वसई : विरार मध्ये एका इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. अलफिया अब्बास मनासवाला (५४) असे या मयत महिलेचे नाव आहे. गुरूवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. स्लॅब कोसळण्याची ही वसई विरार शहरातील मागील ११ दिवसांतील तिसरी घटना आहे. या तीन दुर्घटनेत आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
विरार पश्चिमेच्या एमबी इस्टेट येथे मर्चेन अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीच्या सी विंग मधील दुसर्या मजल्यावरील ११ नंबरच्या सदनिकेत मध्ये मनासवाला कुटुंबिय राहतात. हुसेन मनासलावाला हे पत्नी आणि मुलांसह बेडरूममध्ये झोपले होते तर त्यांचे आई वडिल हॉलमध्ये झोपले होते. मध्यरात्री अचानक घरातील स्लॅब कोसळला. यात त्यांची आई जखमी झाली. त्यांना उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी दुपारी उपचार सुरू असताना अलफिया मनासवाला यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वसई विरार शहरात स्लॅब कोसळण्याची ही मागील ११ दिवसातील तिसरी घटना आहे. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने जीर्ण झालेल्या व धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटना
१) २१ मे २०२५
नालासोपारा- आचोळे येथील सिमरन साई या ४ मजली इमारतीच्या ४०४ क्रमांक खोलीचा स्लॅब कोसळळा. या खोलीत अडलेल्या एका महिलेसह १४ वर्षीय मुलाची अग्निशमन दलाने सुटका केली होती
२) २६ मे २०२५
विरार- गोपचर पाडा येथील पूजा अपार्टमेंट ३३५ क्रमांक सदनिकेचा स्लॅब कोसळला होता. यात लक्ष्मी सिंग (२७) महिलेचा मृत्यू.
३) ३० मे २०२५
विरार- एमबी इस्टेट येथील मर्चेन इमारतीमधील ११ क्रमांकाच्या खोलीचा स्लॅब कोसळून अलफिया अब्बास मनासवाला या महिलेचा मृत्यू