वसई: पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय लोकल मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. वाढत्या गर्दीमुळे अपघात होण्याचे प्रमाण हे वाढले आहे . मागील चार महिन्यात मिरारोड ते वैतरणा या स्थानकाच्या दरम्यान रेल्वे अपघातात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.

मिरारोड ते वैतरणा अशी ३१ किलोमीटरची रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द आहे. यात सात स्थानकांच्या समावेश आहे.

मागील काही वर्षपासून  या सर्व स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. विशेषतः विरार, नालासोपारा, वसई, नायगाव या स्थानकातून मुंबईच्या दिशेने ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.

वाढत्या प्रवाशांच्या गर्दीमुळे काही प्रवासी लोकल मधून  लटकून प्रवास करतात. त्यामुळे तोल जाऊन पडण्याचे प्रमाण ही अधिक आहे.तर लवकर गाडी पकडण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करतात अशा वेळी लोकलच्या व भरधाव येणाऱ्या एक्सप्रेसच्या धडका लागून अपघात घडले आहे. 

यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधी मध्ये ३९ प्रवाशांचा मिरारोड ते वैतरणा स्थानका दरम्यान मृत्यू झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.

बहुतांश मृत्यू हे चालत्या गाडीतून पडून व ठोकर लागून झाले आहेत.  तर काही ठिकाणी कचरा वेचणारे ही बाटल्या  गोळा करण्याच्या नादात रुळावर येतात तेव्हा ही अपघात घडत आहेत असेही पोलिसांनी सांगितले आहे.

वाढत्या गर्दीचा परिणाम

वसई विरार शहरातून मुंबईच्या दिशेने दररोज लाखो प्रवासी ये जा करतात. मात्र दिवसेंदिवस ही गर्दी वाढली असल्याने लोकल मध्ये नागरिकांना नीट चढता येत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.  बहुतांश नागरिक धोकादायक पद्धतीने प्रवास करतात.  आता प्रवाशांसाठी वातानुकूलित लोकल ही सुरू केली आहे. त्यांच्या फेऱ्या ही आता विरार ते चर्चगेट अशा होतात. कधी कधी एकाच वेळी अशा लोकल सतत सुरू असल्याने इतर लोकल वेळेत येत नाहीत. त्यामुळे अशा वेळी सर्वसामान्य प्रवाशांना थांबून राहावे लागते. हळूहळू फलाटावर गर्दीही वाढते अशा वेळी रेल्वे गाड्यातून प्रवास करणे कठीण होते तेव्हा अशा घटना घडत असतात असे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या घटना घडत आहेत. रेल्वे अपघात कमी व्हावेत प्रवाशांमध्ये जनजागृती सारखे उपक्रम राबविले जातात. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने गस्त ही ठेवली जात आहे. भगवान डांगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  वसई रेल्वे पोलीस ठाणे</p>

प्रवाशांचा हलगर्जीपणा 

रेल्वेतील होणारे अपघात रोखण्यासाठी प्रवाशांसाठी पादचारी पूल, सरकते जिने, संरक्षण जाळ्या, भुयारी मार्ग अशी व्यवस्था केली आहे. परंतु काही प्रवासी हे रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. तर काही जण थेट जाळ्यांवर चढून उउड्या मारतात, चालती गाडी पकडणे अशा हलगर्जीपणामुळे अपघात होत आहेत. प्रवाशांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करू नका असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी

वाढत्या गर्दीमुळे  चोऱ्यांचे प्रमाण ही  वाढू लागले आहे. विशेषतः रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून मोबाईल लंपास करण्याच्या घटना समोर येत आहे. मोठ्या संख्येने प्रवासी हे मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येत आहेत. आतापर्यंत १६० मोबाईल चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.