News Flash

नाते म्हणजे कमळाचे जाळे

मानव जन्माला येतो तो एकटाच येतो व जाताना एकटाच जातो.

१५ दिवसांपूर्वी वृत्तपत्रात एक बातमी वाचली. ती अशी ‘एका तरुण मुलाने इस्टेटीसाठी आईला मारण्यासाठी आपल्या मित्रांना सुपारी दिली.’ दुसरी बातमी अशी होती- ‘एका २५  वर्षांच्या तरुणीने आपल्या तीन अपत्यांना विहिरीत टाकले व नंतर स्वत:ही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.’

वरील दोनही बातम्या धक्कादायक, अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. नातेसंबंधांना सुरुंग लावणाऱ्या होत्या, नव्हे मनाचा तळ ढवळून काढणाऱ्या होत्या. त्यातूनच नात्यासंबंधी विचारचक्र सुरू झाले.

मानव जन्माला येतो तो एकटाच येतो व जाताना एकटाच जातो. पण मधल्या आयुष्याच्या वाटचालीत तो असंख्य नात्यांच्या जंजाळात अडकतो. इतका अडकतो की त्यात त्याची घुसमट हाते, तो गुदमरतो. काही काही नात्यातून त्याची सुटकाच नसते. कमळाच्या जाळ्याप्रमाणे हे जाळे असते. एकदा पाय अडकला की त्यातून सुटणे महाकठीण! काही फार थोडे महाभाग असे असतात की ज्यात ते फारसे अडकत नाही आणि जरी अडकले तरी मोठय़ा शिताफीने त्यातून आपली सुटका करून घेतात.

बरे, ही नाती तरी किती प्रकारांची? आई-वडिलांचे, भावाबहिणीचे, पति-पत्नीचे, नणंद-भावजयीचे, काका-काकू, आत्या-मामा, मावशी-काका, पुन्हा त्यात सख्खे, सावत्र, चुलत, मावस इत्यादी- अगणित- त्याचबरोबर शेजाऱ्याशी नाते, गाववाल्याशी नाते, समाजाशी नाते, दोन घराण्यांशी नाते, मैत्रीचे नाते, मातृभूमी, देश, इतकेच नव्हे, तर अखिल मानव जताीशी नातेसंबंध, पशु-पक्षी, प्राणिजगत, वृक्षवल्ली यांच्याशी नाते ते वेगळेच- अगदी स्वत:शीदेखील एक आगळे नाते.. नाते.. नातेच..नाते..

पण मुळातच हा शब्द फोल आहे. मला वाटते जे मुळातच नसते ते ‘ना-ते’. आकर्षक शब्दांच्या महिरपीने सजवलेल्या भावभावना! पाण्यावर उठणारे विविध तरंग..! निव्वळ फसवेगिरी!

खरे पाहता मानव हा निसर्गाचाच एक भाग! मग पशुपक्ष्यांप्रमाणे त्याने आपले जीवन का जगू नये? पिल्लांना उडण्याचे बळ आले, दाणा मिळविण्याची त्यांच्यात क्षमता आली की ते आकाश कवेत घेण्यासाठी उंच झेप घेतात. कौतुकनजरेने पक्षी त्या भरारीकडे पाहतात. ते अपेक्षा करीत नाहीत की आम्ही पिल्लांना जन्म दिला.. कष्टाने सांभाळ केला- उडण्याचे कौशल्य दिले, किती अनंत उपकार आमचे त्यांच्यावर! त्यांनी मागे वळून बघावेच. आमची विचारपूस करावी- या- ना त्या प्रकारे आमचे पांग फेडावेत..

अशा प्रकारे पाखरांच्या जगता काही नियम नसतात. मग आपल्या मानवाच्या जगात ही नात्यांची बंधने कशाला? जन्म देणे म्हणजे फार मोठा पराक्रम नव्हे. ती तर एक निसर्ग घटना.. त्याचा एवढा बाऊ कशाला करायला हवा?

पाखरांप्रमाणे त्यांनाही मनाप्रमाणे कुवतीप्रमाणे स्वच्छंद उडू द्या ना! नात्यांचे अडसर कशाला हवेत त्यांच्या मार्गात? सल्ल्याचे डोस हवेतच कशाला? त्यांना धडपडू द्या, थोडे खरचटू द्या, जरासे हळहळतील- पण नंतर आत्मविश्वासाने सावरतील! नव्या जोमाने धावतील! ही स्वनिर्णयाची आनंदी- दिवाळी साजरी करू द्या ना त्यांना. मळकट, मंद प्रकाशाच्या दिव्यात त्यांना योग्य वाट कधीच दिसणार नाही. (काही अपवाद वगळून) तेव्हा नात्याच्या बंधनातून त्यांना मुक्त करू या.

तसे पाहता जवळजवळ सगळीच नाती (एक-दोन वगळता) देवाण-घेवाणीवर अवलंबून असतात. दर राखीपौर्णिमेला न चुकता भावाला राखी बांधणारी बहीण आपण बघतो. पण २० एकर शेतीमध्ये भावाने हिस्सा दिला नाही म्हणून जन्मभर त्याचे तोंड न पाहण्याची शपथ घेतलेली बहीणही आपल्या अवतीभोवती दिसतेच की! अमेरिकेत वास्तव्य करणारा मुलगा आईची रवानगी वृद्धाश्रमात करताना दिसतोच की! क्वचितप्रसंगी मुलगा-सुनेची कटकट नको म्हणून स्वतंत्र जीवन जगणारे आईवडील सापडतातच ना!

तेव्हा नाती वगैरे सगळे खोटे आहे, फसवे आहे. संतांनीच हे सांगून ठेवले आहे.

‘नको येरझारा, नको हा पसारा

सरो मोह सारा मनीच्या विकारा’

किंवा –

‘‘नाही कुणी कुणाचा

हा नेम ह्य जगाचा

संबंध-बंधनाच्या मोहात

का पडावे?’’
सुधा नरवाडकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2016 1:34 pm

Web Title: article by reader nate mahnaje kamlache jale
Next Stories
1 एकविसाव्या शतकातली आजी!
2 जिम पोरी जिम
3 वृक्षमित्र
Just Now!
X