वसई: धावत्या लोकलमधून निर्माल्याचा फेकलेला नारळ लागून संजय भोईर (३०) हा तरुण जखमी झाला होता. या तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी मृत्यू झाला आहे.

संजय भोईर हा नायगाव आणि भाईंदर खाडीच्या मध्ये असलेल्या पाणजू बेटावर राहतो. संजय हा शनिवारी सकाळी साडे आठच्या सुमारास नायगाव भाईंदर रेल्वे खाडी पुलावरून पायी प्रवास करीत नायगाव स्थानकाच्या दिशेने निघाला होता. याच दरम्यान धावत्या लोकल मधून निर्माल्याचा नारळ खाडीत फेकण्यात आला. मात्र तो नारळ थेट संजय याच्या डोक्याला लागला. यात तो गंभीर जखमी झाला होता.

सुरवातीला त्याला वसईतील पालिकेच्या सर डीएम पेटिट व त्यानंतर मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डोक्याला मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याने त्याचा उपचारा दरम्यान रविवारी सकाळी मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांशी संपर्क केला असता त्यांच्याकडे अजूनही अशी कोणती नोंद करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

या घडलेल्या घटनेमुळे पाणजू गाव परीसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकल ही भरधाव वेगाने जाते. त्यातच अशा प्रकारे निर्माल्य व इतर वस्तू लोकलमधून खाडीत फेकतात त्यामुळे त्याचा जोराचा फटका काहीवेळा रेल्वे पुलावरून पायी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतो. यापूर्वी सुद्धा गावातील अनेकांना निर्माल्य लागून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत असेही येथील नागरिकांनी सांगितले आहे.

लोकलमधून निर्माल्य फेकणाऱ्यावर कारवाई करा

धावत्या लोकलमधून खाडीत निर्माल्य टाकून देण्याचे प्रमाण वाढत आहे. नायगाव भाईंदर खाडी पूल, वैतरणा विरार खाडी पूल या दरम्यान अनेक प्रवासी निर्माल्याने भरलेल्या पिशव्या धावत्या लोकलमधून भिरकावत असतात. अनेकदा हे निर्माल्य खाडीत न जाता खाडी पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर उडते. काही वेळा निर्माल्याच्या पिशवीत जुन्या मुर्त्या, नारळ याचाही समावेश असल्याने त्याचा जोराचा फटका बसून नागरिक जखमी होत आहे. लोकल मधून निर्माल्य फेकणाऱ्यावर रेल्वे प्रशासनाने बंदी आणावी व जे निर्माल्य फेकताना दिसून येतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.