प्रभा गणोरकर यांचे लेख मी नियमित वाचते. अफाट व्यासंग आहे त्यांचा.. आणि नेमकेपणाने सांगतात त्या लेखकाला काय म्हणायचे आहे ते! पात्रांच्या मनातील संवेदना, भावना, विचार, आंदोलनं.. जणू त्यांना त्या त्या पात्रांनी प्रकट होऊन सांगितली असावीत इतक्या नेमकेपणाने! १ डिसेंबरच्या अंकातील ‘सुनीता’लाही त्यांनी किती योग्य रीतीने जाणले आहे! त्या सगळे जे लिहितात ते ते मलाही आत आत कुठे तरी नेहमी जाणवत असते. विशेषत: स्त्रियांबद्दलचे लेखन, स्त्री लेखिका, समाजाची एकूणच स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी!

‘जीएं’ची मी अगदीच चाहती आहे. काय तेज धार आहे शब्दांना त्यांच्या! मागे एकदा ‘लक्ष्मी’ या त्यांच्या कथेबद्दल लिहिले होते. ती कथा वाचताना डोळ्यांत पाणी येते. ‘लक्ष्मी’च्या अवहेलनेच्या विचाराने मन विदीर्ण होते. प्रभाताईंची लेखणी ती वेदना अगदी लीलया वाचकापर्यंत पोचवते. इतक्या विशाल खजिन्यातले काही मोती तरी त्या वाचकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या दीप्तीनेही मन उजळून जाते..    – अश्विनी कीर्तने, पुणे

 

..तो लवकर सुसंस्कृत होतो

‘साठा उत्तराची कहाणी’ हे अरुण जाखडे यांचे ‘श्रेयस आणि प्रेयस’ १ डिसेंबरच्या अंकात वाचले आणि प्रकाशनाची बिकट वाट आपण वहिवाट का करू शकलात याचे रहस्य उलगडले. गावाकडे राहिलेली माणसं ही नशीबवानच असतात, पण हे त्यांपकी अनेकांना उमजत नाही आणि मग ते आपल्या प्रगतीतील धोंड या नजरेने त्या दिवसांकडे पाहतात. समोर आलेल्यातून काय वाचायचं आणि कसं वाचायचं हे ज्याला समजलं तो लवकर सुसंस्कृत होतो.

आपण नद्यांचा खळखळाट ऐकलात, पिकं पाहिलीत, झाडं, पक्षी अनुभवलेत यातून मिळणारी साक्षरता खूप कमी जणांना अनुभवता येते, निसर्गाने दिलेला हा आत्मविश्वास चिरंतन टिकतो हेच खरे. आपण खेडं जगलात, शहरातलं नवखेपण सोसलंत, कामगार वस्ती अनुभवलीत, उद्योग जगातल्या संक्रमणाचे साक्षीदार झालात, अपयश पाहिलंत, पुस्तकांच्या जगात येण्यापूर्वी मिळालेला हा समृद्ध कॅलिडोस्कोप हेच मला वाटतं तुमच्या या प्रवासातले तहानलाडू, भूकलाडू आहेत. प्रकाशन व्यवसाय ही तारेवरची कसरत का आहे हेही तुम्ही अत्यंत अभ्यासपूर्णपणे इथे मांडले आहे. इथे कर्जबाजारीपण येते, अपमान होतात, पराभव होतात हे तुम्ही मोकळेपणाने सांगितलेत. पण या व्यवसायातून मिळणार आनंद, नवे अनुभव घेण्याच्या संधी, नव्या नव्या साहित्यिक प्रकल्पात बुडी मारून सुखनिधान शोधण्याची धडपड हेच श्रेयस आणि प्रेयस आहे हे सांगून आपण या व्यवसायाचे मूल्य अधोरेखित केले आहे.   – केशव साठय़े

 

डॉक्टरदेखील हतबल

मी एक भूलतज्ज्ञ असून गेली २५ वष्रे नाशिकमध्ये अनेस्थेशियाची प्रॅक्टिस करतो. ‘नॉर्मल डिलिव्हरीची गरज’ हा डॉ. किशोर अतनूरकर यांचा २४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेला लेख उत्तमच. या लेखात मी एका गोष्टीची भर घालू इच्छितो. गेल्या २५ वर्षांत मी किमान २ हजार वेदनारहित प्रसूती (एपिडय़ुरल अनेस्थेशिया) केल्या. खरे तर २५ वर्षांच्या मानाने हा आकडा खूपच कमी म्हणायला हवा. पण रुग्ण आणि स्त्रीरोगतज्ज्ञ यासाठी फारसे उत्सुक नसल्यामुळे मीदेखील हतबल होतो. याबाबतची जागृती करण्याचा माझा अविरत प्रयत्न असतो.

डॉ. अतनूरकर यांच्या लेखानुसार स्त्रीला नॉर्मल डिलिव्हरी होणे हे चांगलेच वाटते. त्यात असणाऱ्या प्रचंड वेदना हाच मोठा प्रश्न असतो. तो प्रश्न एक भूलतज्ज्ञ म्हणून आम्ही सोडवू शकतो. शिवाय डिलिव्हरीच्या वेळी एक अतिदक्षता तज्ज्ञ (intensive care specialist) आपसूकच उपलब्ध होतो. तसेच समजा ऐन वेळी सिझेरिअनचा निर्णय झालाच तर काही मिनिटातच तो भूलसुद्धा देऊ शकतो.

माझ्या अनुभवानुसार वेदनारहित प्रसूतीच्या पर्याय निवडल्यास अगदी पहिल्या डिलिव्हरीची वेळसुद्धा १ ते २ तासांनी कमी होते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळी तर अक्षरश: १ तासातसुद्धा डिलिव्हरी झालेल्या आहेत. शिवाय आधुनिक ज्ञानानुसार ८० ते ९० टक्के वेदनांपासून मुक्ती मिळते. म्हणूनच हा पर्याय निवडण्याचा एक हक्क रुग्णास अवश्य असावा असे वाटते.   – डॉ. शशांक कुलकर्णी, नाशिक

 

मनोबल वाढले

२४ नोव्हेंबरच्या अंकात ‘अपूर्णाक’ या सदरामध्ये प्रथमेश दाते याच्या उत्तुंग कर्तृत्वाची माहिती मिळाली. वर्धा जिल्ह्य़ातील नालवाडी या छोटय़ाशा खेडय़ात राहणाऱ्या मलाही गतिमंदत्वाची समस्या आहे. त्यावर मी आईच्या मदतीने मात करण्याचा प्रयत्न करते आहे. सध्या माझे वय ३१ वष्रे आहे. मी प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण केलंय. एमएससीआयटी, मराठी, इंग्रजी टायपिंगसुद्धा प्रथम श्रेणीत केलंय. मागील वर्षी ग्रंथालय व्यवस्थापनाचा तीन महिने कालावधीचा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलाय. मानसिक आणि शारीरिक बळ वाढवण्यासाठी ज्युदो कराटेचे प्रशिक्षण घेते आहे. मधल्या काळात एका डीटीपी सेंटरमध्ये काम केले मात्र त्यांनी मानधन न देता कामावरून काढून टाकले. असे काही वाईट अनुभव आले. सध्या मी खूप वाचन खूप वाढवलं आहे. मी आत्मनिर्भर होण्यासाठी धडपडते आहे. अनेकदा नातेवाईकांचा खूप त्रास होतो. प्रथमेश यांच्याविषयी वाचून खूप मनोबल वाढले.   – स्वप्ना वानखडे, वर्धा

 

सामाजिक अभिसरणाचे चित्र

‘कार्यकर्त्यांच्या नजरेतून’ या सदरातील २४ नोव्हेंबरच्या अंकातील ‘जातीअंत आणि स्त्रियांचे स्वातंत्र्य’ हा अमर हबीब यांचा लेख वाचला. सामाजिक अभिसरणाचे चित्रच या लेखातून उमटले आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा त्यांचा दृष्टिकोन महत्त्वपूर्ण आहे. डायनासोरचे उदाहरण नेमके आणि समर्पक आहे. अमर हबीब यांच्या पत्नी आशा या आमच्या सोनोशी गावच्या. त्यांचे वडीलही प्रगत विचारांचे होते.    – डॉ. कैलास दौंड, सोनोशी, अहमदनगर</strong>

 

समृद्ध करणारे विचार

‘श्रेयस आणि प्रेयस’ या सदरातील २४ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या ऊर्मीला पवार यांच्या ‘मागे वळून पाहतच इथवर आले..’ या लेखातील विचार वाचताना आत्मचिंतन करू लागले आणि जीवन-विवेक सोप्या पद्धतीने आपण समजवलेय हे लक्षात आले. तुम्ही दिलेले गौतम बुद्धांच्या शिकवणीचे उदाहरण ‘वाईट कृत्य हे वाईट कृत्य केल्याने थांबत नाही तर त्याविरोधी आचरण केल्याने थांबते’, ‘क्रोधाला क्रोधातून नाही समुपदेशानाने शांत करता येते’, ‘डोळ्याला डोळा काढा ही शिक्षा असेल तर सर्व जग लवकरच आंधळे होईल..’ हे अप्रतिम विचार अंतर्मुख करणारे आहेत आणि आज जास्तच त्याची गरज वाटेत. तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन या लेखाद्वारे केले. समृद्ध करणारे विचार दिले.    – रंजन जोशी, ठाणे</strong>

 

प्रश्नांचे स्वरूप बदललेले नाही

‘हे चित्र बदलणार कधी?’ २५ नोव्हेंबरच्या ‘जागतिक महिला हिंसाचार प्रतिबंधक दिना’निमित्तचा मानसी होळेहोन्नूर यांचा लेख वाचताना मन खिन्न झाले. याबद्दल विचार करताना एक मोठा आयुष्यातील कालखंड नजरेसमोरून गेला. स्त्रियांची प्रगती वगरे शब्द ऐकताना अजूनही स्त्रीला अनेक प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे आणि हे दिन साजरे होताना परिस्थिती किती बदलली हा प्रश्नच आहे. आधुनिक काळात टीव्ही मोबाइल नेट सारे काही सहज उपलब्ध आहे, अनेक माध्यमातून स्त्रीची कोणती प्रतिमा दिसते? संस्कार नीतिमूल्ये यांची अवस्था काय आहे? स्त्रिया नोकरी करून प्रपंचाला हातभार लावत आहेत पण त्यांच्यावर होणारे अन्याय वाढत असताना काय उपाय आहेत? एकंदरीत चित्र कधी बदलणार असे प्रश्न पूर्वीही आणि आताही पडताहेत, कदाचित अजूनही काही वर्षांनीही हेच प्रश्न असतील.   – सीमंतिनी काळे, नाशिक

 

शिकायला मिळाले

‘मनातलं कागदावर’ या सदरातील सुधीर करंदीकर यांचा ‘व्हॉट अ लेवल ऑफ कॉन्फिडन्स’ हा लेख खूप काही शिकवून गेला. असे दर्जेदार लेख वाचण्यात आनंद मिळतो आणि काही तरी शिकायला मिळते. मी ही Do it right, first time हे वाक्यदररोज आचरणात आणण्याचा निर्णय घेतला आहे. असेच दर्जेदार लेख आपण लिहावेत. हीच अपेक्षा..   – शुभम कुंभार, अहमदनगर.

 

उजाळा मिळतो

२४ नोव्हेंबरच्या अंकामधील प्रतिमा कुलकर्णी यांचा ‘हुनर’ हा लेख अतिशय आवडला. आपल्या कलेत, कामात गुंग असणारी व्यक्ती बघताना खरेच खूप छान वाटते. तुमच्या लेखात ते फार छान व्यक्त झाले आहे. एका मॉलमधील एक तेथील कर्मचारी रिकामा फ्रिज साफ करताना दिसली. अगदी मन लावून ती ते काम करत होती. क्षणभर मीही तिच्याकडे पाहत राहिले. या प्रसंगाची आठवण तुमचा लेख वाचताना झाली. तुमचे लेख आमच्याही जीवनातील आठवणींना उजाळा देतात.   – मेघना शहा, ठाणे

 

यश नक्कीच स्पृहणीय

२४ नोव्हेंबरच्या पुरवणीत ‘होऊनिया आधार’ या लेखात प्रथमेश दाते यांची माहिती मिळाली. शारीरिक मर्यादांवर मात करून, जिद्दीने अपार कष्ट घेऊन मिळवलेले यश नक्कीच स्पृहणीय आहे. त्याचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. मला विशेष करून त्याच्या आई-बाबांचे कौतुक करायला आवडेल त्यांनी न कंटाळता आणि स्वीकार करून न खचता न खंत करता त्याचा कल बघून त्याला स्वावलंबी बनवले. त्यांना सलाम. मी एक निवृत्त मुख्याध्यापिका आहे. अनेक पालकांशी संवाद साधला आहे. पालकांमधील ‘स्वीकार’ हा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच त्याचे संगोपन करणारे त्याचे पालक, शिक्षक हे विशेष कौतुकास पात्र ठरतात.     – अंजली देवधर