भारतम् एशिया महाद्वीपे एक: महत्त्वपूर्ण देश: अस्ति। अस्माकम् प्रिय पंडिता अभिनयकुशला वक्तृत्वनिपुणा च सुश्री स्मृती इराणी एतद् देशस्य मंत्रिमहोदया।.. असे पाठ गिरवण्याची सवय याउपरान्त भारतीय प्रौद्योगिकी संस्था तथा आयआयटी येथील विज्ञान, तंत्रज्ञान विद्या शिकणाऱ्या युवक-युवतींना करून घ्यावी लागणार आहे. तसे करण्यात काहीही गैर नाही. संस्कृत ही गीर्वाणवाणी आहे. भारतवर्षांची धरोहर आहे. या भाषेत अवघे विश्व सामावले आहे. अशी भाषा शिकण्याची संधी जर पं. स्मृती इराणी यांच्यामुळे आयआयटीतील विद्यार्थ्यांना मिळणार असेल, तर त्यात चूक ते काय? किंबहुना आयआयटीच नव्हे, तर आयटीआयमधील विद्यार्थ्यांनाही सुतारकाम, वेल्डिंगादी अभ्यासक्रमांचे शिक्षण देताना अशा प्रकारे सु-संस्कृत व सु-स्किल करणे आवश्यक आहे. भारतास विश्वगुरू करावयाचे असेल, तर आपणांस अशी सु-संस्कृत राष्ट्रवादी पिढी निर्माण करावीच लागेल. या दृष्टीनेच पं. स्मृती इराणी महोदया विचार करीत असल्याचे गेल्या दोन वर्षांत वारंवार दिसून आले आहे. संस्कृतच्या सार्वत्रिकीकरणाचा जो अजेंडा पं. स्मृती महोदया राबवीत आहेत, तो वैदिक संस्कृतीच्या पाठीराख्यांना अजिबात न पटणारा असाच आहे. आपल्या प्राचीन परंपरेनुसार संस्कृत ही देवभाषा आहे. ती वेदांची, उपनिषदांची भाषा आहे. त्यांच्यावर फक्त उच्चवर्णीयांचाच अधिकार असे. पं. स्मृती महोदया यांच्या संस्कृत सार्वत्रिकीकरणाच्या मोहिमेमुळे संस्कृत भाषा स्त्री-शूद्रादी सकलजनांपर्यंत पोहोचेल. आयआयटीतील विद्यार्थ्यांना तर संस्कृत शिकल्यानंतर नवे काही शोध लावण्याचीही गरज भासणार नाही. याचे कारण आपल्या थोर प्राचीन ग्रंथांमध्ये जगातील यच्चयावत शोधांची माहिती आधीपासूनच आहे. आयआयटीतील एखाद्या संशोधकास असे वाटले, की आपण विमानविद्येवर संशोधन करावे, तर त्याने एकच करायचे, अगस्त्यसंहिता काढायची आणि विमानांबद्दलचे सगळे शोध आधीच लागले आहेत, अशी संशोधन पत्रिका प्रसिद्ध करायची. कोणास वाटले, की पर्यावरणशास्त्रावर काम करणे आवश्यक आहे, तर त्याने एकच काम करायचे, की पुस्तक संग्रहालयात जाऊन वृक्षआयुर्वेदावरची धूळ झटकायची. यावर कोणी म्हणेल, की संस्कृत ही तर मृत भाषा आहे; पण ही भाषा कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी उपयुक्त असल्याचे एका विद्यापीठाने (जर्मन, रशियन वा शक्यतो अमेरिकनच!) सिद्ध केले आहे. जगात ठिकठिकाणी संस्कृतवर संशोधन सुरू आहे. आता असे संशोधन लॅटिन वा हिब्रूवरही सुरू असते या म्हणण्यात काहीही अर्थ नाही. संस्कृत हीच सर्वात थोर भाषा आहे, हे तसेही आपणांस अनेक विद्वानांनी (जर्मन, ब्रिटिश वा शक्यतो अमेरिकनच!) सांगितले आहेच. तेव्हा केवळ आयआयटीतील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिशुवर्गापासूनच संस्कृत सक्तीचे करणे आवश्यक आहे. देशास ज्ञान-विज्ञानाच्या मार्गावरून पुढे न्यायचे, तर देशाने आधी सु-संस्कृत बनलेच पाहिजे. इदम् कालस्य आवश्यकताम् अस्ति!