‘इग्नू’ विद्यापीठाविषयक महत्त्वाची माहिती :
=    शाह समिती १९८३ : पार्थ सारथी समितीविषयी वेळेत निर्णय न झाल्याने आगामी काळात मुक्त विद्यापीठाच्या मागणीसाठी  पाठपुरावा करण्यात आला. त्याकरता १९८३ मध्ये डॉ. माधुरी शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीनेही मुक्त विद्यापीठ स्थापनेची शिफारस केली.
= ‘इग्नू’तर्फे ‘ज्ञानदर्शन’ ही दृकश्राव्य वाहिनी आणि ‘ज्ञानवाणी’ हे रेडिओ केंद्र चालवले जाते.
= जानेवारी २०१० युनिस्कोतर्फे ‘इग्नू’ला ‘जगातील सर्वात मोठे विद्यापीठ’ म्हणून मान्यता देण्यात आली.
= भारतीय भूदलातील शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाना उच्चशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘ज्ञानदीप’  कार्यक्रम सुरू करण्यात आला. असाच कार्यक्रम हवाई दलासाठी ‘आकाशदीप’ या नावाने तर नौदलासाठी ‘सागरदीप’ या नावाने सुरू करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (YCMOU) : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर राज्य सरकारने
१ जुल १९८९ रोजी नाशिक येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाचे मुख्यालय नाशिक येथे असून विद्यापीठाची ८ प्रादेशिक केंद्रे आहेत. (प्रादेशिक केंद्र- नागपूर, नांदेड, अमरावती, कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद.)
या विद्यापीठामार्फत राबवले जाणारे प्रमुख उपक्रम :
= पर्यावरण जनजागृती सीडीज तयार करणे = भ्रमण अध्यन केंद्र : दुर्गम खेडी व आदिवासी भागांमध्ये भ्रमण अध्ययन व्हॅन यांच्या साह्याने शिक्षणाचा प्रसार करण्यात येतो. = दाई प्रशिक्षण कार्यक्रम : हे विद्यापीठ दाईंना प्रशिक्षण देण्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम राबवते. = ‘आरोग्य मित्र राष्ट्रीय ग्रामीण मिशन’ अंतर्गत महत्त्वाचा घटक असलेल्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘आरोग्य मित्र’ नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
पुरस्कार : या विद्यापीठांमार्फत खालील पुरस्कार देण्यात येतात- विशाखा काव्य पुरस्कार, बाबुराव गौरव पुरस्कार, सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या महिलेला रुक्मिणी पुरस्कार, महिलांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीला श्रमसेवा पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार, दूरशिक्षण क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला ज्ञानदीप पुरस्कार.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) : १९४५ मध्ये केंद्रीय सल्लागार मंडळाच्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने देशाचा औद्योगिक विकास साधण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील शिखर संस्था म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण समितीची स्थापना केली. १९८७ मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ‘एआयसीटीई’ कायदा संमत केला. या कायद्यानुसार संपूर्ण भारतात तंत्रशिक्षणाचा योग्य योजनाबद्ध व सुसूत्रबद्ध विकास साधण्यासाठी वैधानिक अधिकार देण्यात आला. देशातील तंत्रशिक्षणातील प्रचार, प्रसार व दर्जाबाबत निर्णय घेण्यासाठी अधिकार देण्यात आले.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची रचना :  एआयसीटीई  संस्था ५१ सदस्यीय आहे. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य सचिव आदी कायमस्वरूपी अधिकारी असतात. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विविध खात्याचे प्रतिनिधी लोकसभा, राज्यसभा, राज्य सरकारमधील, केंद्रशासित प्रदेशांतील खात्यांचे प्रतिनिधी तसेच ‘एआयसीटीई’च्या वैधानिक मंडळांचे व त्यांच्या विविध समित्यांचे प्रतिनिधी या परिषदेवर असतात.
कार्यकारी परिषद : या संस्थेची कार्यकारी परिषद २१ सदस्यीय आहे. ‘एआयसीटीई’ने नेमून दिलेली कामे कार्यकारी परिषद पार पाडते. ‘एआयसीटीई’चे अध्यक्षच  कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष असतात आणि ‘एआयसीटीई’चे उपाध्यक्ष  कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष असतात.
प्रादेशिक समित्या : भारतातील विविध भौगोलिक प्रदेशांत ‘एआयसीटीई’ने प्रादेशिक समित्या स्थापन केल्या. परिषदेला नियोजन व नियंत्रणांसंबंधित सर्व क्षेत्रांत मार्गदर्शन व मदत करण्याचे कार्य या प्रादेशिक समित्या करतात.
एआयसीटीईचे विभाग : अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, स्थापत्य व्यवस्थापन व औषधनिर्माण, दर्जा शाश्वती,  नियोजन व समन्वय, संशोधन व संस्थात्मक विकास, विद्या शाखा विकास खाते, प्रशासन आणि वित्त.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com