भाईंदर : न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर तब्बल ३ वर्षांनी मिरा भाईंदर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. तर सोमवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनंतर शहरातील भावी नगरसेवकांच्या प्रचार आणि प्रसाराला जोर आला आहे. मिरा भाईंदर शहरातील प्रलंबित असणाऱ्या विकासकामांविरोधात बोलतानाच्या तसेच शहरातील प्रलंबित कामे पूर्ण करून घेतानाच्या नगरसेवकांच्या चित्रफिती आणि छायाचित्र समाजमाध्यमांवर तुफान वायरल होऊ लागली आहेत.

तर दुसरीकडे मात्र पक्षापक्षातले वाद, निधीचा अभाव, महापालिका अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष या आणि अशा विविध कारणांमुळे शहरातील कामे रखडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर मिरा भाईंदर शहरातील नागरी वसाहती तसेच इमारतींमध्ये प्रचारासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना याचा फटका बसताना दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि उमेदवारांनी आमच्या इमारतीत येऊ नये, असा मजकूर असलेले फलक मिरा रोड येथील काही गृहसंकुलांमध्ये लावण्यात आले आहेत. हे फलक समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून त्याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

समाजमाध्यमांवर व्हायरल होणारी ही चित्रफित मिरारोड पूर्व येथील गोदावरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील आहे. गेल्या वर्षभरात इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षाचा विरोध करत, रहिवाशांनी लोकप्रतिनिधींना इमारतीत येण्यास मनाई करणारे फलक इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावले आहेत.समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या या फलकांवर “इमारती परिसरात पावसाळ्यात नाल्याचे पाणी साचण्याची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी वारंवार आश्वासने देऊनही यावर कोणताही ठोस तोडगा काढलेला नाही. त्यामुळे राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांवर आमचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने इमारतीच्या प्रांगणात प्रचारासाठी येऊ नये; आम्हाला तुमची गरज नाही.” असा मजकूर नमूद करण्यात आला आहे.

इमारती बाहेर लावण्यात आलेल्या या फलकांच्या माध्यमातून नागरिकांनी लोकप्रतिनिधींविषयीचा संताप उघडपणे व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांचा असा निषेध व्यक्त करण्याचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला असून व्हायरल होणाऱ्या या चित्रफितीवर नेटकऱ्यांनी देखील विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.या चित्रफियीबाबत मत व्यक्त करताना एका नेटकऱ्याने नोटा इन्कमिंग म्हणजे नोटाला मत द्या, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर इतरांनी ही नागरिकांनी इमारतीबाहेर हा फलक लावून बरोबरच केले असल्याचे म्हटले आहे.