वसई: पुनर्विकासाच्या नावाखाली धारावी झोपडपट्टीसह १६०० एकर जागा ही अदानीच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रविवारी वसई जूचंद्र येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी शिंदे शिवसेनेच्या आमदारांवर हल्लाबोल केला.
रविवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वसईचा दौरा केला. यावेळी त्यांनी नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन केले. यावेळी वसईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्या भाषणा त्यांनी धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यांवर अदानी आणि सरकारवर जोरदार टिका केली. फक्त धारावीची ३०० एकरची नाही तर मुंबईती १६०० एकर जागा अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजप व शिंदे सरकारचा देखील त्यांनी खरपूस समाचार घेतला. सद्यस्थितीत एकच शिवसेना आहे. दुसरी जी आहे ती गद्दार सेना आहे. त्यामुळेच त्यांचे दारूच्या बाटल्या, चड्डी बनियान गॅंग, पैशांच्या बॅगा घेऊन सिगारेट ओढत बसलेले व्हिडीओ समोर येत आहे अशी टिका केली.
आपण पाहत होतो हे जे त्रिकुट आहे. एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री ते संगीत खुर्ची प्रमाणे खेळ करीत आहे. कोण कुणाची खुर्ची काढणार हे कधीच कळणार नाही. या त्रिकुटामधला एक उपमुख्यमंत्री जो सहसा चंद्राला बघून म्हणजे चंद्राची दशा बघून गावी जातात ते या गुरुपौर्णिमेला कुठे गेले होते? ठाण्यातले गुरू आता दिल्लीत बसायला लागले का ? असा सवाल करीत शिंदे यांना टोला लगावला. आज महाराष्ट्राची स्थिती फारच बिकट बनली आहे.या सरकारच्या काळात अवघ्या तीन महिन्यातच साडेसातशेहून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे.
तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली ही लाडक्या बहिणींची फसवणूक सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महामार्गाच्या दुरवस्थेवरू त्यांनी दोरदार टिका केली. आपण चंद्रावर पोहोचलो, पण मुंबईहून वसईला येताना किती वेळ लागतो याचा विचार करा. मुंबई अहदबाद महामार्गाला राष्ट्रीय दर्जा आहे पण त्यात खड्डेच दिसतात. या महामार्गांचा लाडका ठेकेदार कोण?” असा सवाल करत जनतेला जागरूक राहण्याचे आवाहन केले.
वसई विरार महापालिकेत सत्ता आणावी लागेल
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन शाखेमधून जी ताकद निर्माण झाली पाहिजे. ती अशीच निर्माण झाली पाहिजे की या शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचं नाव हे प्रत्येक घरात व प्रत्येक मनात गेलं पाहिजे ते रुजवण्याचा काम आता आपण कार्यकर्ते म्हणून केलं पाहिजे.जूचंद्र हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे आगामी वसई विरार महापालिका निवडणुकीत सत्ता आणावी लागेल असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त करीत कामाला लागण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व हजारो शिवसैनिक उपस्थित होते.