वसई : शहरातील अर्नाळा वसई या रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या गेल्या चार महिन्यांपासून कायम आहे यामुळे या रस्त्यावरील प्रवास खडतर झाला आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आता संतप्त नागरिक करत आहेत.
विरार आणि वसई यांच्या पश्चिम बाजूंना जोडणारा अर्नाळा-वसई हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याचा वापर मोठ्याप्रमाणावर नागरिक करत असतात मात्र असे असले तरीही या रस्त्याची वेळोवेळी डागडुजी केली जात नसल्याने रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील ज्योती, सत्पाळे, नाळे, वाघोली, निर्मळ, गिरीज, आणि भुईगाव परिसरात सर्वाधिक खड्डे असून यामुळे आता अनेक अपघाताच्या घटना समोर येत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने खड्डे लक्षात येत नाहीत. तसेच रात्रीच्या वेळी अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने अंधारात रस्त्यावरील खड्डे दिसत नाही यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या महिन्यात वाघोली येथे खड्ड्यामुळे एक महिला दुचाकीवरून पडल्याची घटना घडली होती. मागून येणाऱ्या बसचालकाने प्रसंगावधान राखत बस थांबल्याने मोठा अनर्थ टळला होता. हा रास्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून अशा घटनानंतरही विभागाकडून रस्त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून दुरुस्ती अभावी रस्त्यावरील खड्डयात वाढ झाली असून या जीवघेण्या रत्स्यांची ताडणीने दुरुस्ती करावी असे स्थानिक नागरिक अद्वय ठाकूर यांनी सांगितले.
या रस्त्यावर अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत. यामुळे हजारो विद्यार्थी या मार्गावरून प्रवास करत असतात. तसेच विरार, नालासोपारा आणि वसईच्या पश्चिम भागातील गावांमधून पूर्वेला असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत मोठ्या संख्येने नागरिक दुचाकीवरून दैनंदिन प्रवास करत असतात. रस्त्यांच्या निकृष्ट दर्जामुळे आणि खड्ड्यांचे वाढते साम्राज्य लक्षात विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्ते दुरुस्तीची कामे सुरूच असून पावसाळा सुरु असल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामात अडचणी येत आहेत. पावसाळा संपल्यानंतर तातडीने रस्त्याची दुरुती करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.