घरात बाळ जन्माला येणं ही घरातल्या माणसांसाठी एक अत्यंत आनंददायक आणि उत्साहवर्धक घटना असते. बाळाचं आगमन झालं की आजी बाळाच्या आईची बडदास्त ठेवायच्या मागे लागते. बाबा घर आणि हॉस्पिटल यांच्या चकरा मारायला लागतो आणि नवजात आई बाळाच्या संगोपनासाठी सज्ज होते. बाळाचा आणि त्याच्या आईचा दिनक्रम दोन दिवसांत मार्गी लागला की आजी हुश्श करते. नंतरच्या दोन दिवसांत वेगवेगळे तज्ज्ञ येऊन वेगवेगळे सल्ले आणि सूचना द्यायला लागतात. ते ऐकून बाळाच्या आजीला प्रश्न पडतो, आपल्याला आणि आपल्या मुलांना ज्या गोष्टींचा काही म्हणजे काहीच त्रास झाला नाही, त्यांचा आपल्या नातवंडाला कसा होईल? पण चतुर आजीच्या लक्षात येतं, आपल्या घरात जन्माला आलेलं बाळ एकविसाव्या शतकातलं आहे. या बाळाचा बाबा (किंवा आई) आता तिशीच्या आसपास आहे, म्हणजे आपला अनुभव तीस वर्षांपूर्वीचा आहे, या तीस वर्षांत जग किती पुढे गेलंय. म्हणजे गर्भधारणा, गरोदरपण, मूल जन्माला येणं या नसíगक घटनांमध्ये काहीच फरक पडला नाहीये, पण या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची माणसाची नजर आणि मानसिकता मात्र आमूलाग्र बदलली आहे.

काळ बदलला असं आपण उठताबसता म्हणत असतो. पण किती बदललाय? बदलत्या आहार आणि जीवनशैलीमुळे स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञ आणि नुकत्या जन्मलेल्या बाळाला काही दुर्धर विकार नाही याची खात्री करण्यासाठी बालरोगतज्ज्ञ प्रसूतीच्या वेळी हजर असणं हे गरजेचं झालं आहे. पण आता हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग लॅक्टेशन काऊन्सेलर (’ूं३ं३्रल्ल ू४ल्ल२ी’’१) पण असतात. बाळाला दूध कसं पाजायचं याची शिकवणी! एखादी आई एकटी असते, तिच्याजवळ कुणी वडीलधारी, अनुभवी बाई नसते, तिला अशा तज्ज्ञांची गरज भासू शकते. पण आपली मुलं व्यवस्थित वाढवलेली अनुभवी आई आणि सासू जिच्या पाठीशी आहे, तिलाही अशा विकतच्या तज्ज्ञांची गरज आहे असं का गृहीत धरतात हॉस्पिटलची माणसं? बाळ जन्माला आल्यानंतर त्याची समग्र तपासणी करून झाली तरी एखाद्या बाळाला नंतर काही त्रास उद्भवू शकतो. त्या वेळी फोन करून बालरोगतज्ज्ञांना पुन्हा बोलावता येतं. विनाकारण सकाळ-संध्याकाळ त्यांची फेरी कशाला? आणि या विविध तज्ज्ञांना किंवा काऊन्सेलरना बोलावताना घरच्यांना विचारलेलं नसतंच की अशा काही तज्ज्ञांची तुम्हाला गरज वाटते आहे का? बिलाचा आकडा फुगला की हे लक्षात येतं, पण विचारणार कोण आणि कोणाला?

बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याच्या आनंदात त्या फुगलेल्या आकडय़ाकडे लक्ष द्यावंसं वाटत नाही.

आईचं दूध पिणाऱ्या बाळाला वेगळं पाणी देण्याची फारशी गरज नसते, असं म्हणतात. मुंबईसारख्या शहरात (जिथे उन्हाळा हा एकच मुख्य ऋतू असतो) बाटलीने दूध पिणाऱ्या बाळाला पाणी द्यायची गरज नाही असं ऐन उन्हाळ्यात सांगणारे डॉक्टर जर फॉरेन रिटन्र्ड असले तर ते जे सांगतील ते बाळाच्या आई-बाबांसाठी ब्रह्मवाक्यच असतं. पण आपलं शिक्षण तारतम्याने वापरायला ते शिकलेले नाहीत हे आजीला लगेच कळतं. आईच्या खाण्या-पिण्याचा बाळावर काही परिणाम होत नाही- काहीही खा, असं ऐकलं की आजीला प्रश्न पडतो की, आईकडूनच जीवनरस घेऊन ते बाळ तिच्याच पोटात पोसलं गेलंय आणि जन्मानंतरही आईच्या शरीरात तयार झालेला जीवनरस पिऊनच ते वाढतंय. मग तिच्या पोटात जे अन्न जाईल, त्याचे गुणधर्म बाळाच्या पोटात जाणारच ना! आणि ते त्याला नाही मानवले तर बाधणारच! काही बाळांचे डोळे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पिवळसर दिसतात. अतिशय सौम्य कावीळ असते. अनुभवी डॉक्टरना कावीळ किती सौम्य आहे आणि त्यासाठी काय करायचं ते नजरेने आणि बाळाला तपासून कळतं. (पूर्वी कळत असे) पण अलीकडे त्या इवल्याशा बाळाचं रक्त काढून तपासणीसाठी पाठवलं जातं. ‘लेट अस नॉट टेक एनी रिस्क’ असं म्हटलं की बाळाच्या घरची माणसं काही प्रश्न विचारत नाहीत हे अनुभवाने माहीत असतं. किती वेळा खरोखर अशा तपासणीची गरज असते, किती वेळा डॉक्टरांचा आत्मविश्वास कमी पडतो आणि किती वेळा संबंधितांचे हितसंबंध महत्त्वाचे ठरतात ते सांगणं कठीण आहे. जन्मत: काही गुंतागुंत असेल तर बाळावर विशेष उपचार करावे लागतात. बाळाच्या पालकांना विशेषकरून आईला सांगितल्याशिवाय बाळावर कोणतेही उपचार करायचे नाहीत असा आदेश आधुनिक वैद्यकशास्त्र देतं. पण त्यामुळे आईच्या तब्येतीवर काही विपरीत परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोणावर? गरोदरपणात इन्सुलिन घ्यावं लागलेल्या एका आईला तुमच्या बाळाचं रक्त उद्या बदलायचं आहे असं सांगितल्यावर तिच्या रक्तातली साखर झपकन तासाभरात वाढलेली मी पाहिली आहे.

वर्षांनुवष्रे ज्या पद्धती वापरल्या गेल्या आणि काही दुर्दैवी अपवाद वगळता त्याचे कोणतेच तोटे झाले नाहीत, अगदी बाळाच्या आई-बाबांनासुद्धा काहीही त्रास झाला नाही, त्या सगळ्या पद्धती टाकून देऊन पाश्चात्य विद्या शिकलेल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीच वापरायच्या. कित्येकदा हे सांगणारे डॉक्टर पुरुष किंवा अविवाहित स्त्रिया असतात, बाळ जन्माला घालून त्याचं संगोपन करायचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना नसतो. पण त्यांच्या पुस्तकी पांडित्यापुढे आपल्या व्यावहारिक अनुभवाची किंमत शून्य. ‘तिकडच्या’ संशोधक डॉक्टरांना जेव्हा कोरफड, हळद, आलं, कडुिलब यांचे औषधी गुणधर्म कळले तेव्हा त्यांनी त्याचा ठेका (पेटंट) घेण्यासाठी घाई केली आणि डॉ. माशेलकरांसारख्या जागरूक संशोधकाच्या लढाईमुळे हळदीचं पेटंट थांबलं. (आपल्याकडे मात्र बाळाला अंघोळ घालताना अंगाला हळदमिश्रित उटणं लावायला बंदी.) आईचा ‘फॉर्म’ बिघडतो या गरसमजापोटी मधल्या एक-दोन पिढय़ा बाटलीच्या दुधावर पोसल्या, आईच्या दुधाची स्तोत्रं ‘तिकडून’ प्रसारित झाल्यावर आपल्याकडच्या सुशिक्षित(!) आयांना स्तनपानाचं महत्त्व पटलं. आणि आता तर ‘मिल्क बँक’ सर्रास असतात.

काही कारणाने वरचं दूध द्यावं लागलं तर साय काढलेल्या गाईच्या दुधापेक्षा कृत्रिमरीत्या तयार केलेलं डब्यातल्या पावडरचं दूधच चांगलं असं डॉक्टर सांगतात ते आपण मुकाट ऐकायचं. किंवा साय काढलेलं म्हशीचं दूध. विशेष म्हणजे परदेशात क्वचित कुठे म्हशीचं दूध वापरात असेल. तिकडे तर सर्रास गाईचंच दूध पिण्यासाठी आणि इतर उपयोगासाठी वापरतात. पण आमचे डॉक्टर्स म्हशीच्या दुधाचे पुरस्कत्रे. आल्याचा रस मध-पाण्यातून दिला तर तो गावठी उपचार, पण ‘जिंजर ज्यूस थेरपी’ म्हटलं की लगेच ते आधुनिक ठरतं. या  सगळ्यात एक टोकाची विरोधी गोष्ट घडत असते ती म्हणजे बाळाला फार हाताळू नका, बाळाच्या आईला विश्रांती घेऊ द्या असं डॉक्टरांनी बजावलं असलं तरी ‘भेटायला’ येणाऱ्यांची रांग मात्र मोठीच असते आणि दिवसअखेर आजचा ‘स्कोअर’ अशा शब्दात त्याची कौतुकमिश्रित दखलही घेतली जाते. गाढ झोपलेल्या बाळाला उचलून, कवटाळून त्याचे मुके घेणं हा प्रेम सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग असल्यासारखं ते बाळ इतकं हाताळलं, चिवळलं जातं की डॉक्टरांच्या सल्ल्याला तेवढय़ापुरतं तरी शून्य महत्त्व असतं. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या भारतीय वैद्यकशास्त्राने जे सांगितलं, ते सगळं ‘मिथ’ असं हे उच्चशिक्षित डॉक्टर सांगतात ते अनुभवी बायकांनी गुपचूप ऐकायचं, आपला अनुभव आणि घरगुती औषधांचं आई-आजीकडून मिळालेलं सामान्यज्ञान खुंटीला टांगून ठेवायचं आणि संपूर्ण वेगळी जीवनशैली आणि वातावरण असलेल्या पाश्चात्य देशातल्या डॉक्टरांनी शोधून काढलेल्या संगोपन पद्धती भारतीय डॉक्टर आपल्याला ‘शिकवतात’, त्या आंधळेपणाने स्वीकारायच्या. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मदतीने कॅन्सरसारखे दुर्धर रोग पूर्णपणे बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे, इतरही काही रोगांवर प्रभावी औषधे शोधली गेली आहेत- जात आहेत हे कोण नाकारेल? प्रसूतीदरम्यान होणारे अपमृत्यू कमी झालेत, संभाव्य धोके ओळखून वेळेवर उपाययोजना करणं शक्य झालं आहे, अगदी गर्भात असलेल्या बाळाचे आजारसुद्धा आधीच कळले तरी उपाय करता येतात. बुद्धिजीवी स्त्रिया आणि शरीर कष्ट करणाऱ्या स्त्रियांच्या खाण्या-पिण्यात फरक करणं गरजेचं आहे हेही आपण मान्य केलं तरी तेवढय़ाने काही कित्येक शतकांची आपली परंपरा कालबाह्य़ ठरत नाही. नवं स्वीकारताना जुनं पूर्णपणे फेकूनच दिलं पाहिजे असं कुठे आणि कुणी लिहून ठेवलंय?

बाळाला विशिष्ट कंपनीचा विशिष्ट ब्रॅण्डचा साबण लावायचा- घरी केलेलं सुगंधी उटणं नाही, गुटी घालायची नाही, कान टोचायचे नाहीत, कानात तेल घालायचं नाही, डोळ्यात काजळ घालायचं नाही, मालिश करायची गरज नाही, रोज सकाळीच अंघोळ घालायची असा आग्रह धरायचा नाही, अशा असंख्य सूचना करताना अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे मात्र कधी कधी डॉक्टरांचं दुर्लक्ष होतं.

या सगळ्यामुळे बाळाला होणारे त्रास हे आईच्या किंवा सुईणबाईच्या अज्ञानामुळे, अस्वच्छतेमुळे होत असतील, तर त्या बाबतीत काटेकोर काळजी घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित करायला हवी. डॉक्टर सांगतात ते ‘बिनबोभाट’ ऐकलं जातं याचा असा फायदा घेण्यात काहीच गर नाही.

गरोदर स्त्रीला आणि तान्ह्य़ा मुलाला पॅसिव्ह स्मोकिंग फार घातक ठरू शकतं तेव्हा बाळाच्या बाबाने ती सवय सोडणं हितकर आणि मोबाइल रेडिएशनच्या दुष्परिणामांची इतकी चर्चा सगळीकडे होत असताना तान्ह्य़ा बाळाच्या आसपास मोबाइलचा वापर करू नका हे कोणताही डॉक्टर सांगत नाही. हॉस्पिटलमध्येसुद्धा आईला उशाशी मोबाइल लागतो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अड्डय़ांवरून ती जगाच्या संपर्कात असते आणि बाळाचे छोटे छोटे अपडेट्स देत राहते. कित्येक डॉक्टर तर ऑपरेशन करताना स्वत:च मोबाइलवर बोलत असतात. विज्ञानाच्या प्रगतीचे फायदे असतात तसे तोटेही असतात आणि फायदे उचलताना तोटय़ांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. परंपरेचा किंवा आधुनिक वैद्यकशास्त्राचा अनाठायी, अतिरेकी आणि आंधळा आग्रह धरायचा की दोन्हीचा समन्वय साधून आपलं आणि आपल्या बाळाचं आरोग्य सांभाळायचं याचा निर्णय तारतम्याने घ्यायला हवा.

या सगळ्या कोलाहलात आपली बुद्धी आणि अनुभव गुंडाळून ठेवून डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत पाळणारी, बाळावर आणि त्याच्या आईवर मनापासून प्रेम करणारी, त्यांची काळजी घेणारी ‘बिनपगारी आया’ ही भूमिका आजीच्या वाटय़ाला येते. ती नाकारण्याचं स्वातंत्र्य तिला असतं, पण नातवंडाच्या जावळाचा सुगंध आणि चेहऱ्यावरचं निव्र्याज, लोभस हसू तिला ते स्वातंत्र्य घेऊ देत नाही. लेकी-सुनेचं बाळंतपण तिच्यासाठी स्वत्व विसरण्याचा ‘पण’ घेऊन येतं. आजीला तो जिंकू द्यायचा की स्वाभिमानी स्त्रीने तो झुगारून द्यायचा, या नव्या लढाईला सामोरी जाते आहे एकविसाव्या शतकातली आजी.
राधा मराठे – response.lokprabha@expressindia.com