वसई: प्रस्तावित आचोळे रुग्णालयाच्या जागेचा तिढा सुटल्यानंतर आता रुग्णालयाच्या कामाची पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागेचे सर्वेक्षण सुरू असतानाच भाजप कार्यकर्ते व बविआचे माजी महापौर रुपेश जाधव यांच्या वाद झाला आहे. या वादाची चित्रफीत सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले.
वसई विरार महापालिकेने प्रभाग समिती ‘ड’ मधील आचोळे येथील आरक्षण क्रमांक ४५५ व सर्वे नंबर ६ येथील दोन एकर जागेत २०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच महसूल विभागाने रुग्णालयासाठी स.नं./ग.नं.६/१, एकूण क्षेत्र ६.०८.० हे. आर. पैकी आर झोन क्षेत्र ०.९०.३८ हे. आर. (९०.३८ गुंठे) जागा रुग्णालयासाठी पालिकेला वर्ग केल्याने जागेचा तिढा सुटला आहे.
त्यामुळे रुग्णालय उभारणीच्या कामाला गती मिळाली असून शुक्रवारी महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान भाजपचे आमदार राजन नाईक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. त्याच वेळी त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव ही हजर होते. याच पाहणी दरम्यान भाजप आणि बविआ या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वाद निर्माण झाला होता. काहीकाळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माजी महापौर रुपेश जाधव हे रुग्णालयाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी सुध्दा त्यांनी अडथळा निर्माण केला होता असा आरोप भाजपने केला आहे.
रुग्णालयाच्या जागे शेजारी असलेली जागा ही एका बांधकाम व्यावसायिकाची असून त्यात जाधव यांनी अतिक्रमण केले असून त्याला संरक्षण देण्याच्या हेतूनेच रूपेश जाधव यांनी हा अडथळा आणला असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
वसई: प्रस्तावित आचोळे रुग्णालयाच्या जागेचा तिढा सुटल्यानंतर आता रुग्णालयाच्या कामाची पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागेचे सर्वेक्षण सुरू असतानाच भाजप कार्यकर्ते व बविआचे माजी महापौर रुपेश जाधव यांच्या वाद झाला आहे.https://t.co/2jrmCKvB4K#vasaivirar pic.twitter.com/bOeBteapFE
— LoksattaLive (@LoksattaLive) October 28, 2025
बविआकडून प्रत्युत्तर
रुग्णालयाच्या जागेशेजारी माझ्या मालकीची जागा आहे. त्या जागेला आम्ही संरक्षक भिंत ही बांधले आहे. त्या जागेत घुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे मी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असे माजी महापौर रुपेश जाधव यांनी सांगितले आहे. आचोळे रुग्णालय तयार व्हावे यासाठी बविआने प्रयत्न केले आहेत.सत्तेत असताना तयार करून महापालिकेच्या मंजुरीसाठी सादर केला होता. त्या काळातच या जागेची आरक्षण प्रक्रिया आणि निधीचा प्राथमिक प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून पुढे नेण्यात आला होता. आज जे काही ‘हौशे-गवशे’ पुढे येऊन फोटो काढत श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, ते त्या वेळी जमिनीवर अतिक्रमण सुरू असताना कुठे होते?” असा सवाल करीत माजी महापौर रूपेश जाधव यांनी केला आहे. सत्य परिस्थिती बाहेर येऊ नये यासाठी आवाज बंद करुन चित्रफीत प्रसारित करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजप कडून केला जात आहे असे प्रत्युत्तर जाधव यांनी दिले आहे.
आगामी महापालिका निवडणुका समोर असल्याने आता राजकीय वातावरण चांगलेच पेटू लागले आहे. यापूर्वी सुद्धा आचोळे रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि बविआ यांच्यात वाद निर्माण झाला होता.
