News Flash

उपयुक्त माहिती

पिठामध्ये वापरली जाणारी घातक रसायने उघडकीस येईपर्यंत आपण ते वापरत असतो.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

प्रा. मंजिरी घरत यांचा २९ जुलै रोजी प्रसिद्ध झालेला ‘अन्नधान्य: चुकतंय का काहीतरी’ हा लेख आपल्याला खूप काही शिकवून जातो. आजारी पडून औषधांच्या कुबडय़ा आयुष्यभर वापरण्यापेक्षा जीवनशैली उत्तम ठेवून आजारपणाला दूर ठेवू या असा विचार आपण करतो, तेव्हा अन्न हे सकस दर्जेदार व घातक रसायनविरहित असायला पाहिजे. परंतु पिठामध्ये वापरली जाणारी घातक रसायने उघडकीस येईपर्यंत आपण ते वापरत असतो. लेखामध्ये फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया यांचे दूरध्वनी क्रमांक, अन्न औषध प्रशासनाचा हेल्पलाइन नंबर दिला आहे त्याचा सर्वानाच खूप उपयोग होणार हे निश्चित. सीलबंद अन्नपदार्थाच्या डब्यावर कोणती माहिती पाहावी, लोगो कोणते पाहावे याची उपयुक्त अशी महत्त्वाची माहिती दिली आहे. हा लेख सर्वानी अवश्य वाचवा असा आहे.

– सुधा गोखले

मागे राहिलेल्यांचे काय?

‘आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मुलांच्या कथा-व्यथा’ हा २२ जुलै रोजी प्रसिद्ध झालेला लेख हा वाचकांच्या जाणिवा समृद्ध करणारा आणि वास्तवाचे भान आणून देणारा आहे. आपण शहरी नागरिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आकडे पाहून क्षणभर अस्वस्थ होतो आणि पुढच्या क्षणी आपल्या पुढच्या कामाकडे वळतो. या संदर्भातील आपली संवेदनशीलता ही तात्पुरती भावना असते. स्वत:च्या अस्तित्वात असलेल्या (जागृत) संवेदनशीलतेची जाणीव स्वत:ला सुखावणारी असते. शेतकऱ्याच्या परिस्थितीत बदल होण्यासाठी त्याचा काडीइतकाही उपयोग नसतो. हाच शहरी माणूस भाजी विकत घेताना घासाघीस करतो आणि तूरडाळीचा भाव वाढला की आगीचा भडका उडाल्याप्रमाणे आकांत करतो. त्याने असा आकांत करू नये यासाठीच राज्यकर्ते प्रयत्नशील असतात. कारण या सुखवस्तू बोलक्या मध्यमवर्गाचा धाक उपद्रवकारक ठरतो हे राज्यकर्ते ओळखून असतात.

शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर तो सुटतो. त्याच्या कुटुंबाला सरकारकडून पुढच्या आयुष्यासाठी लाखभर रुपये नुकसानभरपाई मिळते. जो अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार आहे आणि अनेक उद्योगपतींची एका तासाची कमाई आहे. ती रक्कम बँकेत टाकली तर त्यावर महिना पाच-सहाशे रुपये व्याज मिळेल. यातून त्याचे आधीचे कर्ज फिटते का? सावकारी पाशातून तो मुक्त होतो का? त्याच्या मुलाबाळांच्या पोटापाण्याचे आणि शिक्षणाचे नंतर काय होते? आपण इतका सखोल विचार करत नाही.

आपल्याकडे तेवढा वेळही नसतो. सोशल मीडियावर याबद्दल दु:ख-संताप व्यक्त करणारी पोस्ट फॉरवर्ड केली किंवा नाना पाटेकरच्या भाषणाची क्लिप टाकली म्हणजे आपले कर्तव्य पार पडते. या पाश्र्वभूमीवर ‘आनंदवन’ आणि ‘प्रकृति’ या संस्थांचे कार्य मोलाचे आहे. अशा उपक्रमांची व्याप्ती वाढण्याची खूपच गरज आहे.

 प्रमोद तावडे, डोंबिवली

व्यसनातून व्याधीकडे..

डॉ. शशांक सामक यांचा १५ जुलै रोजी प्रसिद्ध झालेला ‘आता तरी बोलायला हवंच..’ हा लेख वाचला. एकीकडे ज्ञान आणि एकीकडे विज्ञान या दोन्ही संकल्पनांना एकत्रितपणे जोडू पाहणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रवास सवयीतून व्यसनाकडे व्यसनातून व्याधीकडे व्याधीतून वासनेकडे आणि वास्तवाकडून आभासी वास्तवाकडे घेऊन जाताना आपल्याला दिसून येत आहे आणि अशा परिस्थितीत यातूनच उद्भवलेल्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा असा हा ‘बोलणारा’ लेख होता. मुळातच आजही लैंगिकता, शरीरसंबध या विषयी बोलणे किंवा यावरील चर्चा, संवाद हा अश्लीलच समजला जातो. याहीपेक्षा ही समस्या फक्त कोणत्या विशिष्ट स्तरापुरती किंवा विशिष्ट भागापुरती मर्यादित आहे असे नाही तर ती अगदी उच्चशिक्षितांमध्येही दिसून येते आणि यासाठी कारणीभूत असलेला महत्त्वाचा घटक म्हणजे ‘समाजाचा ढोंगीपणा’ ज्या समाजामध्ये या गोष्टी अश्लील समजल्या जातात त्या समाजाचे खरे स्वरूप तसे असते का? पोर्न क्लिप्स बघून वासनेला बळी पडलेले कितीतरी याच समाजात दडलेले असतात ते फक्त समाजात मुखवटा लावून फिरत असतात. चार भिंतींच्या आत स्वत: या क्लिप्स पाहणे त्यांना चालते, परंतु जर लैंगिक शिक्षणावर अभ्यासपूर्ण चर्चा समाजात होत असेल तर ते मुखवटाधारकांना चुकीचे वाटत असते. हा समाजाचाच ढोंगीपणा लैंगिक शिक्षणाच्या अभावाला कारणीभूत आहे.

ज्या विषयावर खुलून बोलणे हा जणू गुन्हाच समजला जातो तिथे असे लेख वाचल्यानंतर किमान काही पालक तरी ‘आता बोलायलाच हवे..’ याची अंमलबजावणी करतील हेच माझ्या मते या लेखाचे यश!

अश्विनी लेंभे, औरंगाबाद

‘निमपट पैसा, दुप्पट वेळ द्या’

डॉ. शशांक सामक यांचा ‘आता तरी बोलायला हवंच..’ हा लेख वाचला. स्मार्ट फोन हाती आले आणि घराचे स्मित असलेली मुले नको त्या गर्तेत ओढली गेली. सिंगल चाइल्ड सिंड्रोम या सध्याच्या कुटुंबव्यवस्थेमुळे त्याचे दुसरे भावंड म्हणजे मोबाइल. मग चांगले संस्कार येणार तरी कुठून? ज्या वयात शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक शक्तीसंचनाचा महत्त्वाचा काळ असतो त्या काळात ‘पोर्नोग्राफी’चा शिरकाव झाला आणि लहानग्यांचे भावविश्वच बदलले. या मुलांची चौकसवृत्ती त्यांचा घात करीत आहे याची जाणीव जेव्हा पालकांना होते, तेव्हा वेळी गेलेली असते. ‘मुलांच्या चालीने चालावे। मुलांच्या मनोगते बोलावे’ ही समर्थ रामदासांची ओवी केव्हाच विरून गेली आहे. पालकांनी मुलांना निमपट पैसा आणि दुप्पट वेळ दिला तर देशाचा हा आधारस्तंभ अधिक बलशाली होईल यात शंकाच नाही.

सूर्यकांत भोसले, मुलुंड

संवेदनशील आई

संगीता बनगीनवार यांचा २२ जुलैला ‘पालकत्वाचं नवं क्षितिज’ या सदरात प्रसिद्ध झालेला ‘पूजेचं दातृत्व, मातृत्व’ हा लेख फारच सुंदर होता. स्वत:च्या मनाची हाक ऐकणारी पूजा एक महान व्यक्ती आहेच, पण एक संवेदनशील आई आहे. स्वत:चं आईपण मिरवणाऱ्या भरपूर बायका असतील पण निरागस बालकांना मायेची ऊब आणि प्रसंगी स्तन्यदा होणारी पूजा महानतेचं शिखर गाठलेली आई आहे. पूजाला साथ देणाऱ्या माई गोड आहेतच पण त्या सोबत पूजाला साथ देणारा तिचा नवरासुद्धा तितकाच महान आहे. दुसऱ्याच्या मुलांना जवळही न येऊ  देणाऱ्या समाजाचे डोळे उघडवणारा लेख आहे.

हर्षदा भुजाडी, अहमदनगर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 12:22 am

Web Title: readers reaction on chaturang articles
टॅग : Readers Reaction
Next Stories
1 मुलांचे मित्र व्हा!
2 प्रसंगनिहाय शिक्षण द्यायला हवं
3 मार्गदर्शन करणारा भावनात्मक लेख
Just Now!
X