वार्ताहर लोकसत्ता

भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने रविवारी बेकायदेशीर फटाके विक्री करणार्‍यांवर अनोख्या पध्दतीने कारवाई केली. अशा विक्रेत्यांच्या फटाक्यांवर पाणी मारून ते भिजवून निकामी करण्यात आले तसेच जप्त केलेले फटाके जमिनीत पुरण्यात आले. यामुळे बेकायदेशीरपणे फटाके विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

फटाक्यांची विक्री करताना कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरक्षित फटाके विक्रीचे धोरण तयार केले होते. त्यानुसार खासगी मोकळ्या जागेवर, मैदानावर विक्रीसाठी परवानगी दिली होती. मात्र तरी देखील अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन करून फटाके विक्री करण्यात येत होती. त्यावर कारवाई करण्यासाठी आयुक्त संजय काटकर यांनी अग्निशमन विभागाचे बेकायदेशीर फटाके विक्री पथक स्थापन केले. रविवारी या पथकाने अनधिकृतपणे फटाके विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यवसायांवर कारवाई केली. या कारवाईत अनधिकृतपणे फटाका विक्री व्यवसाय करणाऱ्या दुकानीतील फटाक्यांचा मालावर अग्निशमन वाहनातील पाणी मारुन फटाके निकामी केले. काही ठिकाणी माल जप्त करण्यात आला व जप्त केलेला माल साठवुन न ठेवता तो माल जमिनीत पुरण्यात आला.

आणखी वाचा-वसई: दिवाळीच्या तोंडावर पोलीस अधिकारी अस्वस्थ; आयुक्तालयातील ४० पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या होणार

अग्निशमन विभागाने रविवारी एकुण १८ दुकानांवर कारवाई केली. त्यापैकी ७ दुकानात पाणी मारुन फटाके भिजविण्यात आले, तर ४ दुकानातील माल जप्त करण्यात आला. ७ दुकाने पुर्णत: बंद करण्यात आली. याच बरोबर अग्निशमन विभागाचा ‘नाहरकत दाखला’ (एनओसी) प्राप्त करूनही नियमांचे उल्ल्ंघन करणार्‍या दुकानांचे ‘ना हरकत दाखले’ रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पथकात अग्निशमन विभागाचे २ अग्निशमन केंद्र अधिकारी, ४ सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांसह २५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते या ताफ्यात १ वॉटर टेंडर, १ रेस्क्यु वाहन, २ मिनी वॉटर टेंडर, २ पिक अप इत्यादी वाहनांचा समावेश होता. अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर,उपायुक्त सचिन बांगर यांनी या कारवाईत सहभागी झाले होते.