‘सेल्फी है मेरा चेहरा’ असे मुखपृष्ठ असलेल्या ‘लोकप्रभा’मधील (२ सप्टेंबर) सेल्फीसंबंधित सर्व लेख वाचले. स्वप्रतिमेत रमणे हे नवे नसले तरी आरशात प्रतििबब पाहणे, कॅमेरा वापरून कोणीतरी फोटो काढणे, आणि आपला आपण सेल्फी काढणे यात खूप फरक आहे. जागतिकीकरणाच्या आणि स्पध्रेच्या सध्याच्या काळात जग जवळ आले तरी माणसे दूर जात आहेत असे म्हणतात. काही वर्षांपूर्वी एखादी व्यक्ती एकटय़ाने भ्रमंती करत असताना आजूबाजूच्या माणसाला सहज आपला कॅमेरा देऊन आपला फोटो काढण्याची विनंती करत असे, आणि दुसरी व्यक्तीसुद्धा मन लावून चांगला फोटो काढून देत असे. आता असे एखादे मिनिटसुद्धा कोणाकडे मागायला लोकांना नको वाटते; आणि मागितल्यास ते देण्याची तयारीही कमी होताना दिसते. खचाखच भरलेल्या उपनगरीय रेल्वेमध्ये पुढचे स्थानक कुठच्या बाजूला येणार आहे हे दाखवणारे ‘मोबाइल अ‍ॅप’ निघते हेसुद्धा कोणी कोणाला वेळ मागेनासे / देईनासे झाले आहे हेच दर्शवते असे वाटते.

सेल्फी काढला रे काढला की तो समाजमाध्यमांवर ‘शेअर’ करायचा या सवयीच्या तळाशी सख्ख्या मित्रमत्रिणींच्या संपर्कात राहण्याची आतुरता किती, आणि एकाकीपणाची जाणीव किती, हा मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय ठरावा. आपण अनेकांच्या समूहात आहोत, अनेकांना आपल्या दिनक्रमामध्ये रस आहे, असे स्वत:ला सांगण्याचा तो एक प्रयत्न असू शकतो.

पाश्चिमात्य देशांत ‘जो तो ज्याचा त्याचा’ अशी परिस्थिती अनेक दशके आहे. त्यामुळे सेल्फीसारख्या सोयी शोधण्यात आल्या असाव्यात. आपल्या देशात कुटुंबव्यवस्था आणि समाजजीवन किती तरी जास्त रसरशीत आहे. अनेक जण आजही प्रत्यक्ष ‘फेस टू फेस’ भेटतात. असे असताना फेसबुक किंवा सेल्फीसारख्या ‘सोयी’ आपल्याकडे आल्यामुळे आपणही ‘तसेच’ होत चाललो आहोत का हे ज्याचे त्याने स्वत:कडेच त्रयस्थपणे पाहून ठरवावे. पण स्वत:कडे तसे पाहण्याकरता सेलफोन ऐवजी मन:चक्षू वापरून सेल्फी काढावा लागेल!
– विनिता दीक्षित, ठाणे.

वाचनीय सेल्फीविवेचन
‘सेल्फी है चेहरा मेरा’ ही २ सप्टेंबरच्या ‘लोकप्रभा’मधली कव्हरस्टोरी आवडली. त्यातल्या कॉलेज तरुणांच्या प्रतिक्रिया, मानसशास्त्रज्ञांनी केलेले सेल्फीविषयीचे विवेचन अतिशय वाचनीय होते. ‘तिचा दुसरा दिवस’ हा अरुंधती जोशी यांनी मनमुक्ता सदरात लिहिलेला रिओ ऑलिम्पिकमधली एका जलतरणपटू महिलेवरचा लेख प्रत्येक स्त्रीला तिच्या जीवनातल्या संघर्षांसाठी प्रेरणा देणारा आहे.
-श्रेया पेटारे, ईमेलवरून.

गणेश विशेषांक आवडले
‘लोकप्रभा’चे ९ आणि १६ सप्टेंबरचे ‘गणेश विशेष’ आवडले. त्यातील गणेशाची माहिती व फोटोंमुळे माझ्या माहितीच्या खजिन्यात भरच पडली आहे. २००८ पासून मी गणेशोत्सवाच्या काळातील गणपतीच्या विविध फोटो, चित्रे यांच्या कात्रणांचे संग्रह केले आहेत. त्यासाठी विविध वृत्तपत्रे, मासिक यांमधून कात्रणे जमवली. केवळ गणपतीच नाही तर इतरही अनेक विषयांवरील कात्रणांचे अल्बम, लेखन, वाचन, गायन, इ.आवडीच्या छंदामुळे आज ७४ व्या वर्षीही मी खूप आनंदाने जीवन जगत आहे.
– आशा शिंदे, ईमेलवरून.

‘लोकप्रभा’च्या १६ सप्टेंबरच्या अंकातील ‘वंदन विघ्नहर्त्यांला’ हा डॉ. मीनल कातरणीकर, ‘कुठून आणायची तुझ्यासारखी माणसे’ हा क्षितिज पटवर्धन, ‘नयी जिंदगी’ हा पराग फाटक, ‘नीतिमत्तेची झालर’ हा अरुंधती जोशी यांचा लेख वाचला. हे सगळेच लेख सुरेख नि वैचारिक आहेत.
– संगीता देसडला, ईमेलवरून.

‘लोकप्रभा’च्या गणेश विशेषांक १ अभ्यासपूर्ण होता. अशा विषयांवर चर्चा अपेक्षित आहे. पण हल्ली सगळेच उत्सवात मग्न असतात. आपण उत्तम पुढाकार घेतला आहे.
– अनिल कांबळे, ईमेलवरून.

न्यायाच्या प्रतीक्षेत न्यायालये
दि. २६ ऑगस्टच्या ‘लोकप्रभा’तील मथितार्थ उद्बोधक आहे. न्यायाला उशीर म्हणजेच न्याय नाकारणे असं म्हणतात. न्यायालये सुट्टय़ा कमी करून व अतिरिक्त वेळ (ओव्हर टाइम) चालली व रात्रंदिवस काम करू लागली तर दीर्घकाल प्रलंबित दावे/ खटले निकालात निघू शकतील. तसंच न्याय- प्रक्रिया सुलभ कशी करता येईल याचं संशोधन व्हावं. खटला किती दिवसांत निकाली व्हावा यावर काळाचं बंधन असावं. सर्व कामकाज कालबंधनात असावं. बेरोजगारी वकील वर्गातसुद्धा आहे. त्यामुळे न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरणे कठीण नाही. शासन यंत्रणेला इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही. इच्छा आहे, तिथं मार्ग आहे.
– वि. पु. बाक्रे, ठाणे (प).

विनायक परब यांचा इस्रोसंदर्भातील मथितार्थ वाचला. अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिला आहे. लेख वाचून इस्रोबद्दलचा अभिमान आणखी वाढला.
– विष्णुदास कुलकर्णी, पुणे.

कानउघाडणी हा ‘मथितार्थ’ आवडला. न्यायालयाने दिलेला निर्णय खूपच चांगला आहे. प्रत्येक व्यक्तीने या निर्णयाचे स्वागत करायला हवे आणि आदरदेखील. तसेच बंधनदेखील पाळायला हवे.
– वैभव बारटक्के, ई-मेलवरून

गाईंच्या हंबरडय़ावर उपाय काय?
‘गोपालकांच्या राज्यात गाईचा हंबरडा’ या अंकातील पाच लेख मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, विदर्भ महाराष्ट्रातील या पाच ठिकाणांसंबंधी आहेत. परंतु हा ‘गाईचा हंबरडा’ शांत होण्यासाठी काय उपाय हवे याबद्दल एकही लेख नाही असे वाटते/अर्थात ‘लोकप्रभा’ने महाराष्ट्रातील गोपालनाची दयनीय स्थिती दिली आहे. परंतु या अनास्थेबद्दल (गोपालन) काही उपाय सुचविणारे लेख असायला पाहिजेत. ते उपाय सुचविणारा एक अंक ‘लोकप्रभा’ने काढावा, अशी विनंती.
– वसंतराव धोंडे, ठाणे (प.)

‘मांजराच्या मागावर’ अप्रतिम
दि. १९ ऑगस्टच्या लोकप्रभेच्या अंकात ओवी थोरात यांचा ‘मांजराच्या मागावर’ हा आगळावेगळा लेख वाचला. त्यांनी वर्णिलेला मासेमारी मांजराचा शोध अनोखा तर आहेच, पण त्यासाठी त्यांना जंगले पाणथळी तुडवावी लागली. सगळेच विलक्षण आहे. त्यांच्या साहसी वृत्तीला दाद द्यायला हवी, कारण यानंतरही त्या अशा कठीण भटकंतीवर पुन्हा जायला तयार आहेत असे दिसते. त्यांचे मनापासून कौतुक. त्यांचे उदाहरण पाहून आणखी तरुण मंडळी असे अनोखे मार्ग शोधतील अशी आशा वाटते.
– सुरेश देवळालकर, हैदराबाद.

आर्थिक विषयावर लेखन हवे
मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे. वाचनीय आणि भरगच्च मजकूर देणाऱ्या ‘लोकप्रभा’कडून आणखी अपेक्षा आहेत. ‘लोकप्रभा’मध्ये आíथक घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर फारसं काहीही येत नाही. अमेरिकी निवडणुकांवर एवढी चर्चा सुरू असताना ‘लोकप्रभा’ने त्याबाबत मौन का बाळगावे? ‘लोकप्रभा’ला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे वावडे आहे का; आíथक विषयावर एखाद्या तज्ज्ञाचे सदर आम्हाला का वाचायला मिळू नये?
– नितीन जवळगे, नागपूर</strong>

दि. ३० सप्टेंबरच्या अंकातील ‘कुठून येतो हा स्वाभिमान’ आणि ‘हॉटेल महाराजा’ हे लेख खूपच छान होते.
– दिनेश पाटील, ई-मेलवरून

वस्तुस्थितीचे नेमके वर्णन
मराठा समाजाला नेमकं हवंय तरी काय, ही कव्हरस्टोरी वाचली. लेखातून वस्तुस्थितीचे अतिशय संयमित, नेमके वर्णन आले आहे. त्यानंतरही राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मोठमोठे मोच्रे निघाले आहेत. मोच्रे म्हटलं की दंगा, गडबड, आक्रमक घोषणाबाजी या सगळ्याची आपल्याला सवय आहे. खूपदा मोर्चा आणि त्याच्यावर लाठीमार करणारे पोलीस हे चित्रही दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून बघितलेले असते. पण हे अतिशय शिस्तबद्ध मोच्रे अतिशय कौतुकास्पद आहेत.

मधे काही काळ अशी चर्चा होती की मोच्रे, आंदोलनं, निदर्शनं हे मार्ग आता कालबा झाले आहेत का हे तपासून पाहिले पाहिजे, कारण त्यात नुसती हुल्लडबाजी होते आणि त्याकडे बघणारेही या प्रकारांना उपचारांचा भागच मानत असतात. दुसरीकडे मोच्रे आले की तिथल्या परिसरातल्या लोकांना आवाज, नंतरची अस्वच्छता या सगळ्यांचा त्रास होतो. पण लाखोंचे मोच्रे कसे काढावेत हे या मोर्चानी दाखवून दिले आहे.
– सुनंदा धोतरे, नाशिक

पुढचा कार्यक्रम काय?
सध्या सगळीकडचं वातावरण मराठा समाजाच्या मोर्चानी गजबजून गेलं आहे. मराठय़ांमधले मूठभर लोक वगळले तर बाकीचे गरीब मराठा या सदरातच मोडणारे आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे सकारात्मकच पाहायला हवे. कारण मराठी नेत्यांनी मलिदा खाल्ला आणि आपल्यासाठी काही केले नाही, हे आता मराठा समाजाला कळले आहे. अशी आंदोलनं राजकीय मंडळी हायजॅक करायची शक्यता असते. पण राजकारणी लोकांचा यात सहभाग नाही असं सांगितलं जात आहे. मग या मोर्चाचा बोलविता धनी कोण असावा. मोच्रे झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम काय असेल याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

राजकीय नेत्यांशिवाय जर लाखोंचे मोच्रे निघत असतील तर लाखांच्या सभा घेऊ शकणाऱ्या नेत्यांचं काही कौतुकच राहणार नाही. आताच्या काळात बाळासाहेब ठाकरे अ‍ॅक्टिव्ह असते तर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली असती असा एक मजेशीर विचार मनात आला.
– पांडुरंग दिघे, पुणे

सीरियलमधील स्त्री बदलणे गरजेचे
कोणतीही टीव्ही मालिका घ्या. बहुतेक स्त्रीप्रधान असतात. बहुतेक कहाण्यांमध्ये एक रडकी सहनशील, समजूतदार नायिका तर एक खलनायिका. कुरापती तिच्या डोक्यात येतातच कशा? नायिका देवाचा धावा करीत असते तर खलनायिका हेवा-दावा. खऱ्या जीवनात असं नसतं. पण येथे स्त्रीला नेहमी बाहेरचाच रस्ता का दाखविला जातो? समाजात स्त्रीची भूमिका बदलत असताना सीरियलमधली स्त्रीची भूमिका आता बदलणं गरजेच आहे.
– संध्या बायवार, बानापुरा, जि. होशंगाबाद (म. प्र.).