वसई : दिवाळीच्या निमित्ताने विविध रंगांच्या रांगोळ्यांची उधळण व  कलाकारांची कल्पकता यांचा अनोखा संगम वसईतील रांगोळी प्रदर्शनातून दिसून येत आहे. नायगाव जूचंद्र येथील कलाकारांनी दीपावली निमित्ताने विविध मनमोहक अशा रांगोळ्या काढल्या आहेत. या रांगोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देऊन समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न कलाकारांनी केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जूचंद्र येथे दीपावली निमित्ताने रांगोळी प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात  यंदाच्या वर्षी सुद्धा कलाकारांनी विविध ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या

 रांगोळ्या साकारल्या आहेत. यामध्ये जवळपास पंचवीसहून अधिक रांगोळ्या असून त्यात संस्कार भारती, थ्रीडी, उठावदार, निसर्गचित्र,कणारांगोळी, पोर्ट्रेट असे विविध प्रकार वापरून सामाजिक विषय रांगोळीच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.

यात विशेष करून अहमदाबाद मध्ये घडलेली विमान दुर्घटना, ऑपरेशन सिंदूर अशा रांगोळ्या साकारल्या आहेत. संचिता म्हात्रे हिने कांतारा चित्रपटावर आधारित रांगोळी साकारत निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे. तर नुकताच नवी मुंबईत तयार झालेल्या दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आधारित रांगोळी साकारण्यात आली आहे. करण वटार या कलाकाराने मराठी भाषेची गळचेपी व मराठी शाळा टिकवा असा संदेश देणारी रांगोळी काढली आहे.

या रांगोळ्या अतिशय ज्वलंत व मनाला भावणाऱ्या असल्याने विविध ठिकाणहून नागरिक या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत.रविवार पर्यँत या रांगोळ्याचे प्रदर्शन असणार आहे. जूचंद्र हे कलेचे माहेरघर असल्याने दरवर्षी विविध प्रकारचे सामाजिक विषय समाजापुढे आणून जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही कलाकार करीत असतो. परंतु या कलेला अधिक वाव मिळण्यासाठी शासकीय स्तरावर सुद्धा प्रयत्न होणे गरजेचे आहे तरच कला व कलाकार टिकून राहतील असे मत कलाकार जयेश म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.