lp04दि. १६ ऑक्टोबरच्या ‘लोकप्रभा’तील ‘गोंधळ मांडीला ग अंबे’ या शेखर खांडाळेकर यांच्या लेखातील विचार गोंधळाचे आहेत. मी महालक्ष्मीचा महाजन असून माझ्या भावना दुखावल्या आहेत. मात्र माझे मतभेद हे वैचारिक आहेत, वैयक्तिक नाहीत. अल्पज्ञानी व स्वयंघोषित पंडितांकडून मिळालेली माहिती लेखकाने ग्राह्य़ मानली असावी. खालील काही मुद्दय़ांकडे लक्ष वेधावेसे वाटते.

देवीची मूर्ती अतिशय जीर्ण असल्याचे लेखकाचे म्हणणे चुकीचे असून कदाचित पाहणाऱ्यांची दृष्टी क्षीण असू शकते. देवीची शालीग्रामशिला मूर्ती पूर्णपणे देदीप्यमान असून पूर्णाशाने स्वयंप्रकाशित आहे. लेखकाने परत परत मूर्तीस जानवे आहे, याचा उल्लेख करण्याचे विशेष प्रयोजन काय बरे असावे? लेखकाने उपस्थित केलेला ‘खुजा पुरुष’ हा पुरुष नसून देवीने मारलेला राक्षसच आहे. मूर्तीच्या खांद्यावरून उजव्या हाताखाली गेलेले यज्ञोपवीत मात्र ठसठशीत आहे हे विधान जाणीवपूर्वक केले असल्याचे दिसते.

महालसा विष्णूरूप मोहिनी असून लेखकाला काय वाटेल ते वाटो, पण भक्तांची श्रद्धा व भावना जागृत आहेत. महालसा नारायणी, म्हार्दोळ ही देवी कौटुंबिक कुलदेवी असून चार गोत्रीय वैष्णवांची कुलस्वामिनी आहे, हे सत्य होय. कुठल्याही दैवताचे गंध लावून वैष्णवीकरण करण्यात आले हा लेखकाने कुठल्या आधारावर शोध लावला? एकनाथांच्या साहित्यातील म्हाळसा मोहिनी संबंध दृढतर करून तिला नारायणीचे नाम चिकटवले हा शोध लेखक कसे बरे लावू शकतो?

म्हार्दोळची महालसा नारायणी ही चार गोत्रीय सारस्वतांची कुलस्वामिनी असून ती कुलदेवी आहे. कुठल्याही प्रकारे ती ग्रामदेवी नाही. अनेक भाविक देवीला श्रद्धायुक्त भावनेने भजत आलेले आहेत हे कोणीही नाकारत नाही. लेखकाने वैष्णव मठांच्या वर्चस्वासंबंधी विधान लेखाबद्दल शंका उपस्थित करते. लेखात लिखित प्राणी हा कुत्रा नसून लांडगाच आहे. एकंदर लेखाचे प्रयोजन, लेखकाने बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केल्यावरून खालील अनुमान काढावेसे वाटते.

लेखकाला कोणीतरी आपमतलबी पंडित वा पुरोहिताने खोटी माहिती पुरवलेली असावी. लेखकाची मते ही पूर्वग्रहदूषित असावीत. लिखाण करताना संस्थानाच्या अधिकृत पुस्तकाचा आधार घ्यावा असे सुचवावे वाटते.
– जगदीश वरदराज आचार्य, मडगाव, गोवा.

मूर्तीच्या जीर्णतेच्या विधानाबद्दल पुरावा

दि.२६ एप्रिल २०१५ ला म्हार्दोळ येथे महालसा पुन:प्रतिष्ठेच्या वेळी घेतलेले मूळ विग्रहाचे शृंगाररहित छायाचित्र इंटरनेटवर ६६६.ॠ२्रुल्लऋेी्िरं.ूे  नावाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे छायात्र इतके स्पष्ट आहे की प्रत्यक्ष दर्शनसुद्धा हल्ली इतके व्यवस्थित मिळत नाही. सदर छायाचित्र पाहून जी मंडळी म्हार्दोळ पोहोचू शकाोहोचू शकत नाहीत त्यांनी मूर्तीच्या जीर्णतेविषयी आपले मत बनवावे. त्याची लिंक http://www.gsbinfomedia.com/punar-pratista-of-mahalasa-narayani-at-goa/ अशी आहे.

२. जानव्याच्या उल्लेखाचे कारण : महालसेच्या विग्रहात जानवे/ यज्ञोपवीत असावे असा कटाक्ष असतो. त्याशिवाय ती मूर्ती पूर्ण होत नाही, असा तेथील पुरोहितवर्गाचा आणि भक्तजनांचा विश्वास आहे. मोहिनीरूप विष्णू असल्याने स्त्री असूनही देवी आवर्जून जानवे घालते असे उत्तर मिळते. भैरवीरूप म्हाळसेला विष्णूचा अवतार सिद्ध करण्यासाठी याच जानव्याचा आधार घेतला जातो म्हणून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. यात कोणताही गुप्त हेतू नाही.

३. एकनाथांचा संदर्भ का दिला : माळव्वा/ माळचि हिला म्हाळसा नारायणीचे नाव कसे प्राप्त झाले याविषयीची चर्चा करताना ज्ञानेश्वर आणि एकनाथांचा संदर्भ आला आहे. कोणत्याही देवतेची पाश्र्वभूमी एका रात्रीत तयार होत नाही. अनेक संदर्भ आणि परंपरांचा हा संगम असतो. एका शाक्तपंथी मूर्तीला वैष्णव रूप प्राप्त होते तेव्हा भागवत संप्रदायी संतांचे त्याबाबतचे संदर्भ दृष्टीआड करून कसे चालतील?

४. महालसेला ग्रामदैवत का म्हटले : म्हार्दोळ व्यतिरिक्त गोव्यात महालसेची उपासना कलशाच्या रूपात चालते. सत्तरी तालुक्यातील अनेक गावांत तिला ग्रामदेवता मानतात ही गोष्ट जगदीश आचार्याच्या नजरेस मी आणून देऊ  इच्छितो.

५. शैव मूर्तीला वैष्णव शृंगार : गोव्यातील श्रीवामनेश्वर देवस्थान ढवळी आणि श्रीरामनाथ देवस्थान रामनाथी येथे मुख्य विग्रह शिवलिंग असून त्यावरील उत्सवमूर्तीला चक्क वैष्णव उभे गंध लावले जाते. दोन्ही ठिकाणी वैष्णव मठाच्या अनुयायांचे प्राबल्य आहे.

६. संदर्भ कुठून मिळवले : महालसेचे संदर्भ प्रत्यक्ष म्हार्दोळ येथील तिन्ही मूर्तीचा अभ्यास करून निश्चित केले. त्याखेरीज, रा. चिं. ढेरे, गुंथर सोन्थायमर यांच्या खंडोबावरील पुस्तकांतून दुवे सापडले. पूर्वी ‘महालसायन’ हे पुस्तक म्हार्दोळ देवस्थानाच्या ऑफिसात मिळत असे, त्याचाही उपयोग झाला. याव्यतिरिक्त म्हार्दोळ येथील ज्येष्ठ जाणकार व्यक्ती आणि अन्य भाविकांकडून माहिती मिळविली.

माझ्यासमोर असलेल्या साधनसामग्रीचा धांडोळा घेऊन तो वाचकांसमोर ठेवला आहे. माणसाची बदलणारी परिस्थिती, प्रेरणा आणि श्रद्धा त्याच्या दैवतांचा कसा कायापालट करतात हे मला या लेखातून दाखवायचे होते. अन्य कोणताही हेतू ठेवून हा लेख लिहिलेला नाही.
– शेखर खांडाळेकर, मुंबई.

लेखात स्पष्टता यायला हवी

दि. २ ऑक्टोबरच्या अंकातील रवि आमले यांच्या लेखातील चित्र भगवे रंगवून काय साध्य केलं? त्यामध्ये जी. एस. पारेखऐवजी पाठक हे नाव हवे. तसेच २३ किंवा २४ तारखेला कोणता बॉम्बहल्ला गांधींवर झाला होता हे स्पष्ट कराल का?

तत्कालीन मुंबईचे गृहखाते, पोलीस, मोरारजी देसाई यांचा ढिसाळ तपास, २० जानेवारीला झालेल्या गन कॅक्टनच्या स्फोटात मदनलाल पाहावा दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असताना तपासकामात केलेली अक्षम्य हेळसांड, परिणामी गांधीहत्येसारखी अप्रिय घटना, त्याची प्रखर किंमत आजतागायत ज्या लाखो लोकांचा त्या घटनेशी दूरान्वयाने संबंध नाही, नव्हता त्या वर्गाला केवळ त्या जातीत जन्माला आले म्हणून भोगावे लागत आहे.

किती निरपराध लोकांची घरे जाळली, किती जणांना प्राणाला मुकावे लागले? जो वर्ग केवळ संधी शोधत होता, त्यांना केवळ निमित्त मिळाले. न्यायमूर्ती आत्मचरण यांनी स्पष्ट शब्दांत स्वा. सावरकर यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर कपूर कमिशन असा कुठलाही निष्कर्ष सावरकरांबद्दल काढत नाही. एका प्रखर क्रांतिकारकावर त्याच्या मृत्यूनंतर चिखलफेक करण्यात कसली आली आहे धन्यता?
– पुरुषोत्तम देशपांडे

बेबंदशाही चालतच राहणार?

वकील किशोर लुल्ला यांनी पत्रात लिहिले आहे की खा, पण कामे करा. ही धारणा चुकीची आहे पण त्याला काही इलाज नाही म्हणून स्वीकार करावा. या बाबतीत थोडे कटू, पण सत्य बोलायचे झाल्यास असे आहे की, कर्मचारी, अधिकारी यांना पगार कशासाठी दिला जातो? कामात अडथळा निर्माण करून किंवा कमी प्रतीचे करून ते शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून परत पैसे खाता येतात म्हणून? नाही. काम खराब झाले म्हणून कुणाला जाब विचारला जात नाही आणि जरब बसेल अशी  शिक्षा होत नाही म्हणून. आणि समजा काही खातेनिहाय चौकशी सुरू झाली तर ती शक्य तितकी लांबविता येईल असा प्रयत्न आपल्या गॉडफादरमार्फत करायचा. कारण तोच पैसे घेणारा असतो आणि हे फक्त दोन किंवा तीन टक्क्यांवर मिशीला कोकम लावून तुपाचे डाग पुसत बसतात. तो गॉडफादर इमानाने यांना संकटातून बाहेर काढतो. आखाती देशात किंवा बहुतेक आफ्रिकी देशांत राजेशाही आणि हुकूमशाही असल्यामुळे अपराध करणाऱ्याच्या पाठीवर हात ठेवणारे कुणी नसतात. त्यामुळे गैरव्यवहार झाल्यास ताबडतोब कठोर शिक्षा मिळते. नुकतेच मक्केमध्ये क्रेन पडून काही लोक ठार झाले होते. या गोष्टीचा तत्काळ तपास करीत, तेथे हलगर्जीपणा झाला आहे असे लक्षात आले व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना फाशी देण्यात आली. आपल्या देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेले शासन वर्षांनुवर्षे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे काम करून, झालेच तर वार्षिक पगारवृद्धी थांबवण्याची कारवाई करून स्वस्थ बसणार. मुळात काय की असली बेबंदशाही चालतच राहणार आहे आणि आम जनता रडतखडत दिवस कंठणार!
– चंद्रकांत लेले, भोपाळ, मध्य प्रदेश.

lp05नर्मदा परिक्रमा विस्तृत हवी

दि. २३ ऑक्टोबरच्या अंकातील ‘नर्मदा परिक्रमा’ हा ऊर्मिला मोडक यांचा लेख खूपच छान होता. नर्मदा परिक्रमा अशी केवळ दोन पानांमध्ये होणारी नाही. भरपूर छायाचित्रे आणि सविस्तर माहिती अशा प्रकारे परिक्रमेवरील लेख प्रकाशित करावेत.  विशेषत: नर्मदेच्या विविध घाटांबद्दल अधिक माहितीची अपेक्षा भविष्यात आहे. अनेक संतपुरुषांनी कोणतीही सुविधा नसतानाच्या काळात ही खडतर परिक्रमा पूर्ण केली आहे. काही लोकांनी तर तीन वर्षे, तीन महिने, तीन दिवसांत ही परिक्रमा केली आहे. अलीकडच्या काळात जगन्नाथ कुंटे यांनीदेखील त्यावर पुस्तक लिहिले आहे. फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवरदेखील नर्मदा परिक्रमा या विषयावर काही ग्रुप आहेत. त्यावरदेखील बरीच माहिती उपलब्ध आहेत.
– गिरीश गावस्कर, विलेपार्ले, मुंबई, ई-मेलवरून.

मी ‘लोकप्रभा’ची नियमित वाचक आहे. नर्मदा परिक्रमेवरील ऊर्मिला मोडक यांचा उत्तम लेख वाचला. असा लेख प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.
 – नीता गुप्ता, कॅलिफोर्निया, ई-मेलवरून.

‘पाटोदा मॉडेल’चे कौतुक व्हावे

स्वरूप पंडित यांचा पाटोदा या स्मार्ट गावावरील लेख आवडला. सर्व पाटोदावासीयांचे मनापासून अभिनंदन. त्यांनी इतर गावांना मार्ग दाखविण्याचे मोठेच कार्य केले आहे. त्यांनी हे गाव सतत स्मार्ट ठेवावे आणि दुसरी गावेही स्मार्ट होण्यास मदत करावी अशी त्यांना विनंती आहे. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीचा असाच कायाकल्प केला आहे. पण हे एक दोन गावांपुरतेच राहते. त्याची चळवळ होऊन सगळ्या गावांना आपणही स्मार्ट व्हावे असे वाटते आहे आणि त्या दिशेने ती पावले टाकत आहेत असे दिसायला हवे. पाटोदावासीयांनी इतरांना जरूर मार्गदर्शन करावे. पाटोदा मॉडेलचे कौतुक व्हावे. मी तर म्हणेन की अण्णा हजारे, पेरे पाटील यांनी या चळवळीचे नेतृत्व करून सगळा महाराष्ट्र स्मार्ट करावा
– सुरेश देवळालकर, हैदराबाद.

कथा आवडली
दि. ११ सप्टेंबरच्या अंकातील ललिता छेडा यांची ‘तो आणि ते’ नावाची अतिशय सुंदर कथा प्रसिद्ध झाली होती. साधी भाषा आणि अत्यंत हृदयस्पर्शी मांडणी यामुळे या कथेने मनात घर केले. ‘लोकप्रभा’च्या माध्यमातून अशाच उत्तमोत्तम कथा पुढेही वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे.
-मंदार कमलापूरकर, ई-मेलवरून.