विरार : पालघर जिल्ह्यात शिक्षकांचे पगार आणि भविष्य निर्वाह निधी देणारे कार्यालय असूनही जिल्ह्यातील शाळा या कार्यालयाला जोडल्या नसल्याने पगारासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठाणे कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. शासनाने दोन वर्षांपूर्वी या कार्यालयाला मंजुरी देऊनही अजून कारभार सुरूच झालेला नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व अनुदानित-विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना पगार, वेतन निश्चिती  आणि भविष्य निर्वाह निधीसाठी ठाणे कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला. त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील विविध महत्त्वाची आस्थापने पालघर जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात आली. परंतु आज आठ र्वष उलटून गेल्यावरही त्यांची घडी बसलेली नाही. या गोंधळात नागरिकांची परवड होते आहे. वेतन आणि भविष्य निधी निर्वाह पथकाचे कार्यालय दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाले. अधीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली, परंतु पालघर जिल्ह्यातील शाळा या कार्यालयाशी जोडल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळ सर्व अनुदानित-विनाअनुदानित शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा निधी अजूनही पालघर जिल्ह्याला वर्ग केला जात नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेतनाची बिले ठाण्याला जमा करावी लागतात. ही प्रक्रिया त्रासदायक असल्याने पगार वेळेवर निघत नाहीत. त्याचबरोबर वेतननिश्चिती पडताळणी पथकही अजून पालघर जिल्ह्यात कार्यान्वित केलेले नाही. त्यामुळे सेवेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनंत अडचणी येतात. शिक्षक सेवेत आल्यानंतर ३ वर्षांनी वेतन निश्चिती करावी लागते. यानंतर ८ वर्षांनी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि २४ वर्षांनी निवड श्रेणी अशा पद्धतीने पगार निश्चिती होते. हे पथकही पालघर जिल्ह्यात कार्यरत नसल्याने शिक्षकांच्या श्रेणी रखडल्या आहेत.  

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Affordability teachers provident fund teacher salary provident fund givers office ysh
First published on: 14-04-2022 at 00:02 IST