऊन काम करणे काही स्त्रियांनाच जमणारं होतं. घराबाहेर न पडणाऱ्या स्त्रियांसाठी शिलाई मशीन देऊन, घरून काम करण्याचा पर्याय दिला. फक्त धूर आणि धूळविरहित घर हवं ही अट असल्यामुळे स्त्रियांना घरात गॅस घेण्यासाठी, फरशी बसवून घेण्यासाठी मदत केली जाते. या स्त्रियांना हातमोजे बनवायचं तीन महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यात हातमोज्यांचा प्रत्येक भाग आणि शिलाई, चेकिंग, हेमिंग, टर्निग (शिवलेला हातमोजा उलटणे), धागा कटिंग, विशेष प्रकारची मोज्याच्या आकाराची इस्त्री वापरून प्रेसिंग अशा सगळ्याच गोष्टी इत्थंभूत शिकवल्या जातात.

हातमोजे शिवून महिन्याभरात आठ-नऊ  हजार रुपये कमावणाऱ्या, गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या स्त्रिया आज गावात आहेत. या कामामुळे इथल्या कुटुंबाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत. मुलं शिक्षण घेतात, स्वच्छता राखतात. कमावणाऱ्या स्त्रियांची सामाजिक पतही वाढली आहे. त्याशिवाय कापड कटिंग, पॅकेजिंग, कंटेनर भरणे यासाठी गावातल्याच स्त्रिया व मुलांना योग्य ते प्रशिक्षण दिलं आहे. सकाळी कापलेले कापड गाडीने घरपोच पोचवलं जातं आणि आदल्या दिवशीचे शिवलेले हातमोजे गोळा केले जातात. आसपासच्या २५ गावांत सुमारे साडेचारशे मशीन उपलब्ध करून दिली आहेत; सुमारे साडेआठशे स्त्रियांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे गावातून होणारे स्थलांतर तर थांबलेच पण काही जण पुन्हा गावाकडे परतू लागले आहेत.

या व्यवसायासाठी आवश्यक अशी विविध मशिनरी स्नेहल यांनी उभी केली आहे. चीनच्या एका कंपनीला मिळणारी ऑर्डर बंद होऊन ती ‘पयोद’ला मिळाली आहे. भारतात ‘मेक इन इंडिया’चा जयघोष होत असताना ही खूपच महत्त्वपूर्ण बाब आहे. स्नेहल यांनी भारतातही हे उत्पादन आणलं आहे. टाटा ग्रुपच्या अनेक हॉटेल्स आणि कंपन्यांना लागणारे हातमोजे आता ‘पयोद इंडस्ट्रीज’ पुरवते. एका कार्यक्रमात रतन टाटा यांच्याशी हस्तांदोलन करता आल्याचा अभिमान आणि आनंद स्नेहल यांच्या बोलण्यातून आजही जाणवतो.

अशा प्रकारचे हातमोजे पुरवणारी पहिलीच भारतीय कंपनी म्हणून ‘पयोद इंडस्ट्रीज’ ओळखली जाते. महिन्याला सुमारे १२००० डझन जोडी हातमोजे जपानला आणि चार-पाच लाख हातमोजे विविध भारतीय कंपन्यांना पुरवले जातात. मॅन्युफॅक्चिरग, इलेक्ट्रॉनिक, सॉफ्टवेअर, ऑटोमोबाईल कंपन्या, फूड, हॉटेल, फॅशन इंडस्ट्री अशा अनेक ठिकाणी हे हातमोजे वापरले जातात. ऑर्डर भारतीय असो की परदेशी, दोन्हीकडे समान गुणवत्ता राखली जाते. ‘झिरो रिजेक्शन’ हे कंपनीचे नेहमीच ध्येय असते.

आता बारामती येथेही हातमोज्यांचा एक प्रकल्प सुरू झालाय. पुढच्या दोन वर्षांत तिथेही दोनशे मशीन उपलब्ध होतील. याच धर्तीवर पाचगणीतील ‘मॅप्रो’ला स्थानिक स्त्रियांच्या सहभागातून कापडी पिशव्या पुरवल्या जातात. इंजिनीअिरग/ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये स्नेहल औद्योगिक विकास प्रशिक्षण देतात, त्या मुलांना स्वत:चे उद्योग उभे करून द्यायला सल्ला देतात. आसपासच्या गावात त्यांनी इंडस्ट्रियल टुरिझम निर्माण केला आहे. जपान आणि भारताबरोबरच युरोपमध्ये व्यवसाय विस्ताराचे ‘पयोद इंडस्ट्रीज’चे प्रयत्न सुरू आहेत.

स्थानिक स्त्रियांसाठी रोजगारनिर्मिती करत, लोकांचे जीवनमान सुधारून पर्यायाने स्थलांतर रोखत असे अनेक व्यवसाय निर्माण होणं हा भारताची आजची गरज आहे. ‘पयोद इंडस्ट्रीज’ने आपल्या कामातून एक नवीनच आदर्श निर्माण करून दाखवला आहे.

उद्दिष्ट

महिन्याला काही लाख हातमोजे युरोपच्या बाजारात निर्यात करायची योजना आहे. त्यासाठी लागणारे कापड स्वत:च बनवून वापरायचे. त्यामुळे चिंध्या रिसायकलचा जोडउद्योगही निर्माण होऊ शकेल. जगातल्या विविध हातमोज्यांची माहिती देणारं पहिलंवहिलं हातमोजे संग्रहालय उभारायचं आहे.

सल्ला

भारत हा तरुणांचा देश आहे, मात्र दिवसेंदिवस इथे नोकरीच्या संधी कमी होत जाणार त्यामुळे प्रत्येकीने मोठं उद्दिष्ट समोर ठेवावं. नोकरी करत राहण्यापेक्षा इतरांना नोकरी देणारी बनायला हवं. संशोधन करून, भारतीय बाजारपेठेसाठी भारतीय बनावटीच्या वस्तू बनवणं या दृष्टीने प्रयत्न करा. व्यवसायाच्या पुष्कळ संधी उपलब्ध आहेत, फक्त त्याचा फायदा घेता आला पाहिजे.

स्नेहल लोंढे

पयोद इंडस्ट्रीज प्रा. लि. 

www.payodindustries.com

दूरध्वनी – yyqvyvxvww

snehal@payodindustries.com

स्वप्नाली मठकर

swapnalim@gmail.com

First Published on November 19, 2016 4:46 am

Web Title: article on payod industries