सुहास बिऱ्हाडे

गणेशोत्सव काळातील तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी यंदा वसई-विरार महापालिकेने आगळय़ावेगळय़ा उपक्रमांची सुरुवात केली आहे. शहरातील तलावांमध्ये विसर्जन न करता कृत्रिम तलाव तसेच शहराबाहेरील दगडखाणींच्या तलावांचा पर्याय उलब्ध करून दिला आहे. याशिवाय फिरते हौद, मूर्ती दान आदी संकल्पना राबविल्या जात आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी पालिकेची ही एक सकारात्मक सुरुवात आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रात भक्तिभावाने आणि मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. गणेशोत्सव काळातील भक्तिभावात महाराष्ट्रातील जनता न्हाऊन निघते. मोठय़ा उत्साहात, मांगल्यपूर्ण वातावरणात गणरायाची घरात आणि सार्वजनिक मंडळामार्फत स्थापना केली जाते. या उत्सवातील देखाव्यातून सृजनशीलता बहरते आणि सामाजिक संदेश दिला जातो. मात्र गणरायाला जड अंत:करणाने निरोप देताना त्याचे तलावात आणि समुद्रात विसर्जन केले जाते. या काळात विसर्जन मिरवणुकीतील वाद्यांचे ध्वनिप्रदूषण होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तलाव आणि समुद्रात प्रदूषण होत राहते. यासाठी काही वर्षांपासून कमी उंचीच्या शाडूच्या मूर्ती आणि कृत्रिम तलावांचा पर्याय समोर आला. गणेशाची भक्तिभावाने आराधना करणाऱ्या सुजाण नागरिकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्याचे स्वागत केले. वसई, विरार शहरात मात्र अशा प्रकारे कृत्रिम तलाव नव्हते. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने तलावात विसर्जन करावे लागत होते.

करोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. यंदा पालिकेने प्रथमच जलप्रदूषण रोखण्यासाठी तीन चाकोरीबाहेरचे निर्णय घेतले आहेत. त्यात शहरातील तलावांऐवजी कृत्रिम तलाव आणि दगडखाणीतील तलावात विसर्जन, फिरते कृत्रिम तलाव आणि गणेशमूर्ती विसर्जित न करता त्या जमा करणे अशा तीन महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे. या निर्णयांचे पडसाद सध्या शहरात उमटत आहेत. परंपरेला आणि भक्तिभावाला धक्का न लागता गणरायाचे विसर्जन करण्यासाठी पालिका यासाठी जनजागृती करत आहेत. तर काही ठिकाणी याला विरोध होत आहे.

दगडखाणीतील तलाव, फिरते आणि कृत्रिम तलाव

दरवर्षी शहरातील २० प्रमुख तलावांमध्ये विसर्जन केले जाते. पालिका वर्षभर या तलावांची डागडुजी आणि सुशोभीकरण करत असते. विसर्जनामुळे तलावाचे पाणी प्रदूषित होते आणि त्यातील सूक्ष्म जीव आणि जलचर नष्ट होतात शिवाय तलावांवर केलेला खर्चाही वाया जातो. त्यामुळे यंदा पालिकेने शहरातील सर्व २० विसर्जन तलाव बंद करण्याचे ठरवले आहे. विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार शहरात ठिकठिकाणी ६२ कृत्रिम तलाव उभारले जात आहेत. हे कृत्रिम तलाव विसर्जन मार्गावर आणि तलावांच्या परिसरात असणार आहेत. विसर्जनासाठी आलेल्या मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित केल्या जाणार आहेत. विसर्जनासाठी आलेल्या मूर्ती जर ४ फुटांपेक्षा लहान असतील तर ते या कृत्रिम तलावात विसर्जित केल्या जातील आणि मोठय़ा मूर्ती असतील तर त्या शहराबाहेरील दगडखाणींच्या तलावात नेऊन विसर्जित केल्या जातील. त्यासाठी पालिकेने ५ दगडखाणींचे तलाव शोधून तेथे विसर्जनाची व्यवस्था केली आहे.

दगडखाणीतील तलावात विसर्जन ही संकल्पना सध्या नागरिकांना जड जात आहे. त्यामुळे मुळात ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. शहराच्या बाहेर असलेल्या दगडखाणींच्या परिसरात नैसर्गिकरीत्या तलाव तयार झालेले असतात. ते खोल असतात. शहरातील विसर्जनासाठी आलेल्या मोठय़ा मूर्ती पालिका संकलित करणार आणि ट्रकमध्ये भरून त्या या दगडखाणींच्या तलावात नेऊन विसर्जित करणार आहे. हे काम योग्य पद्धतीने व्हावे यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे परंपरा आणि भावनेला धक्का लागणार नाही, असे पालिकेने सांगितले आहे. लहान मूर्ती आणि शाडूच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जाणार आहे. यामुळे शहरातील सुंदर तलाव अबाधित आणि प्रदूषणमुक्त राहणार आहे.

याशिवाय पालिकेने फिरते कृत्रिम तलाव ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही वर्षांपासून बहुजन विकास आघाडीने हा प्रयोग सुरू केला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. फिरते कृत्रिम तलाव म्हणजे पालिका एका टेम्पोमध्ये कृत्रिम तलाव तयार करणार. प्रत्येक प्रभागात हे टेम्पो नागरिकांच्या घराजवळ जातील. घरगुती गणपतींचे विसर्जन या टेम्पोमधील तलावात केले जातील. यामुळे तलावांमधील प्रदूषण कमी होणार आहे. पालिकेने केलेला तिसरा उपक्रम म्हणजे मूर्ती दान करण्याचे आवाहन. राज्यातील काही भागांत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. मूर्ती दान न करता ती पालिकेकेडे जमा करायाची. पालिका या मूर्ती संकलित करून त्या कारखान्यात ठेवणार आणि त्याचा पुनर्वापर करणार. याशिवाय या मूर्तीचे विघटन करून ती विविध कारखान्यांत वापरली जाणार आहे.

गणेशोत्सवकाळात निर्माण होणारे निर्माल्य ही मोठी समस्या असते. त्यामुळे हे निर्माल्य जमा करून त्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. हादेखील एक स्तुत्य उपक्रम आहे.

पालिकेच्या निर्णयांना विरोध

आजवर पालिका कृत्रिम तलाव करत नाही म्हणून पालिकेवर टीका करण्यात येत होती. पण यंदा पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या संकल्पनेतून हे पर्यावरणस्नेही उपक्रम राबविले जात आहेत. यामुळे तलावांचे प्रदूषण कमी होणार आहे. फिरत्या तलावांमुळे विसर्जन मिरवणुका बंद होतील आणि पर्यायाने ध्वनिप्रदूषण कमी होईल, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी होईल. पण पालिकेच्या या निर्णयाला काही ठिकाणी विरोध होत आहे आणि तो स्वाभाविक आहे. गणेशोत्सवाबरोबर लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. काहींच्या मते तलावात विसर्जनाची परंपरा खंडित करणे योग्य नाही तर काहींनी दगडखाणीतील तलावांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परंपरा हवी की तलाव स्वच्छ, सुंदर, प्रदूषणविरहित हवे याचा विचार नागरिकांनी केला आहे. दगडखाणीतील तलावाबाबत अनेकांना साशंकता आहे. मात्र त्यात पालिकेतर्फे भक्तिभावाने विसर्जन केले जाणार असल्याने नागरिकांनी मनात शंका बाळगण्याचे कारण नाही.  दुसरीकडे पालिकेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पुढील वर्षी आणू नये यासाठी हमीपत्र घेण्यास सुरुवात केली आहे. याचा अर्थ सरसकट बंदी नाही. किमान गणेशोत्सव मंडळे सामाजिक भान राखून छोटय़ा आणि शाडू मातीच्या मूत्र्या आणण्याचा प्रयत्न करतील, अशी त्यामागे भावना आहे. कुठलाही बदल एका रात्रीत स्वीकारला जात नाही. त्याला वेळ लागतो. पालिकेची भावना चांगली आहे आणि उपक्रम स्तुत्य आहे. राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी पालिकेच्या या उपक्रमासाठी पुढे येणे गरजेचे आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला तर नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल. पहिल्या वर्षी १० टक्के जरी या उपक्रमांना यश आले तरी भविष्याच्या दृष्टीने ती एक चांगली सुरुवात असणार आहे.