२८ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेल्या मीना वैशंपायन यांचा आईन रँडवरील ‘प्रज्ञावती’ हा सम्यक भाषेत लिहिलेला लेख वाचताना त्यांनीच लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्या दैवताविषयी वाचताना भक्ताच्या चेहऱ्यावर उमटावे तसे कौतुक वाटत होते.

सर्वप्रथम नावाविषयी. आईन रँडला एका मुलाखतीत तिच्या नावाचा उच्चार कसा करावा असे विचारले असता ‘आईन.. टू ऱ्हाइम विथ माइन’ असे तिने स्वत:च सांगितले होते. त्यामुळे आईन म्हणणेच योग्य ठरेल. आईन रँडच्या अनेक मुलाखती यू टय़ूबवर पाहायला मिळतात. आईनच्या ‘फाऊंटनहेड’ आणि ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ या दोन कादंबऱ्या ऑल टाइम हिट समजल्या जातात आणि या दोन कादंबऱ्यांमधूनच तिने प्रामुख्याने आपले तत्त्वज्ञान मांडले आहे. प्रकाशनानंतर सुमारे दोन वर्षांच्या काळानंतर ‘माऊथ पब्लिसिटी’ने ‘फाऊंटनहेड’ ही कादंबरी बेस्टसेलर ठरली तरी प्रकाशनापूर्वी १२ प्रकाशकांनी ती नाकारली होती.

१९४३ मध्ये ‘फाऊंटनहेड’ प्रकाशित झाल्यानंतर १९५६ मध्ये १२ वर्षांनी ‘अ‍ॅटलास श्रग्ड’ प्रकाशित झाली; पण हा सर्व काळ आईन या महाकादंबरीकरिता वह्य़ा भरभरून अभ्यास करत होती, नोंदी काढत होती. तिचे अभ्यासक लेनर्ड पेकफ यांच्या म्हणण्यानुसार तिच्या वह्य़ांमध्ये ‘अ‍ॅटलास श्रग्ड’बद्दलच्या १ जानेवारी १९४५ पासूनच्या नोंदी सापडतात. (या नोंदीदेखील प्रकाशित झालेल्या आहेत.)

वैशंपायन यांनी आईनने मांडलेल्या वस्तुनिष्ठतावादाचा उल्लेख फक्त एका वाक्यात केला आहे; पण वस्तुनिष्ठतावाद हा आईनच्या विचारांचा, लेखनाचा आणि जगण्याचा सारांश आहे. वस्तुनिष्ठतावाद ही आईनने वैचारिक विश्वाला दिलेली देणगी आहे. ‘अ‍ॅटलास श्रग्ड’च्या भाषेत वस्तुनिष्ठतावाद म्हणजे‘अ एखादी गोष्ट सांगायची अथवा करायची असल्यास ती आडवळणाने न सांगता, भुई न धोपटता थेटपणे सांगणे किंवा करणे म्हणजे वस्तुनिष्ठतावाद. ‘मला असे म्हणायचे होते..’ असे मागाहून न म्हणता जे म्हणायचे आहे तेच म्हणणे म्हणजे वस्तुनिष्ठतावाद. वस्तुनिष्ठतावाद म्हणजे कायावाचामने भोंदूगिरीला तीव्र आणि स्पष्ट नकार. वस्तुनिष्ठतावाद म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक आणि वैचारिक प्रतारणेला विरोध आणि म्हणूनच बोलण्याप्रमाणे न वागणारी आणि वागण्याप्रमाणे न बोलणारी  राजकारणी माणसे या ‘अ‍ॅटलास श्रग्ड’मधील काळ्याकुट्ट व्यक्तिरेखा आहेत. आईनच्या नोंदींनुसार या कादंबरीत आईनला फादर आमेद्यूस नावाचे एक पात्रही दाखवायचे होते. हा धर्मगुरू प्रामाणिकपणे चांगल्याची भक्ती करणारी आणि तरीही सतत दयेतील नैतिकता आचरणारी सकारात्मक व्यक्तिरेखा असणार होता, पण अशी काही व्यक्तिरेखा वाचकांना पटवणे अशक्य वाटल्याने तिने ती बाद केली.

‘अ‍ॅटलास श्रग्ड’नंतर आईनने फिक्शन म्हणावे असे लेखन केले नाही; पण तिच्या आवडत्या वस्तुनिष्ठतावादाबद्दल लेख लिहिले, पुस्तके लिहिली, भाषणे दिली, मुलाखती दिल्या आणि तरीही ‘तत्त्वज्ञान हे फक्त तत्त्वज्ञानाच्या पुस्तकातच राहते, फक्त अभ्यासकांपर्यंतच पोहोचते आणि म्हणूनच निखळ तत्त्वज्ञानाच्या पुस्तकापेक्षा ते तत्त्वज्ञान मांडणाऱ्या आणि किती तरी जास्त लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या कादंबऱ्या लिहिणे हेच मला जास्त आवडते,’ असे आईनने म्हटले आहे. अतिशय चांगल्या विषयवस्तूबद्दल मीना वैशंपायन यांचे अभिनंदन.

– मनीषा जोशी, कल्याण</strong>

 

बालसंगोपन केंद्राचे गोकुळ करावे

संगीता बनगीनवार यांच्या ‘पालकत्वाचं नवं क्षितिज’ या सदरामधील २५ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला ‘प्रेमाची पाखर’ हा लेख वाचून खूप छान वाटले. स्वत:च्या लेकरांची आई होणे कौतुकाचे नाही, कारण त्याला आपण जन्म दिलेला असतो; परंतु दुसऱ्या लेकराला जे कुणाचे आहे हेही माहीत नाही त्याला आईची माया देणे हे खूप महान कार्य आहे. पाखर संकुलमधील सर्व यशोदा मातांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी स्वत:ला सेविका म्हणून संबोधले नाही, तर ‘यशोदा’ म्हणून घेतात. किती सुंदर अर्थ आहे आणि त्या नावातच सगळे प्रेम, माया दिसून येते. एक महिन्याचे बाळ रेल्वे स्टेशन, बस स्टॉपवर सापडते, त्याला ‘मायेची पाखर’ अशा बालसंगोपन केंद्रातून मिळते. अशा केंद्रांना समाजातील प्रत्येकाने सहकार्य करावे आणि केंद्राचे गोकुळ करावे.

– वैजयंती जोशी, सोलापूर

 

कायद्याचा गैरफायदा घेतला जाईल

‘सन्मान इच्छामरणाचा’ हा २८ ऑक्टोबरचा लेख वाचला. एखाद्या व्यक्तीच्या मरणाला कायद्याने मदत करणे शक्य नाही आणि त्यात डॉक्टरांचा सहभाग शक्य नाही. जगात कुठेही असा कायदा नाही. भारतात असा कायदा झाल्यास त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता जास्त आहे. एवढय़ा व्यक्तींना मरणाची इच्छा असेल तर जैन लोकांत असलेली संथ अथवा प्रायोपवेशन म्हणजे हळूहळू अन्नपाण्याचा त्याग करणे ही सोय आहेच. त्यासाठी कायदा करणे ही फार मोठी चूक ठरेल. एकीकडे प्राण्यांचा छळ होऊ नये म्हणून कायदे करण्याचा आग्रह धरला जातो आणि अशा स्थितीत कायदा करणे चुकीचे आहे. रुग्णाला उपचार नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे.

– उदय यार्दी