वसई- नाताळचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून त्याच्या तयारीला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. वसई विरारसह मुंबई आणि परिसरातील बेकर्‍या सज्ज झाल्या आहेत. नाताळ निमित्ताने केक, चॉकलेटसह विविध पदार्थ खास सवलतींसह उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवस हा नाताळचा सण म्हणून साजरा केला जातो. दिवाळी, होळी, रमजान, हॅलोविनप्रमाणे नाताळही ख्रिस्ती समाजाव्यतिरीक्त इतर समाजातील व्यक्तीही हा सण उत्साहात साजरा करतात आणि सणाचा आनंद लुटतात. यामुळे दिवाळीप्रमाणे नाताळ आणि नववर्षासाठी बाजार सज्ज होत आहे. यानिमित्ताने बेकरी, कॅफेज, इटरीज या नाताळसाठी सजावट केली जात आहे. मुख्यत: लहान पाईन झाडे (ख्रिसमस ट्री), स्टार्स, रोषणाई केली जात आहे. तसेच खास प्लम केक, मार्शमेलोज, जुजुब, कॅन्डीज, ग्रेप्स वाईन, गिफ्ट हॅम्पर्स विक्रीसाठी ठेवले जात आहेत. नाताळ आणि नववर्षानिमित्त ऑफर्स, सवलती दिल्या जात आहेत.

हेही वाचा – मैत्रकुल संस्थेच्या किशोर जगताप यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

कांदिवली येथील क्रिमली बेकरीच्या मॅनेजर जेनेट गोम्स यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यात केक, जिंजरब्रेड, कॅन्डी, चॉकलेटची विक्री मोठ्या प्रमाणात होते. अनेकजण नातेवाईकांना देण्यासाठी, घरगुती पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात घाऊक ऑर्डर देतात. तर लहान मुलांना वाटण्यासाठी चॉकलेट आणि कॅन्डीजचे प्रकार घाऊकमध्ये (बल्क) घेतले जातात. आम्ही सर्व पदार्थ इथेच बनवतो मात्र खास शाकाहारी आणि मांसाहारी प्लम केक वसईतून मागवतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या महिन्यापासूनच खास नाताळच्या संकल्पनेनुसार संपूर्ण बेकरी कॅफे सजवण्यास सुरुवात केली जाते. नाताळ संकल्पनेच्या (थीम) कॅन्डीज दर्शनी भागात ठेवल्या जातात. ख्रिसमस हॅम्परची सजावट करण्यात येते. ख्रिसमसची पदार्थ सारणी (मेन्यू) टेबलवर ठेवण्यात येते, तर प्लम केक, स्कोन्स, टार्ट्स अशा खास पदार्थांचे फलक (फ्लेक्स) लावण्यात येतात. जेणेकरून ग्राहक आधीच ऑर्डर देऊ शकतील.

बहुतांश ऑर्डर या आगाऊ दिल्या जातात ज्यासाठी आधीच सर्व सजावट केली जाते, ज्यामुळे ग्राहक आकर्षित होतात. ग्राहकांना सणाचा (फेस्टिव्ह) वातावरणचा अनुभव देण्यासाठी कॅफे शॉपमध्ये आम्ही सजावट, सवलती (ऑफर्स), भेटवस्तू आणि विविध दिवसानुसार पदार्थ ठेवतो. सध्या नाताळसाठी खास या सर्व गोष्टी केल्या जात आहेत. हे सर्व कॅफेजमध्ये केले जाते, असे चर्चगेटच्या स्टारबक्स कॅफेमधील असिस्टंट मॅनेजर शिवानी बोबडे यांनी सांगितले.

५ महिन्यांपूर्वी केकटॅटीस नावाने घरच्या आवारात बेकरी कॅफे सुरू केला. आम्ही डिसेंबर महिना सुरू होताच फेरी लाईट्स, नाताळ सिम्बॉल्स आदींनी सजावट केली तसेच नाताळ गाणी, खेळ आदींचे आयोजन केले आहे. तसेच केक, कँडी, चॉकलेट विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत, असे बेकरी शेफ आणि बेकरी कॅफेची ओनर क्रिस्टिना पेरियार हिने माहिती दिली.

हेही वाचा – अपहृत तरुणाची ‘सुखरूप’ सुटका, दुचाकी दुरूस्तीसाठी रचला होता स्वत:च्या अपहरणाचा बनाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या कॅफे, बेकरी किंवा इटरीमध्ये पदार्थांचे विविध प्रकार, चव यापेक्षाही त्यांचे सादरीकरण करण्याकडे लक्ष दिले जाते. पदार्थ ठेवलेल्या जागा आकर्षक असाव्यात याकडे कल असतो.. बऱ्याचदा ग्राहक छायाचित्रे, चित्रफिती बघून कॅफेमध्ये येत असतात. अगदी गुगल किंवा झोमाटोवर सर्च केले तरी त्यात जागा दिसायला कशी आहे हे पाहिले जाते. त्यामुळे प्रसंगानुरूप विशेषत: सणाला धरून सजावट करण्यावर भर दिला जातो. यामुळेच आजकाल सहज ने-आण करता येण्याजोगे फर्निचर कॅफे, इटरीमध्ये असते जेणेकरून हवेतसे बदल करता येतात. नाताळच्या निमित्ताने कॅफे, बेकरीज मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नाताळ संकल्पनेचे सजावट, पदार्थांचे सादरीकरण (डिस्प्ले) करत आहेत, ही माहिती रेस्टॉरंट इंटिरीअर डिझाइनर स्पेशलिस्ट आदित्य सुखाणे यांनी दिली.