बोगस डॉक्टर हेमंत पाटील प्रकरणात धक्कादायक माहिती

दहावीनंतर ३ वर्षांत डॉक्टरची पदवी

Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
IPL Star RCB Cameron Green 60 Percent Working Kidney Tells diet to control
६० टक्के कार्यरत किडनीसह IPL खेळतोय RCB चा ‘हा’ स्टार खेळाडू; किडनीच्या सुदृढतेसाठी काय खावं, काय नाही?

सुहास बिऱ्हाडे

वसई : वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला बोगस डॉक्टर हेमंत पाटील याच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. मसाला विक्रीचा एजन्ट म्हणून काम करणारा थेट अस्थिरोगतज्ज्ञ बनल्याचे उघड झाले आहे. हेमंत पाटील ऊर्फ सोनावणे याने दहावीनंतर अवघ्या तीन वर्षांत एमबीबीएसची पदवी मिळवली होती. डॉक्टर झाल्यानंतरही तो एका एजन्सीत मसाला विक्रीचे, तसेच एका कंपनीत सेल्समनचे काम करत असल्याचे कागदपत्रांवरून उघड झाले आहे.

सुनील वाडकर या तोतया डॉक्टरचे प्रकरण समोर आल्यानंतर लोकसत्ताने हेमंत पाटील हा डॉक्टर बोगस असल्याचे उघडकीस आणले होते. याबाबतच सामाजिक कार्यकत्र्यामार्फत वसई पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच हेमंत पाटील हा फरार झाला आहे. त्याने आपले वसई पारनाका येथील क्लिनिकसुद्धा बंद केले आहे.

हेमंत पाटील याच्याविरोधात धक्कादायक माहिती ‘लोकसत्ता’च्या हाती आली आहे. हेमंत पाटील याच्या बायोडाटानुसार तो १९८७ साली जळगाव येथून दहावी उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर तो १९९१ पर्यंत जळगाव येथे बादशाह मसाला विक्रीचे काम करत होता. नंतर १९९१ ते १९९६ मध्ये तो युरेका फोर्ब्समध्ये सेल्समन म्हणून काम करत होता, तर १९९६ ते २००४ पर्यंत गुजरातच्या ऑर्थोकेअरमध्ये सेल्समनचे काम केले होते. मात्र त्यानंतर अचानक तो डॉक्टर बनून समोर आला. १९९० मध्ये त्याने बडोदा मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि याच महाविद्यालयातून १९९६ मध्ये अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून एमएस (मास्टर्स ऑफ सर्जरी) मिळविल्याचे प्रमाणपत्र दाखवू लागला. १९८७ साली दहावी झालेला विद्यार्थी पुढील तीन वर्षांत म्हणजे १९९० मध्ये डॉक्टर कसा बनला? तो १९९० मध्ये डॉक्टर होता तर सेल्समन म्हणून का काम करत होता? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुजरातमधील विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमएस पदवी मिळाल्याचा दावा केला आहे. मात्र अशा प्रकारची कुठलीही कागदपत्रे तो पालिका अथवा पोलिसांना सादर करू शकला नाही, असे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले.

महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडील नोंदणी दुसऱ्याच्या नावावर

हेमंत पाटील याची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तसेच वसई-विरार महापालिकेकडे डॉक्टर म्हणून कुठलीही नोंद नाही. त्याने सादर केलेला ३२८७१ हा नोंदणी क्रमांक डॉ. दिलसुख पंजवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. विशेष म्हणजे २००७ सालापासून त्याचे नूतनीकरण झालेले नाही. डॉ. पंजवानी सध्या कॅनडामध्ये स्थायिक आहेत.

तक्रारदारांची पोलीस ठाण्यात धाव

हेमंत पाटील हा वसईतील पारनाका परिसरात २०१८ सालापासून क्लिनिक चालवत होता. अनेक नामांकित रुग्णालयांत तो अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून शस्त्रक्रिया करत होता. त्याचे प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी अनेक रुग्ण वसई पोलीस ठाण्यात आले आहेत. आतापर्यंत आमच्याकडे आठ जणांनी तक्रारी दिल्या आहेत. यापैकी अनेकांना हेमंत पाटील याने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे व्यंगत्व आलेले आहे किंवा शस्त्रक्रिया फसली आहे, असे वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी पवार यांनी सांगितले.