03 March 2021

News Flash

कुटुंबसहलींचे (विराट) प्रपोजल..

विराट हा शब्द सरसकट वापरल्यास असा विराट कंटाळवाणा वाटू लागतो!

आता ३६५ दिवसांतले १०० दिवस जर तुम्हाला नोकरी-धंद्यानिमित्त तुमच्या घराबाहेर किंवा तुमच्या शहराबाहेर नव्हे, तर देशाबाहेर जावं-राहावं लागणार असेल, तर तुम्ही काय करणार? काहीच करणार नाही! कारण काही करणं तुमच्या हातात कुठाय? एकदा एखादी चाकरी स्वीकारली आणि दुसरं-तिसरं काहीच येत नसलं, तर पर्याय कुठं असतो म्हणा! पण खरं म्हणजे प्रश्न तुम्ही काय करणार असा नाहीच. तुमचं कुटुंबीय काय करणार असा विचारायला हवा? म्हणजे तुमची बायको, मुलं किंवा तिथवर मजल गेली नसेल तर तुमची मैत्रीण किंवा पार्टनर वगैरे.? मुलंबिलं असतील तर तीदेखील.? तुमच्या पाठीमागे त्यांचं काय होणार? म्हणजे तुम्ही परत येईपर्यंत हो. भलत्या शंका नकोत! तर समजा तुमचा कुटुंबकबिला तुमच्याबरोबर सगळीकडे आला तर? म्हणजे तुम्ही जिकडे जाता त्या दौऱ्यांवर? १००-१२० दिवस? काय म्हणता प्रश्नच मूर्खपणाचा वाटतो.. असं कधी कुठे घडतं का वगैरे विचारताय. अहो, लवकरच घडणार. म्हणजे आपल्या विराट क्रिकेट संघाचे विराट कर्णधार विराट कोहली (तात्पर्य : विराट हा शब्द सरसकट वापरल्यास असा विराट कंटाळवाणा वाटू लागतो! असो) यांनी तशी शिफारस/फर्मान/आर्जव/मागणी आपल्या क्रिकेट बोर्डासमोर सादर केलेली आहे. क्रिकेट बोर्ड (पक्षी बीसीसीआय) यांच्या नावे देशातल्या क्रिकेटचा कारभार हाकणारी प्रशासकीय समिती यांनी या संदर्भात रीतसर लेखी मागणी सादर करण्याची सूचना विद्यमान भारतीय संघ व्यवस्थापकांना केली आहे. या प्रस्तावाच्या निमित्तानं किती विविधरंगी शक्यता उद्भवतात बघा. खुद्द विराटची पत्नी अनुष्का शर्मा ही बॉलीवूड तारका आहे. तिच्या शूटिंग शेडय़ुलचं काय होणार? बहुधा बाकीचे दिग्दर्शक/निर्मातेही हादरले असणार. म्हणजे वर्षांतून एकदा किंवा अनेकदा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड किंवा पार पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला कॅरेबियन्समधले शूटिंग युनिट हलवावे लागले तर काय घ्या? जे अजून एकेकटे आहेत (उदा. पृथ्वी शॉ, कुलदीप यादव) त्यांनी कुणाला घेऊन दौऱ्यांवर जावं? कदाचित आईवडिलांना वगैरे? ज्यांना मैत्रीण आहे, पण बायको नाही अशांनी काय करावं? त्यांच्यावर अन्याय नाही का? एखाद्याला वाटलं समजा पलीकडच्या आळीतल्या किंवा अलीकडल्या बोळातल्या आपल्या एखादा दोस्तालाच घेऊन जावं, तर त्याला परवानगी मिळणार की नाही? बहुधा नाहीच. कारण विराटच्या प्रस्तावात केवळ ‘पत्नी’ असाच उल्लेख आहे! सबब विराटचा हा प्रस्ताव त्याच्या इतर विधानांप्रमाणेच ‘विराटकेंद्री’ आहे. आधीच्या कोणत्याही सक्षम आणि यशस्वी कर्णधारानं – बेदी, वाडेकर, गावसकर, कपिल, सौरव, धोनी वगैरे- असा प्रस्ताव मांडल्याचं ऐकिवात वा वाचनात आलेलं नाही. जगभर अशा प्रकारे दिल्या जाणाऱ्या सवलतींचं पुनरावलोकन केलं जात आहे. आमच्याकडे मात्र उलटी गंगा! कदाचित परदेशी मैदानांवरील कामगिरीत सुधार होईल, अशी विराटची यामागची उदात्त भावना असावी! पण त्यामुळे अविवाहित भिडूंमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यांना तातडीनं लग्न करून टाकावं लागणार. या पोरांनी लवकर मार्गी लागावं या वडीलकीच्या भावनेतूनही विराटनं हा विचार केला असावा. आम्हाला आपल्या उगीच नसत्या शंका-कुशंका!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 1:47 am

Web Title: no immediate decision on virat kohli request to allow wives on tours
Next Stories
1 नवा ‘शिवराजानुभव’!
2 अस्मितेचे पाप..
3 तोचि खरा त्यागी..
Just Now!
X