भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या नाट्यगृहात अखेर तीन वर्षांनंतर मराठी व्यावसायिक नाटकांचे लागोपाठ प्रयोग सुरू झाले आहेत. त्यामुळे मराठी नाट्यरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे.मिरा-भाईंदर शहरातील नाट्यप्रेमींसाठी पालिकेने दहिसर टोल नाक्याजवळ ‘भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह’ उभारले आहे. या नाट्यगृहाचे उद्घाटन १३ ऑक्टोबर २०२२ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र उद्घाटनानंतर तब्बल तीन वर्षे या नाट्यगृहात अपेक्षेप्रमाणे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत नव्हते.

परिणामी, नाट्यगृहात मुख्यतः खासगी कार्यक्रमच आयोजित होत होते. यावेळी मराठी नाटके सुरू व्हावीत यासाठी पालिकेकडून नाटक निर्मात्यांना सवलतीच्या दरात तिमाही पद्धतीने तारखा देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता. मात्र यंदाच्या उन्हाळी सुट्टीची सुरुवात होताच दर्जेदार मराठी नाटकांचे प्रयोग होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, मराठी नाटकांसाठी आगाऊ बुकिंग सुरू झाले असून, तिकिटांचे वितरणही वेगाने सुरू आहे. भरत जाधव यांचे श्रीमंत दामोदरपंत, गिरीश ओक यांचे ३८ कृष्णव्हिला, तसेच सखी गोखले व सुव्रत जोशी यांचे वर वरचे वधू वर ही नाटके सध्या समाज माध्यमांवर चांगलीच गाजत आहेत. त्यामुळे नाट्यरसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मराठी नाटकांचे असेच प्रयोग नियमित सुरू राहिल्यास नाट्यगृह उभारण्यामागील उद्दिष्ट सफल होईल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

वर्षभरात दीड कोटीहून अधिकचे उत्पन्न :

मिरा-भाईंदर महापालिकेच्या नाट्यगृहात मराठी व्यावसायिक नाटकांचे प्रयोग कमी प्रमाणात होत असले, तरी इतर खासगी कार्यक्रमांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे महापालिकेला गेल्या वर्षभरात १ कोटी ७४ लाख ४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर गेल्या तीन वर्षांत एकूण ३ कोटी ३६ लाख ४६ हजार रुपयांची भर पालिका तिजोरीत पडली आहे.

नाट्यमहोत्सवाचा विसर

मिरा-भाईंदर शहरातील नाट्यरसिकांसाठी दरवर्षी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा पालिकेकडून करण्यात आली होती. प्रारंभी काही मराठी नाटकांचे मोफत प्रयोग नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र मागील दीड वर्षांपासून प्रशासनाने या उपक्रमाकडे दुर्लक्ष केल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

“मी मिरा रोडचा रहिवासी आहे. त्यामुळे येथील नाट्यगृहात प्रयोग करण्याची माझी मनापासून इच्छा होती. परंतु विविध कारणांमुळे मागील तीन वर्षांपासून हा योग जुळून येत नव्हता. अखेर येत्या ४ मे रोजी आमच्या ३८ कृष्णव्हिला नाटकाचा प्रयोग याठिकाणी होणार असून मराठी नाट्य रसिकांनी जरूर यावे, अशी मी विनंती करतो.” गिरीश ओक , मराठी ज्येष्ठ नाट्य कलाकार