सुहास बिऱ्हाडे

वसई : ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा (आर्टीफिशल इंटेलिजन्स – एआय) वापर झालेला राज्यातील पहिला गुन्हा मंगळवारी विरारच्या अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. ‘एआय’च्या मदतीने अल्पवयीन मुलींची अश्लिल छायाचित्रे बनविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपारा पश्चिमेच्या कळंब गावात रहाणाऱ्या जीत निजाई (१९) याने अनेक मुलींची अश्लिल छायाचित्रे तयार करून त्याआधारे बनावट ‘इन्स्टाग्राम’ खाती त्याने तयार केली होती. याआधारे जीत आणि त्याचा भाऊ यश यांच्यावर विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायदा, बालकांवरील लैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) आदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कल्याणराव करपे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे दोन्ही आरोपी मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याची मुले आहेत. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर झालेल्या अपराधामध्ये गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित गुंजकर यांनी सांगितले. मुंबई पोलिसांचे प्रवक्ते तसेच राज्याच्या सायबर शाखेचे माजी अधीक्षक डॉ. बालसिंग राजपूत यांनीही याला दुजोरा दिला. ‘एआय’चा वापर झाला असला तरीही माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (क) आणि (ड) अंतर्गतच गुन्हे दाखल केले जातात, अशी माहिती तज्ज्ञ अ‍ॅड. प्रशांत माळी यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय घडले?

आरोपी जीत याने कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने तरुणींची अश्लील छायाचित्रे तयार केली. या छायाचित्रांच्या आधारे इन्स्टाग्रामवर बनवाट खाती उघडून मुलींची बदनामी केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन तरूणींना सोमवारी रात्री जीत आणि भाऊ यश (२२) यांनी मारहाण केली. तक्रारीनंतर पोलिसांनी रात्री उशीरा दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दोघांनी तरुणींची अश्लिल छायाचित्रे तयार केल्याचे उघड झाले.