साहित्य :पारीकरिता :१ वाटी बेसन, हळद, १ छोटा चमचा ओवा, चवीपुरते मीठ.
सारणाकरिता : २-३ चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, २ चमचे खसखस, २ चमचे धणे, १ चमचा जिरे, ६-७ काळी मिरी, जायपत्री, दालचिनी, ३-४ सुकी लाल मिरची, हळद, चवीपुरते मीठ.
रस्साकरिता : २ कांदे, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस, आले, लसूण, गरम मसाला पावडर, हळद आवश्यकतेनुसार तिखट, मीठ.
कृती : आधी सारण तयार करून घ्यावे. सारणाकरिता लागणारे सर्व साहित्य कढईत भाजून घ्यावे. नंतर मिक्सरमध्ये बारीक करावे.
आता रस्साकरिता कांदा उभा कापून तेलात परतवणे. सुके खोबरेपण थोडे भाजून घ्यावे. आले, लसूण घालून मिक्सरमध्ये बारीक करावे. कढईत तेल घालून फोडणी करून हा बारीक केलेला मसाला, हळद, आवश्यकतेप्रमाणे तिखट, घालून चांगला तेल सुटेपर्यंत परतावा.
आता पाणी घालून रस्सा तयार करावा. पारीकरिता बेसन पीठात हळद, ओवा, मीठ, तेल घालून घट्ट भिजवावे. त्याचे छोटे-छोटे गोळे करावे. एक गोळा घेऊन त्याची छोटी पारी करून त्यात वरील सारण भरून मोदकाचा आकार द्यावा. रस्साला उकळी आल्यावर एक-एक करून रस्सात सोडावी. सगळे घालून झाल्यावर ५ मिनिटे मंद आचेवर ठेवा.
हे मसालेदार लबाड वांगी गरम-गरम पोळी किंवा भाकरीबरोबर छान लागतात. ह्य़ा पदार्थात वांगी नाही, पण भरलेली वांगीसारखा मसाला असल्यामुळे लबाड वांगी.
टीप : भरलेली वांगी रस्सात सोडताना घाई करू नये. रस्साला उकळी आल्यावरच एक-एक सोडावे, नाही तर फुटण्याची शक्यता असते.

तिळगुळाचे तळलेले मोदक
साहित्य :
तिळगुळाकरिता : १ वाटी तीळ, अर्धी वाटी किसलेले सुके खोबरं,  पाऊण वाटी गूळ, १ छोटा चमचा सुंठ पावडर, १ चमचा वेलची पावडर.
पारीकरिता : २ वाटय़ा मैदा, १ वाटी बारीक मैदा, ३-४ चमचे तेल, १ वाटी दूध पीठ भिजवण्याकरिता, तळण्याकरिता तूप.
कृती : तिळगुळाचे सारण करण्याकरिता तीळ आणि सुके खोबर थोडे कढईत भाजून घ्यावे. गूळ थोडा सुरीने बारीक करावा. तीळ, सुके खोबरं आणि गूळ मिक्सरमध्ये एकत्र फिरवावा. नंतर त्यात सुंठ पावडर, वेलची पावडर आणि थोडी चारोळी घालून सारण चांगले एकत्र करावे.
पारीकरिता रवा, मैदा एकत्र करून त्यामध्ये थोडे गरम तेलाचे मोहन घालावे. नंतर दूध घालून घट्ट भिजवावे. थोडा वेळ ओल्या कपडय़ाने झाकून ठेवावे. नंतर पीठ चांगले मळून त्याचे छोटे छोटे गोळे करावेत. त्याची पातळ पापडी लाटून त्यात मोदकाचे सारण भरून मोदक वळावे. नंतर तुपात गुलाबीसर रंगावर तळून घ्यावे.
माघ महिन्यातल्या तिलकुंद चतुर्थीला तिळगुळाच्या मोदकचे नैवेदय़ दाखवतात.

गुळाची पोळी
साहित्य : पाव वाटी गूळ, २ चमचे तूप, अर्धा कप दूध, २ कप गव्हाचे पीठ, चवीपुरते मीठ.
कृती : गुळात थोडे पाणी घालून भिजत ठेवावा. दूध गरम करून, एका ताटात दूध आणि तूप थोडे फेसावे. त्यामध्ये गुळाचे पाणी घालावे. आता आवश्यक तेवढे गव्हाचे पीठ घालून घट्ट कणिक भिजवावी. एक छोटा गोळा घेऊन पोळी लाटावी. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी तव्यावर चांगली शेकावी. नंतर तुपाचा हात लावून ठेवावा.
शेंगदाणा चटणी किंवा तुपाबरोबर छान लागते. ह्य़ा  पोळी ४-५ दिवस चांगल्या राहतात, त्यामुळे प्रवासात बरोबर घेऊ शकतात.
टीप : दूध आणि तुपामुळे पोळी नरम राहते.