परवानगी नसतानाही १४ नामवंत डॉक्टरांची नावे रुग्णालयाच्या पॅनेलवर
सुहास बिऱ्हाडे
वसई : बोगस डॉक्टर सुनील वाडकर याने नालासोपाऱ्यात जे नोबेल नावाचे अनधिकृत रुग्णालय सुरू केले होते. पोलीस तपासात आता येथील अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. शहरातील नामवंत १४ डॉक्टरांचे पॅनल या रुग्णालयात असल्याचे त्याने भासवले होते. पोलीस या डॉक्टरांचे जबाब नोंदवत आहेत. वसई-विरार महापालिकेचा माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनील वाडकर हा बोगस डॉक्टर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर विरार आणि तुळींज पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले होते. वाडकर याने नालासोपाऱ्यात जे नोबेल नावाचे अनधिकृत रुग्णालय सुरू केले होते. त्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी त्याला अटक करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. नोबेल रुग्णालयात कार्यरत असलेले दीपक पांडे आणि आकाश मिश्रा हे दोन्ही बोगस डॉक्टर होते. तसेच कर्मचारीही प्रशिक्षित नव्हते.
वाडकर याने रुग्णांची दिशाभूल करण्यासाठी रुग्णालयात शहरातील नामवंत १४ डॉक्टरांचे पॅनल असल्याचे भासवले होते. या डॉक्टरांची नावे त्याने रुग्णालयाच्या दर्शनी भागात तसेच रुग्णालयाच्या लेटरहेडवर टाकली होती. यामुळे रुग्णांना नोबेल हे मोठे रुग्णालय असल्याचे वाटत असे आणि त्यांची फसगत होत असे. मात्र या १४ डॉक्टरांना आपली नावे रुग्णालयाच्या पॅनलवर आहेत याची कल्पना नव्हती आणि ते कधीच रुग्णालयात आले नव्हते असे त्यांनी पोलिसांनी सांगितले. या १४ डॉक्टरांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाल्याची माहिती, साहाय्यक पोलीस निरीक्षक एम. डी. म्हात्रे यांनी दिली.
जेमतेम बारावी पास असलेला वाडकर २००९ ते २०१३ या कालावधीत वसई-विरार महापालिकेचा मुख्य वैद्यकीय अधिकारी होता. या काळात त्याने शहरातील इतर बोगस डॉक्टरांकडून कारवाई न करण्यासाठी लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. पोलिसांना अशा सहा डॉक्टरांची माहिती कळली आहे. वाडकर पदाचा गैरवापर करत इतर बोगस डॉक्टरांची रुग्णालये सील करत असे आणि ती पुन्हा चालू होण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असे. पालिकेचा वैद्यकीय अधिकारी असताना २१ ऑगस्ट २०१३ रोजी सुनील वाडकर याने स्वत:च्या सहीने जे नोबेल या रुग्णालयाला मान्यता असल्याचे पत्र दिले होते. रुग्णालयाची नोंदणी त्याची पत्नी डॉ. आरती वाडकरच्या नावावर होती. ती दंतचिकित्सक असताना तिने रुग्णालयात ट्रॉमा केअर आणि प्रसूतीगृह सुरू केले होते. परंतु येथे अल्पवयीन मुली व महिलांचे बेकायदा गर्भपातही केले जात असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याच्या जबाबातून समोर आली आहे.
पुरावे शोधण्यासाठी पोलीस महाडला रवाना
सुनील वाडकर याच्या विरार येथील बंगल्यावर छापा घालून महत्त्वाची कागदपत्रे, सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर, व्हिजिटिंग कार्डस, ओळखपत्रे पोलिसांनी जप्त केली. वसईतील वाडकरच्या होप क्लिनिक या दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. वाडकरने पुरावे लपवल्याच्या शंकेमुळे महाडला त्याच्या मूळ गावी त्याने बांधलेल्या अलिशान बंगल्याची झडती घेऊन तपास करण्यास पोलीस रवाना झाले आहेत.