पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी पालिकेच्या नगरसेवकांची संख्या ११ ने वाढून १३९ होणार आहे. त्याचप्रमाणे, तीनसदस्सीय एका प्रभागाची मतदारसंख्या साधारणपणे ३५ ते ४० हजार असू शकेल, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूक आयोगाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विशेष मतदार नोंदणीची माहिती आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे या वेळी उपस्थित होते.
आयुक्त म्हणाले,की १ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान ही मोहीम होणार आहे. ज्या व्यक्तीचे वय १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक असेल त्यांना नावनोंदणी करता येणार आहे. नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करताना मतदार यादीतील तपशील तपासून घ्यावा. चुका असल्यास दुरुस्त्या कराव्यात. मतदार ओळखपत्र आहे म्हणजे मतदान करु शकतो, असे नाही. त्यासाठी मतदार यादीत नाव आवश्यक आहे. मतदार नोंदणीचे अर्ज पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात देण्याची व स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आयुक्त म्हणाले,की पालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली आहे. सध्याच्या सदस्यसंख्येनुसार (१२८) आराखडा तयार आहे. नगरसेवकांची संख्या ११ ने वाढणार आहे. त्यामुळे नव्याने प्रभागरचना करावी लागेल. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार इतकी गृहीत धरण्यात आली असून मतदारसंख्या १४ लाख ५९ हजार आहे. नवमतदारनोंदणी मोहिमेनंतर मतदारांची संख्या वाढलेली असेल. करोनाकाळात बरेच नागरिक स्थलांतरित झाले आहेत, याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले.
प्रभागरचनेसाठी राजकीय दबाव नाही
राजकीय नेत्यांच्या घरात तथा कार्यालयांमध्ये बसून प्रभागांची रचना अंतिम केली जाते, अशी िपपरी पालिकेची अघोषित परंपरा आहे. या पाश्र्वभूमीवर, आयुक्तांकडे विचारणा केली असता, प्रभागरचना करताना आतापर्यंत तरी कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आला नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही कारणास्तव निवडणुका लांबणीवर जातील की नाही, याविषयी आताच काही सांगता येणार नाही, असे ते म्हणाले.