विरार : विरारच्या मारंबळपाडा जेट्टी येथे शनिवारी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांना वैतरणा खाडीतून वाचविण्यात यश आले आहे. रो-रो फेरीबोटीवरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिघे जण थोडक्यात बचावले आहेत. यामुळे विसर्जनाच्या दिवशी मोठा अनर्थ टळला आहे.

शनिवारी अनंत चतुर्थीच्य निमित्त विरार पश्चिमेच्या मारंबळपाडा जेट्टी येथील वैतरणा खाडीत वसई विरार पालिकेकडून गणपती विसर्जनाची सोय करण्यात आली होती. गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांपैकी एकाचा पाय घसरून तो थेट खाडीत पडला. त्याला वाचविण्यासाठी म्हणून त्याच्या सोबत असणाऱ्या पुरुषाने खाडीत उडी घेतली. मात्र तोही बुडत असल्याने महिलेनेही पाण्यात उडी घेतली.

मात्र जोरदार पावसामुळे खाडीचा प्रवाह तीव्र असल्याने तिघांना किनाऱ्यापर्यंत पोहोचता आले नाही. याउलट ते प्रवाहाच्या आत ओढले जात होते. यावेळी विरार ते जलसार रो रो फेरीबोटीच्या कर्मचाऱ्याने तात्काळ फेरीबोटीवर कळविले. फेरीबोट वेळेत दाखल झाल्याने दोघांचे प्राण वाचविण्यास यश आले. तर यावेळी खाडीत असणाऱ्या एका छोटया बोटीवरील खलाश्यांनी सुद्धा या बचाव कार्यात भाग घेत एकाचे प्राण वाचविले आहे.

प्रशासनाचे खबरदारी घेण्याचे आवाहन

नुकताच मारंबळपाडा जेट्टी येथे फेरीबोटीत जात असताना एक चार चाकी गाडी वैतरणा खाडीत पडली होती. सुदैवाने पोलीस आणि प्रवशांच्या मदतीने आणि गाडीसह दोघांना वाचविण्यास यश आले होते. खाडी किनारी रो-रो ने प्रवास करताना, फिरायला येताना नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.