वसई: विरार इमारत दुर्घटना ताजी असतानाच आता नालासोपारा पूर्वेच्या रेहमत नगर परिसरात एक इमारत खचल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. महापालिका अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.
नालासोपारा पूर्वेच्या रेहमत नगर परिसरात २० वर्षे जुनी सभा अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत आहे. या इमारतीत ४० कुटुंब राहत आहेत. इमारत जुनी झाल्याने पालिकेने धोकादायक ठरविली होती. मात्र तरीही यात नागरिक वास्तव्य करीत होते. मंगळवारी दुपारी याच इमारतीचे एका बाजूने दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानकपणे इमारत एका बाजूला कलंडली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परीसरात खळबळ उडाली होती.
या घटनेची माहीती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत इमारतीत राहणाऱ्या कुटुंबांना तातडीने खाली केले आहे.नुकताच विरार पूर्वेच्या रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच नालासोपाऱ्यात ही आणखीन एक धोकादायक इमारत खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालिकेने खचलेल्या इमारतीमधून १२५ जणांना व त्याला लागूनच असलेल्या इमारतीमधून ११४ जणांना बाहेर काढून त्यांचे स्थलांतर केले आहे. त्यांना जवळच्या मदरसा व एका सभागृहात त्यांची व्यवस्था केली असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
धोकादायक इमारतीत राहू नका..
वसई विरार शहरात सातत्याने इमारत कोसळणे, स्लॅब कोसळणे अशा विविध प्रकारच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे अशा धोकादायक इमारतीत राहू नका असे आवाहन ही पालिका अधिकारी व पोलिसांनी केले आहे.