05 August 2020

News Flash

बाळ मातेपुढे नाचे!

ओकांनी परबांकडे पाहिलं. परब म्हणाले, ‘‘मला तुकोबांच्या सर्व अभंगांचे अर्थ माहीत आहेत.

ओक परबांना म्हणाले, ‘‘दगड संगीताचा अभ्यास? मोकाशींना गाणं दिसतं म्हणजे पडद्यावर गाणं म्हणणाऱ्या त्यांच्या काळातील शामा, शकिला, निगार सुलताना या नटय़ा दिसतात. कॉलेजचे तास बुडवून मोकाशी चित्रपट पाहायचे..’’ बालपणीचे मित्र कधीही आपले म्हातारपणातील स्नेही असू नयेत. त्यांना आपले सगळे दोष आणि उधळलेले गुण माहीत असतात..

परब ओठ हलवत बागेत शिरत होते. ता वरून ताकभात ताडण्याएवढा मी चाणाक्ष आहे. मी म्हणालो, ‘‘परब, मोठय़ानं म्हणा. ‘तदबीरसे बिगड़ी  हुई, तकदीर बना ले। अपने पे भरोसा है तो एक दाँव लगा ले’ हे गीता दत्तचं स्फूर्ती देणारं गाणं माझं आवडतं आहे.’’

‘‘कोण गीता दत्त?’’ परबांनी विचारलं.

इकडं ओकांच्या (वय वर्षे ८४) चेहेऱ्यावर, माझ्या विषयीचं कौतुक उमटलं होतं. ओकांनी बोलून दाखवलं, ‘‘मोकाशी, ब्याऐंशी वर्षांचे असूनही तुम्ही तुमची पंचविशी अजूनही जिवंत ठेवली आहे.’’

‘‘गीता दत्त ही गुरुदत्तची बायको.’’ मी परबांना शहाणं केलं.

‘‘कोण गुरुदत्त? मला फक्त औदुंबरचे दत्तगुरू माहीत आहेत.’’ परब अपराधी स्वरात पुटपुटले.

ओकांना परबांचा राग आला. ‘तदबीर से बिगड़ी हुई’ हे गाणं परब गुणगुणणार आणि गीता दत्त कोण हे माहीत नाही म्हणणार! बापाचे पैसे उधळून कशी तरी पदवी मिळवणारा व बापाच्या ओळखीतून नोकरीला लागलेला पोरगा उद्या बाप कोण, असा प्रश्न विचारेल.

ओकांनी परबांचे दात त्यांच्याच घशात घालायचे ठरवलं. ते म्हणाले, ‘‘परब, तुम्ही जे गुणगुणत होता ते मोठय़ानं म्हणा.’’

परब म्हणू लागले, ‘‘पतिव्रता नेघे आणिकांची स्तुती। सर्वभावे पतिध्यानी मनी॥ तैसे माझे मन एकविध झाले। नावडे विठ्ठलेविण दुजे॥ सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा। गाई ते कोकिळा वसंतेसी॥ तुका म्हणे बाळ मातेपुढे नाचे। बोल आणिकांचे नावडती॥’’

ओक माझ्यावर खेकसले, ‘‘मोकाशी, तुमची कमाल आहे! परब तर तुकोबांचा अभंग म्हणत होते; तुम्हाला गीता दत्तचं गाणं कोठून ऐकू आलं?’’

मी खुलासा केला, ‘‘मला काहीच ऐकू आलं नव्हतं, मला फक्त परबांचे ओठ हललेले दिसले होते. कोणाचेही ओठ हलले की मला गीता दत्त, शमशाद बेगम यांची गाणी दिसतात.’’

परब थक्क होऊन म्हणाले, ‘‘मोकाशी, तुम्हाला गाणं दिसतं? म्हणजे तुम्ही संगीताचे गाढे अभ्यासक दिसता.’’

ओक परबांना म्हणाले, ‘‘दगड संगीताचा अभ्यास? मोकाशींना गाणं दिसतं म्हणजे पडद्यावर गाणं म्हणणाऱ्यांना त्यांच्या काळातील शामा, शकिला, निगार सुलताना या नटय़ा दिसतात. कॉलेजचे तास बुडवून मोकाशी चित्रपट पाहायचे.’’

बालपणीचे मित्र कधीही आपले म्हातारपणातील स्नेही असू नयेत. त्यांना आपले सगळे दोष आणि उधळलेले गुण माहीत असतात. स्वत:ला वाचवण्यासाठी मी परबावर घसरलो, ‘‘अर्थ माहीत नसलेले अभंग म्हणण्यापेक्षा सुंदर सुंदर हिंदी गाणी आठवणे हेच ठीक होय.’’

सुंदर हे विशेषण दोन वेळा वापरताना माझ्या मनात दोन नटय़ाच होत्या. बरं तर बरं, ओकांना माझ्या मनात डोकावता येत नव्हतं!

ओकांनी परबांकडे पाहिलं. परब म्हणाले, ‘‘मला तुकोबांच्या सर्व अभंगांचे अर्थ माहीत आहेत. आमचं घराणं वारकरी पंथांचं आहे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून मी तुकोबांचे अभंग ऐकतो आहे.’’

‘‘परब, तुम्ही अभंगाचा अर्थ मोकाशींना सुनवा. त्यांचं अशुद्ध मन थोडं तरी स्वच्छ करा.’’ ओकांनी सुचवलं. ओकांनी मन हा शब्द उच्चारल्यावर मी चपापलो! माझ्या मनातील शामा, निगार सुलताना यांना ओकांच्या रानटी शब्दांचा धक्का तर लागला नाही?  परब सांगू लागले, ‘‘प्रेम कसे असावे ते तुकोबा सांगताहेत. पतिव्रतेच्या ध्यानीमनी फक्त पतीच असतो. प्रेम कसे हवे तर कमलिनीप्रमाणे, ती फुलण्यासाठी सूर्यप्रकाशाची वाट पाहते, चंद्राच्या शीतल चांदण्याला ती भुलत नाही. ऋतू सहा आहेत, पण कोकिळेला कंठ फुटतो तो फक्त वसंत ऋ तूतच. तुकोबा पाळण्यातील बाळाचं उदाहरण देतात. आई दिसली की बाळ हातपाय नाचवू लागते; इतरांनी गोड शब्दांची उधळण केली तरी बाळाचे ध्यान असते आईकडेच!’’

ओक म्हणाले, ‘‘मोकाशी, तुमच्या गीता दत्त, शमशाद बेगम बाजूला ठेवा, आईच्या शब्दांपुढे बाळाला गीता व शमशाद म्हणजे किस झाडकी पत्ती!’’

तुकोबांचा अभंग मला पूर्णपणे पटला; माझ्या मनाने गप्प बसावे की नाही? पण ते शब्दांतून प्रगट झालेच, ‘‘ओक, परब, गीता दत्त व शमशाद बेगम यांच्या बाळांची काय चंगळ झाली असेल. पाळणा हलवून गाणं म्हणणारी आईच गीता, शमशाद.’’

परब पुटपुटले, ‘‘अभंगाचं मर्म काय तर, असं प्रेम असेल तर विठू प्रसन्न होतो, तसा तो तुकोबांना प्रसन्न झाला होता.’’

परबांना खुलवण्यासाठी मी भर घातली, ‘‘प्रेमाची खरी महती केव्हा कळते? जेव्हा प्रेम करणारी व्यक्ती नजरेआड होते तेव्हा. तुम्ही कोणावर व कशासाठी प्रेम करता हेही महत्त्वाचं आहे, म्हणजे प्रेमाची प्रतवारी कळायला हवी. खऱ्या प्रेमात, आपण आपल्या सुखाचा विचार करत नाही, जिच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या सुखाचा विचार करतो.’’

परब माझ्याकडे आदराने पाहू लागले. माझे विचार ऐकून परब थक्क झाले. वेळप्रसंगी मी अशा प्रकारची वैचारिक, विवेकी वाक्य उच्चारू शकतो. शाळेतील इतर विषय बाजूला ठेवा, पण मराठी विषयात मला, शंभरपैकी घसघशीत पन्नास गुण मिळालेले आहेत. ओकांना आश्चर्य वाटलं नाही. मला कधीमधी उच्च विचारांचे झटके येतात हे त्यांना माहीत आहे.

‘‘खरं प्रेम म्हणजे काय हे न समजणाऱ्या दिगू या पतीची व त्याच्या पतिनिष्ठ सुलूची गोष्ट सांगतो. दिगू मला सांगत होता, ‘सुलूला एक अत्यंत वाईट सवय आहे. रात्री ती दोन-तीन वाजेपर्यंत झोपतच नाही. अशानं तिची प्रकृती बिघडणार नाही का?’’

‘‘नक्कीच बिघडणार! मोकाशी, तुम्ही तुमच्या सुलूला, ‘लवकर निजे, लवकर उठे। त्याला ज्ञान, संपत्ती, सौख्य भेटे॥’ ही म्हण सांगा.’’ परब म्हणाले.

‘‘परब, तुमचीही कमाल आहे. कोणीही दिगू व सुलू मोकाशींच्या परिचयातील नाहीत. मोकाशी गोष्ट सांगताहेत. दिगू-सुलू ही गोष्टीतील पात्रं आहेत. ओक बोलले.

मी चोरलेला चुटकाच सांगणार होतो. पण ओकांना मध्ये असा खुलासा करण्याची काय गरज होती? परबांवर माझं इम्प्रेशन पडलं असतं तर ओकांचे चारचव्वल थोडेच खर्च होणार होते? पण नाही ते बोललेच आणि मीही नाउमेद न होता सांगू लागलो, ‘‘सुलू या पत्नीविषयी दिगू प्रेमापोटी तक्रार करत होता. सुलू रात्री तीन वाजेपर्यंत जागी राहायची. दिगूची काळजी मला योग्य वाटली. मी चौकशी केली, ‘दिगू, सुलू एवढा वेळ रात्री जागून करते तरी काय?’ दिगूनं उत्तर दिलं, ‘काही करत नाही. वेळ फुकट घालवते. आजोबा, सुलू पक्की आळशी आहे, वर हट्टी आहे. जांभयावर जांभया देईल, पण झोपणार नाही. मी आल्यावर तिला विचारलं तर मला सांगणार, ‘दिगू, मला तुझी काळजी वाटते. मी तुझी वाट पाहत, ताटकळत जागी राहते.’ ..माझा थोडा गोंधळ उडाला. मी दिगूला विचारलं, ‘दिगू, तू आल्यावर सुलूला विचारतोस म्हणजे काय? तू रोज रात्री दोन-तीन वाजता घरी येतोस?’ दिगू मला म्हणाला, ‘आजोबा, आम्ही मित्रमंडळी रोज रात्री रमी खेळतो, खातो, पितो आणि घरी परततो. मर्यादेत पितो व कार व्यवस्थित चालवतो. मी घरी परतेपर्यंत सुलू काळजी करते, माझी वाट पाहता थांबते.’’

माझी गोष्ट संपली. परब खिन्न स्वरात म्हणाले, ‘‘मोकाशी, सुलूबाळ ग्रेट आहे. तिचं प्रेम दिगूला कळलेलं नाही. तुम्ही दिगूला समजवा, सुलूसारखी बायको तुला भाग्यानं मिळाली आहे. तिला जप.’’

परबांना त्यांच्या कष्टी मन:स्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न ओकांनी चालू केला, ‘‘परब, मोकाशींनी काल्पनिक गोष्ट सांगितली. असा कोणी दिगू नाही, सुलूही नाही.’’

मी ही माझ्या परीनं खटपट केली, ‘‘परब, तुम्ही कोणावर व कशासाठी प्रेम करता हे तपासून घ्या. दिगू हा नवरा सुलूच्या प्रेमाला योग्यच नाही. तिनं रात्री दिगूला घरातच घेऊ नये.’’

ओकांच्या व माझ्या जगात परतायला परब तयारच नव्हते. ते तोंडानं ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणत राहिले.

मी मात्र स्वत:ला सुखी करण्याकरता, ‘तदबीर से बिगड़ी हुई ..’ हे गीता दत्तचे गाणे, शमशाद बेगमच्या ढंगात गाऊ लागलो. एकसे भले दो!

ओक धोरणी आहेत. ते तटस्थ ऊर्फ निष्क्रिय राहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2017 2:02 am

Web Title: article by b l mahabal
Next Stories
1 आजोबांची खेळणी
Just Now!
X