आयपीएलचा तेरावा हंगाम आता जवळ येऊन ठेपला आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाची स्पर्धा ही युएईत खेळवली जाणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा रंगेल. सर्व संघ तेराव्या हंगामासाठी सज्ज झाले असून पंजाब, राजस्थान यासारख्या संघांनी सरावालाही सुरुवात केली आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक खेळाडूंनी विविध संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र आयपीएलमधील आठही संघाचं प्रतिनिधीत्व करण्याचा मान हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आणि सध्याचा वन-डे कर्णधार अ‍ॅरॉन फिंचच्या नावावर जमा आहे. तेराव्या हंगामात फिंच विराट कोहलीच्या RCB कडून मैदानात उतरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१० साली आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या फिंचने पहिल्या वर्षी राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधीत्व केलं. यानंतर पुढची दोन वर्ष म्हणजेच २०११ आणि २०१२ या वर्षांसाठी फिंच दिल्ली डेअरडेविल्स (आताचं दिल्ली कॅपिटल्स) चा सदस्य होता. २०१३ साली फिंच पुणे वॉरियर्स इंडिया, २०१४ साली सनराईजर्स हैदराबाद संघांकडून खेळला. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच २०१५ साली मुंबईने फिंचला विकत घेतलं, मात्र ३ सामने खेळल्यानंतर दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती.

२०१६ आणि २०१७ हे दोन हंगाम फिंच गुजरात लायन्स संघाकडून मैदानात उतरला होता. २०१८ साली किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने त्याला विकत घेतलं. २०१९ साली पार पडलेल्या आयपीएल हंगामात फिंचने सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. विश्वचषकाच्या तयारीसाठी फिंचने हा निर्णय घेतला होता. यानंतर २०२० च्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावात RCB ने फिंचवर बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं. आयपीएलच्या इतिहासात विराटच्या RCB संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही, त्यामुळे यंदा फिंचच्या येण्यामुळे संघात काही बदल घडतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : विराटचा भार फिंच, डिव्हीलियर्स कमी करु शकतात !

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaron finch becomes first player to represent 8 team in ipl history psd
First published on: 28-08-2020 at 15:21 IST