वायूप्रदूषणाच्या समस्येचा ऊहापोह करणारी १८ नोव्हेंबरच्या अंकातील कव्हरस्टोरी आणि मथितार्थ वाचला. या समस्येचे भयानक स्वरूप अजूनही कोणीच (शासन, प्रशासन, उद्योगजगत, जनता) गांभीर्याने घेताना दिसत नाही. देवनारच्या पहिल्या मोठय़ा आगीनंतर घनकचऱ्याची गंभीर समस्या, तो पुरल्यामुळे होणारे जमिनीचे प्रदूषण, तो जाळल्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण अचानक ऐरणीवर आले आणि शहर कसे कडेलोटावर उभे आहे याची अनेकांना जाणीव झाली. परंतु ठोस उपाय काहीच झाले नाहीत. ‘ओला-सुका कचरा’ हा शब्दप्रयोग तेवढा वारंवार वाचण्यात-ऐकण्यात येऊ  लागला. महानगरपालिकेने सर्व गृहसंकुलांना तातडीने पाठवलेल्या सूचनेतही तो दिसतो. प्रदूषण नियंत्रणासारख्या गोष्टीत सार्वजनिक सहभाग मोठय़ा प्रमाणात अपेक्षित असतो. तिथे खोलात आणि साधकबाधक विचार केलेला दिसला पाहिजे. तसा तो न करताच उपक्रम सुरू करून फक्त दिखाऊपणा करणे हा खाक्याच इथेही दिसला. ओला आणि सुका कचरा म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? वर्तमानपत्रांची रद्दी कोरडी असेल तर तो सुका कचरा आणि भिजली असेल तर तो ओला कचरा म्हणायचा का? हाच प्रश्न काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या इत्यादीबाबतही विचारता येईल. घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट ज्या देशांत लावली जाते तिथे ‘ओला-सुका’ असे मोघम काही तरी न म्हणता अन्नपदार्थ, कागद, प्लास्टिक, काच, धातू, ई-कचरा आणि धोकादायक कचरा (बॅटरीचे सेल, टय़ूबलाइट, पारा असलेले तापमापक, इत्यादी) अशी सुस्पष्ट वर्गवारी केलेली असते आणि त्याकरिता वेगवेगळी पिंपे प्रत्येक गृहसंकुलात ठेवलेली असतात. वरील गोष्टी ओल्या आहेत की सुक्या हे निर्थक आहे. एखादी गोष्ट मनापासून करायची आहे की, (एखाद्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्रॅम’प्रमाणे) काही तरी ठोस केल्यासारखे फक्त दाखवायचे आहे हा मूलभूत प्रश्न यात आहे. त्याकडे लक्ष नाही दिले तर परिस्थिती आहे तशीच भयानक राहील. पिण्याचे पाणी विकत घेण्याची सवय आता लागलीच आहे; भविष्यात हवाही अशीच विकत घ्यावी लागेल, अशी चिन्हे आहेत.
– प्रसाद दीक्षित, ठाणे. (ईमेलवरून)

नाहीच बघणार असल्या मालिका
‘आयुष्यावर बोलू खोटे’ आणि ‘मालिकांमधील खटकणाऱ्या गोष्टी’ या दोन्ही लेखांत सध्या सुरू असलेल्या अतिरंजित, अविश्वसनीय मालिकांचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. चॅनलवाले लोकांना काय हवे यांचा विचारदेखील करीत नाहीत. ऑफिसमध्ये बसलेली चार डोकी, आपल्या मेंदूतून नको त्या फालतू कल्पना अक्षरश: जनतेच्या माथी मारत असतात. खरं तर मालिका सहकुटुंब पाहिल्या जातात. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मुलाबाळांसह पाहताना, माझ्या मैत्रिणींना एवढा संकोच वाटला की तिने मालिका बघणेच बंद केले. दिवाळी खरं तर आनंदाचा सण, पण झी मराठीसारख्या दर्जेदार मालिका देणाऱ्या वाहिनीला झालंय तरी काय? जवळपास सर्वच मालिकांत दु:खद घटनांचा अक्षरश: कडेलोट होत आहे. जणू काही प्रेक्षकांना दिवाळीचा आनंद लुटायला द्यायचा नाही, असा चंगच यांनी बांधला आहे.

माझ्याकडे यासाठी एक सोपा पण जालीम उपाय आहे. १ जानेवारी २०१७ पासून आपण विशेषत: स्त्रियांनी मालिकांवर अघोषित बहिष्कार टाकायचे, असे मी आणि माझ्या मैत्रिणींनी ठरवले आहे. व्हॉट्सअ‍ॅप माध्यमाद्वारे आम्ही हा संदेश पाठवण्यासदेखील सुरुवात केली आहे. एकदा का साखळी सुरू झाली की टीआरपी कसा खाली येतो पाहा. व्हॉट्सअ‍ॅप काय करू शकते हे आपण गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पाहिलेच आहे.
 – शिल्पा प्रफुल्लचंद्र पुरंदरे, मुंबई (ईमेलवरून).

‘पसंत..’ला एवढी नापसंती का?
‘काहे दिया परदेस’ मालिकेवर पराग फाटक यांनी ‘टीव्हीचा पंचनामा’ सदरात लिहिलेला लेख वाचला. ‘मी एकटी बाई कुठे कुठे पुरणार’ हे वाक्य सतत उच्चारणारी निशा या वाक्यामुळेच व्हिलन नव्हे तर एक मूर्ख बाई ठरत असते. असो, मला इथे ‘काहे दिया..’बद्दल नव्हे तर नुकत्याच अचानकपणे संपलेल्या ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेबद्दल लिहायचे आहे. त्याबद्दल कुणीच काहीही लिहिलेले नाही. ही एक चांगली मालिका होती. त्यात सगळ्या कलाकारांची कामंही चांगली झाली. ती इतक्या लौकर का संपवली आणि त्याबद्दल कुणीच काहीही प्रश्न का विचारले नाहीत, याबद्दल मला राहून राहून आश्चर्य वाटलं. एरवी प्रत्येक मराठी मालिकेतल्या बहुतेक कलाकारांना ‘चला हवा येऊ द्या’च्या व्यासपीठावर बोलावलं जातं. अगदी ‘अलबेला’ या मराठी सिनेमातल्या कलाकारांनाही बोलावलं, पण ‘पसंत आहे..’ या मालिकेतल्या कलाकारांना ‘चला हवा येऊ द्या’मध्येही बोलावलं गेलं नाही. सहसा कोणतीही मालिका संपत आली की तिची वर्तमानपत्रे, टीव्ही या माध्यमातूनही चर्चा होते. पण या मालिकेबाबत तसंही घडलं नाही. ती एकदम, अचानक संपूनच गेली.
– आर. डी. पाध्ये, ईमेलवरून.

दिवाळी अंक आवडला
‘लोकप्रभा’चा दिवाळी अंक वाचला. वेगवेगळ्या विषयांवरील माहितीपूर्ण लेखांमुळे अंक आवडला. ‘लोकप्रभा’ने पर्यटकस्नेही हा चांगला शब्द वापरला आहे. या अंकात पर्यायी वृद्ध संगोपन हा एक चांगला लेख वाचायला मिळाला. त्याबाबत आणखी काही मुद्दे नोंदवावेसे वाटतात. सरकारने स्वयंसेवी संघटना, तसंच मनुष्यबळ खात्यामार्फत पुढील कार्यक्रम राबवायला हवेत, ज्यांच्यामार्फत रोजगार वाढेल. स्वयंसेवी संस्थांमार्फत काही सुविधा देता येतील. त्यात वृद्धाश्रम चालवणे, अंथरुणाला खिळून राहिलेल्या वृद्धांसाठी विनामूल्य तसंच मूल्य आकारून केअर सेंटर, अशा गोष्टी कराव्यात. विनापत्य मध्यमवयीन जोडप्यांना वृद्धपणी आपलं कसं होणार, अशी काळजी लागून राहिलेली असते. त्यांच्यासाठीही या सुविधा सोयीच्या ठरतील.

याच अंकात ‘एक सुंदर फसवणूक’ हा माहितीपूर्ण लेख वाचला. चित्रपट तसंच इतर माध्यमांमधून नेहमीच जागतिकीकरणानंतरच्या बदललेल्या जगातील वास्तव गोष्टी ‘लार्जर देन लाइफ’ दाखवल्या जातात. त्या बघून वास्तवातही सगळ्यांना असंच जगायची इच्छा असते. कमी बजेट असतानाही वेगवेगळ्या गोष्टी अशा पद्धतीने लोकांपर्यंत कौशल्याने आणणाऱ्यांचं खरंच कौतुक करायला हवं.
– चारू आवळकर, ईमेलवरून.

मनमोहक ऋतूंचे सोहळे
देवदत्त पाडेकर यांच्या दिल्ली होणाऱ्या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेला ‘ऋतूंचे सोहळे’ हा लेख खूप आवडला. आल्पस्चे त्यांनी चितारलेले सौंदर्य, भारतातील अनेक ठिकाणी त्यांना झालेली निसर्गाची ओळख हे सारं खूपच वेधकपणे सिम्फनी ऑफ सिझन्समध्ये आहे याची जाणीव झाली. चित्रांवर सोप्या भाषेतील हे लिखाण मनापासून आवडले. असेच नवोदित चित्रकारांवर लिखाण प्रकाशित करावे.     – सुधीर पाटील, सांगली.

न बोलला जाणारा विषय
‘क्यू टू पी’ टू ‘आर टू पी’ हा डॉ. पद्मजा सामंत यांचा लेख वाचला. त्यांच्या लेखामुळे या विषयाचा एक वेगळा पैलू समोर आला. ‘राईट टू पी’वर बरेच वाचायला मिळते. पण ‘क्यू टू पी’च्या माध्यमातून त्यांनी ही वेगळीच समस्या योग्य प्रकारे मांडली आहे.
– कीर्ती कदम, नाशिक.

ऑनलाईन शॉपिंगचे वास्तव काय?
सध्या ऑनलाईन शॉपिंगचा खूपच बोलबाला असतो. आता तर चलनी नोटांच्या कमतरतेमुळे ऑनलाइन शॉपिंगला पर्याय असल्याचे बोलले जाते, पण खरेच आपल्याकडे हे प्रमाण सर्व स्तरांवर कितपत पोहोचले आहे याबाबतीत साशंकताच आहे. तसेच ऑनलाईनचा बहुतांश वापर हा नेहमीच्या गरजेच्या वस्तूसाठी कमीच होताना दिसतो. ते आपल्या लेखातदेखील जाणवते. त्यामुळे नेमकं वास्तव शोधणं गरजेचं आहे
– अजय धुरी, ठाणे.

वैविध्य जपणारा ‘लोकप्रभा’
‘लोकप्रभा’च्या गणपती, देवी विशेषांकांतून खूप वेगळ्या प्रकारची माहिती मिळाली. त्यानंतरचा दिवाळी अंकाच्या आधीचा रुचकर, शॉपिंग विशेषांकही एकदम वेगळा होता. दिवाळी अंक वाचताना नेहमीच असं वाटते की हा अंक आणखी मोठा असायला हवा होता. त्यातील आनंद कानिटकर यांच्या काबूलवरील लेखाने एकदम वेगळ्या विश्वात नेले. सैबेरिया, कंबोडियावरील लेखही तिथे जायला हवे ही जाणीव निर्माण करणारे होते. ट्रॅव्हलॉग या प्रकारातली विविधता ‘लोकप्रभा’ने नेहमीच जपली आहे, हे कौतुकास्पद आहे.
– जयंती मोरे, अलिबाग.