वायू चक्रीवादळाचा फटका बुधवारी दुपारी पश्चिम रेल्वेला बसला आहे. पालघरमधील बोर्डी स्थानकाजवळ वाऱ्यामुळे पाच गर्डर झुकल्याने पालघर मार्गावरील लोकल सेवा आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वायू चक्रीवादळ गुरुवारी गुजरातमध्ये धडकणार असून या वादळाचा परिणाम बुधवारी मुंबईत जाणवला. मुंबई आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली असून किनारपट्टीवरील भागात जोरदार वारे वाहत आहेत. दुपारी या वादळाचा फटका पश्चिम रेल्वेलाही बसला. पालघरमधील बोर्डी स्थानकात वाऱ्यामुळे गर्डर झुकले. यामुळे पालघर मार्गावरील लोकल गाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून दुरुस्तीकाम सुरु असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पश्चिम रेल्वेने या वादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बैठक घेतली. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवली जाणार आहे. किनारपट्टीलगतच्या भागांमधील रेल्वेच्या विभागीय मंडळांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. गांधीधाम, भावनगर पारा, पोरबंदर, वेरावल, ओखा या भागांसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. या वादळाचा फटका बसणाऱ्या भागांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी ही विशेष गाडी सोडली जाणार आहे.