प्रेमाच्या आणाभाका घेत असताना काही गोष्टी त्याने किंवा तिने जाणिवपूर्वक लक्षात ठेवणं अपेक्षित असतं. मग ते साधं गुलाब असो किंवा प्रिय व्यक्तीसोबत मारलेल्या गप्पा असो. नात्यात काही गोष्टींना फार नाही, पण जितके आवश्यक आहे तितकं महत्त्वं देणं गरजेचं असतं. त्यातीलच एक बाब म्हणजे, व्हॅलेंटाइन्स डेपूर्वी येणारा प्रेमाचा आठवडा. अर्थात व्हॅलेंटाइन्स वीक. सध्या या वीकमधील काही दिवस झाले असून, आज उजाडलाय टेडी डे.

टेडी म्हणजे अनेकांच्या आवडीचा विषय. घरात राहायला जागा नसली तरीही हा टेडी मात्र अनेकांनाच हवाहवासा वाटतो. सर्वांचं प्रेम मिळणारा हा लाडाचा टेडी नेमका आला कुठून या प्रश्नाने कधी घर केलंय का तुमच्या मनात? काय म्हणता… हो… चला तर मग जाणून घेऊया या टेडीच्या जन्मामागची कहाणी.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थेओडोर रुझवेल्ट यांचं नाव टेडी बेअरच्या जन्माशी जोडलं गेलं आहे. ‘नॅशनल पार्क सर्व्हिस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार १४ नोव्हेंबर १९०२ मध्ये रुझवेल्ट ऑनवार्ड, मिसिसीपी येथे अस्वलाच्या शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी मिसिसीपीच्या तत्कालीन गव्हर्नर अॅन्ड्य्रू एच. लोगिनो यांनी त्यांना शिकारीसाठी येण्याचे आमंत्रण दिले होते असे सांगण्यात येते.

रुझवेल्ट आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यावेळी एका अस्वलाला घेरले आणि त्याला एका झाडाच्या खोडाला बांधले. त्यानंतर त्या अस्वलाचा शिकार करण्यासाठी राष्ट्रपतींना पुढे बोलावले गेले. पण, रुझवेल्ट यांनी मात्र त्या अस्वलावर गोळी झाडली नाही. या प्रसंगाविषयी कालांतराने वर्तमानपत्रांमध्ये छापून आले आणि पुढे काही दिवसांनी या संपूर्ण प्रसंगाचे चित्रण करणारे कार्टून साकारण्यात आले. कार्टूनिस्ट क्लिफर्ड बेरीमन Clifford Berryman यांनी रेखाटलेलं ते कार्टून १६ नोव्हेंबर, १९०२च्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये छपून आलं होतं.

Clifford Berryman’s 1902 cartoon that lampooned T.R.’s bear hunt

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रुकलीन येथील मॉरिस मिकटोम Morris Michtom या चॉकलेटच्या दुकान मालकाने हे कार्टून पाहिलं आणि त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. मॉरिस आणि त्यांची पत्नी रोझ हे बाहुल्याही बनवत असत. ते कार्टून पाहून मॉरिस यांच्या डोक्यात त्या अस्वलाची प्रतिकृती असणारे एक मऊ बाहुले बनवण्याची कल्पना आली आणि त्यांनी ते बनवले. शिकारीला गेले असताना अस्वलावर गोळी झाडण्यास नकार देणाऱ्या रुझवेल्ट यांना ते अस्वलाच्या आकाराचे बाहुले समर्पित करण्याचं मॉरिसने त्यावेळी ठरवलं होतं. त्या दाम्पत्याने बाहुल्याला नाव दिलं, ‘टेडीज बेअर’.
रुझवेल्ट यांनी त्या टेडी बेअरच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर मॉरिस मिटकॉम यांनी त्या टेडी बेअरचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आयडीयल टॉय कंपनीची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत टेडी बेअरने आपलं स्थान कायम केलं असून त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही हेच खरं.

(माहिती सौजन्य- नॅशनल पार्क सर्व्हिस)

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@loksatta.com