मुंबईच्या चौकाचौकात सीसीटीव्हीचे कॅमेरे लागल्याची बातमी वाचून सर्वसामान्य मुंबईकरांना आश्चर्याचे धक्के बसले असतील. वाहतुकीचे नियम मोडण्याचे फायदे सरकारच्या लक्षात कसे येत नाहीत, याचे आश्चर्यही मुंबईवर दाटणार आहे. रस्त्यावरचा तो एक साधा लाल दिवा, अवघी वाहतूक थांबविण्याची ताकद त्याच्यात असली, तरी प्रत्येकाने ती मान्य करायलाच पाहिजे असे जे फारसे कधी घडलेच नाही, ते आता सक्तीचे होणार हा विचार पचायला थोडा बोजडच आहे. आणि समजा, ते पचवून लाल दिव्याला मान देण्यासाठी जागेवरच थांबलेच, तर पलीकडे दूर झाडाखाली दबा धरून बसलेल्या पोलिसांना काम काय उरणार?.. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून होणारी दंडवसुली हा खात्याच्या -आणि खिशाच्याही- महसुलाचा ‘महामार्ग’ असतो. आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी पोलीस खात्याच्या तिजोऱ्या भरतील; पण मोक्याच्या जागा निवडून तेथे वाहतुकीवर लक्ष ठेवण्याची डय़ुटी लावून घेण्यासाठी करावा लागणारा आटापिटा आता पुरता बासनातच जाईल. जे काम पोलिसांनी करावयाचे, त्याच कामासाठी कॅमेरे बसविले असतील, तर त्या झाडाआड दडण्याला अर्थ तरी राहील का? शिवाय, एखाद्या चालकाने अगदीच गयावया केली, तर उदार मनाने पावती न फाडता तडजोड करून दंडाचे पैसे काही प्रमाणात वाचविल्याचे समाधानही वाहनचालकाला मिळवून देता येते. हा उदारपणा दाखविण्याची सारी संधीच आता हे सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून हिरावून घेणार आहेत. वाहतूक पोलीस हा वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नसून दंडवसुली करण्यासाठीच असतो, हा मुंबईकरांचा समज असताना, अचानक रस्त्यावरून तोच दिसेनासा झाला तर वाहनचालकांना सैरभैर झाल्यासारखे वाटेल, त्याचा विचार तरी सरकारने करावयास नको का?.. कोणत्याही नाक्यावर, सिग्नलजवळ लाल दिवा असताना क्षणभर थांबून पुढे हवालदार नाही याची खात्री करून बेदरकारपणे वाहने घुसविल्यानंतरही अचानकपणे एखाद्या हवालदाराने समोर उभे ठाकावे आणि काही क्षणांचा एक सौहार्दपूर्ण सुसंवाद घडविल्यानंतर पावती किंवा ‘खुशीची पुडी’ देऊन पुढचा रस्ता धरल्याने जे मोकळेमोकळे वाटते, त्या अनुभवाचा आनंद हे सीसीटीव्ही कॅमेरे वाहनचालकांना देऊ  शकतील अशी सरकारची समजूत असेल, तर तो निव्वळ गैरसमज! सीसीटीव्ही कॅमेरे बसवून वाहतुकीला शिस्त आणण्याचा सरकारचा प्रयत्न भले स्वत:चीच पाठ थोपटून घेण्यापुरता चांगला वाटत असेल, तरी हा दुसऱ्याच्या पोटावर मारण्याचाच प्रकार आहे, हे लक्षात घ्यावयास नको?.. सिग्नलजवळची वाहतुकीची सीमारेषा ही काही आंतरराष्ट्रीय ‘लाइन ऑफ कंट्रोल’ नव्हे. मग जरा मागेपुढे झाले, तर लगेच चलान फाडण्यासारखे त्यात काय आहे?.. उन्हातान्हापासून वाचण्यासाठी झाडाखाली लपून खात्याची तिजोरी भरणाऱ्यांचाही जरा विचार करावाच की!