वसई: मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आचोळे रुग्णालयाचा प्रश्न कागदोपत्री जरी मार्गी लागला असला तरी या रुग्णालयाच्या जागेच्या हद्द निश्चितीचा वाद कायम आहे. या जागेची प्रत्यक्ष मोजणी करून चारही बाजूने हद्द निश्चित केली जाणार आहे. यासाठी भूमी अभिलेख विभागाकडे पालिकेने अर्ज दाखल केला आहे.

वसई विरार महापालिकेने प्रभाग समिती ‘ड’ मधील आचोळे येथील आरक्षण क्रमांक ४५५ व सर्वे नंबर ६ येथील दोन एकर जागेत २०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या रुग्णालयाच्या जागेसाठी प्रारंभीपासूनच अडथळे निर्माण झाले आहेत. या रुग्णालयाच्या कामाचे  तीन वेळा भूमिपूजन केल्यानंतर  आणि या बांधकामासाठी २५ कोटी रुपयांचा मोठा निधी जिल्हा नियोजन समितीकडे आला असतानाही जागेचा तिढा सुटला नव्हता.

नुकताच  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रुग्णालयाला महसूल विभागाकडून निशुल्क जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आला होता. त्यानुसार आचोळे येथील ९०.३८ गुंठे जागा ही पालिकेला वर्ग करण्यात आली आहे. या जागेचा सातबारा ही पालिकेच्या नावी करण्यात आला आहे. मात्र या जागेची हद्द निश्चिती नसल्याने आता जागेच्या हद्दीवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे नेमके रुग्णालयात होणार तरी कधी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मोजणी प्रक्रियेसाठी प्रयत्न

सर्व्हे क्रमांक ६ ची शासकीय मोजणी करून देण्याबाबत महापालिका प्रशासनाने वसई  तालुका भूमी अभिलेख कार्यालयाला यापूर्वीच पत्र दिले आहे. मात्र अभिलेख विभागाच्या नियमानुसार ऑनलाईन अर्ज करून आवश्यक शुल्क भरणा केल्याशिवाय मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत नाही. या जागेच्या मोजणीच्या संदर्भात महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी संपर्क साधला होता. यावेळी भूमी अभिलेख विभागाकडून दिलेल्या सुचनेनुसार जागा मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे.

पालिकेने अर्ज दाखल केला आहे. त्याबाबत चलन शुल्क भरणा ऑनलाइन व्यवस्थेत अपलोड झाल्यानंतर पुढील मोजणी प्रक्रिया तारीख देऊन पूर्ण केली जाईल असे भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक अमोल बदडे यांनी सांगितले आहे.

पाच हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण ?

पालिकेच्या पॅनल वर असलेल्या खासगी संस्थेकडून या जागेचा  सर्वेक्षण करण्यात आले होते. बांधकामासाठी असलेल्या एकूण जागे पैकी २ हजार ७७५ चौरस मीटर जागा मोकळी आहे. तर जवळपास पाच हजारांहून अधिक चौरस फूट जागेवर अतिक्रमण असल्याचे समोर येत आहे.  त्यामुळे शासकीय मोजणीनंतरच जागेची मालकी व हद्द निश्चित होण्यास मदत होणार आहे.

राजकीय श्रेयवाद

आचोळे रुग्णालयावरून आता राजकीय चढाओढ सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकताच रुग्णालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी पालिकेचे अधिकारी गेले असता बविआ कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण झाला होता. तर यापूर्वी सुद्धा भूमिपूजना कार्यक्रमावरून भाजप आणि बविआ आमने सामने आले होते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकीच्या तोंडावर हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.