हंदवाडामध्ये दहशतवाद्यांपासून नागरिकांना वाचवताना आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या पाचही सुरक्षा कर्मचाऱ्यांचा भारताला अभिमान आहे असे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या प्रत्येक कृतीला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असेही लष्करप्रमुखांनी सांगितले.
लष्करप्रमुख नरवणे यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. या भागात शांतता राखण्याची जबाबदारी पाकिस्तानची असल्याचे त्यांनी सांगितले. “पाकिस्तानकडे दूरदृष्टीचा अभाव असून दहशतवादी भारतात पाठवण्याचा त्यांचा अजेंडा कायम आहे. पाकिस्तान जो पर्यंत दहशतवादाला प्रोत्साहन देणे बंद करत नाही, तो पर्यंत आम्ही त्यांना प्रत्युत्तर देत राहणार” असे नरवणे यांनी सांगितले.
घुसखोरीच्या घटनांवरुन पाकिस्तानला Covid-19 विरोधात लढा देण्यात काहीही रस नसल्याचे दिसते असे नरवणे म्हणाले. हंदवाडा एन्काऊंटरमध्ये कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह मेजर अनुज सूद, नायक राजेश कुमार, लान्स नायक दिनेश सिंह आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील सब इन्सपेक्टर सागीर पठान शहीद झाले. २१ राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा हे या चार जणांसह दहशतवादी लपलेल्या घरामध्ये घुसले होते.
मागच्या पाच वर्षात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेले कर्नल रँकचे ते पहिले अधिकारी आहेत. यापूर्वी जानेवारी २०१५ मध्ये ४२ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल एमएन राय आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये ४१ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. कर्नल आशुतोष शर्मा यांच्या पश्चात पत्नी आणि १२ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ते बऱ्याच काळापासून काश्मीर खोऱ्यामध्ये तैनात होते.
‘बलिदान विसरणार नाही’
काश्मीर खोऱ्यातील हंदवाडा येथे दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेले अधिकारी आणि जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. “हंदवाडा चकमकीत शहीद झालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली, त्यांचा पराक्रम आणि बलिदान कधीही विसरणार नाही. त्यांनी पूर्णपणे निष्ठेने देशाची सेवा केली. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अविश्रांत मेहनत घेतली” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
