मुंबई : दहिसर-आरे मेट्रो मार्गिकेवरील मेट्रो गाडय़ांच्या ताफ्यात सोमवारी एका नवीन मेट्रो गाडीची भर पडली आहे. ‘घरोघरी तिरंगा’ या संकल्पनेवर आधारित रंगरंगोटी केलेल्या नव्या मेट्रो गाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखविला. आता मंगळवारपासून ही गाडी दहिसर-आरे मार्गिकेवर धावणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईतील वाहतूक सेवेत एप्रिलपासून दुसरी मेट्रो मार्गिका दाखल झाली आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओपीएल) माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या या मेट्रो मार्गिकेवर सध्या आठ मेट्रो गाडय़ा धावत आहेत. आता मंगळवारपासून यात एका गाडीची भर पडणार असून एकूण गाडय़ांची संख्या नऊ होणार आहे. या गाडीमुळे आता दोन गाडय़ांमधील अंतर कमी होऊन दहा मिनिटांवर येणार आहे. तसेच मेट्रोच्या फेऱ्या वाढून १७२ होणार आहेत. 

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन मेट्रो गाडी सेवेत दाखल झाली असून यामुळे मेट्रो सेवेला बळकटी मिळणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे भविष्यात वाहतुकीचा एक उत्तम पर्याय नागरिकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे रेल्वेवरील ताण कमी होईल, वाहतूक कोंडी दूर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या कामाला वेग द्या आणि मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करा. राज्य सरकार यासाठी आवश्यक ती सर्व मदत एमएमआरडीएला करेल, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी या नव्या मेट्रो गाडीचे ‘आझादी एक्स्प्रेस’ असे नामकरण केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.